- डॉ. श्रीकांत नरुले
पुलंनी मराठी रसिकाला हसविले, पण त्यापेक्षा अधिक स्वत:संबंधी विचार करायलाही प्रवृत्त केले आहे. त्यांना अंतर्मुख व्हायला लावले. त्यांनी विनोदाचे एक स्वतंत्र विश्व निर्माण केले. लोकांना खळखळून हसविले आणि मोकळेपणाने जगाकडे पाहायलाही शिकविले…
‘हसून दु:ख सोसल्यास सुसह्य होते’, असे विनोदी लेखक पु. ल. देशपांडे यांचे तत्त्वज्ञान होते. विनोदाची खेळकर उत्स्फूर्त वृत्ती, मिस्कीलपणा हे सारे गुण त्यांच्याकडे जन्मजात होते. त्यांच्या आजीची परंपरा त्यांनी स्वीकारून आपला मिस्कीलपणा अधिकच गडद केला. एकदा आजीला नातू म्हणाला, ‘आजी माझे हे मित्र पैलवान आहेत’, आजी म्हणाली, ‘बरे झाले, सकाळपासून मी वाट पाहत होते, हे कोळशाचे पोते आत आणायचे होते.’ पुलंची व्याख्याने व एकूण विनोदी वाङ्मय हे आजीच्या शैलीप्रमाणेच आहे. त्यांचा उपहासगर्भ विनोद आपणाला तेच सांगतो.
बटाट्याच्या चाळीत सारे मध्यमवर्गीयच राहतात. येथे भरपूर भांडणे आहेत, पण त्या सार्यांमध्ये आत्मीयतेचे धागेही आहेत. इथल्या संवाद विसंवादावरच ‘बटाट्याची चाळ’ नांदत आहे. साध्य ासुध्या संवादातून त्यांनी स्वभावातील खाचाखोचा, तिरकसपणा मांडून सहजपणे विनोद साधला आहे.
त्यांचा विनोद अनेक वैशिष्ट्यांनी नटलेला आहे. कधीकधी ते बोलण्यातील विसंगतीवरही विनोद मांडतात. मध्यमवर्गाच्या व्यंगावरची फजितीही अनेकदा पाहायला सापडते. त्यावरही त्यांचे विनोद घडलेले आहेत. कधी हा विनोद पाककृतींच्या बिघडलेल्या घटनेवरही असतो.
एखाद्या स्वयंपाकघरातील खूपच वस्तू शेजारच्या घरातून आणलेल्याच अनेक वर्षे दिसून येतात. देणारे आणि वस्तू आणणारे दोघेही ते विसरतात. पुन्हा पुन्हा शेजारच्याही घरात तसेच चित्र दिसते. अनेकदा गृहिणी स्वयंपाक बिघडला तर हार न मानता सारवासारव करते. पुलंनी त्यावरही लिहिले आहे. ‘दिलेली शंकरपाळी दाताने तोडणे कठीण म्हणून तो अडकित्त्याने तोडतो. त्यावर कमलाबाई म्हणतात, आम्ही खाण्याचे पदार्थ मुद्दामच कडक ठेवतो, कारण दातातील शक्ती मऊ, खुसखुशीत पदार्थ खाऊन नष्ट होते. भात देखील पुरा शिजलेला आमच्याकडे नसतो.
‘नळावरील भांडणे’ यावर लिहिताना ‘एकमेकांना पाण्यात पाहणे, हा शब्दप्रयोग नळाच्या पाण्यावरून तर स्फुरला नसेल’ असे पुलं लिहितात.
जनसामान्यांबद्दल त्यांच्या मनात प्रेमच आहे. अशा लोकांच्या जीवनातील विसंगती, आकांक्षा ते रंगून रंगून सांगताना दिसतात. ‘बटाट्याची चाळ’ ‘खोगीरभरती’ मधून त्याची प्रचीती येते. त्यात त्यांचा विनोद निर्मळ राहिलेला आहे. कुठेही अश्लीलता नाही. माणसांचे दोष मांडताना ते चेष्टा करतात, पण त्यांच्यावरही त्यांचे प्रेम असते, मायाच असते.
विडंबन हा आणखी एक त्यांच्या लेखणीचा सहजधर्म दिसतो. कोल्हटकर, चि. वि. जोशी, गडकरी, अत्रे यांची लेखन पद्धती, त्यातील नाट्यधर्म, त्यातील गोष्ट त्यांना भावलेली असते. काही तरी करून घसरून नाटक कसे पडेल याकडे प्रथम प्रयोगाकडे आलेल्या लोकांचे लक्ष असते. लोकांची ही वृत्ती त्यांनी उपरोधिक शैलीत मांडली आहे. पुलंनी मराठी रसिकाला हसविले, पण त्यापेक्षा अधिक स्वत:संबंधी विचार करायलाही प्रवृत्त केले आहे. त्यांना अंतर्मुख व्हायला लावले.
फजितीचं अत्यंत साद्यंत वर्णन पुलं करतात. ‘भांडकुदळ’ बायको या लेखात एक मजेशीर घटना घडते. आपल्या बायकोसाठी तो चोरून स्नो पावडर आणतो. त्यावर ती खूष होईल, असे त्यास वाटते. घडते वेगळेच. ती म्हणते, ‘माझ्या काळेपणाला एवढं हिणवायला नको, गोरी पाहिजे होती तर आणायची होती.’ तो म्हणतो ‘हिला काळे म्हणायला माझे डोळे का फुटले आहेत? कोळसे, डांबर, शाई वगैरे मंडळींचा राग मी सुखासुखी का पत्करीन?’
आपला विनोद त्यांनी चावटपणापासून अलग ठेवला आहे. चावटपणाचा साधा स्पर्शही आपल्या विनोदाला ते करू देत नाहीत. उपहासामधून पु.ल. एखाद्याची खिल्ली उडवत. शारीरिक ठेवण, मानसिक दोष, जीवनातील विसंगती यातून त्यांनी आपला विनोद साधला आहे. स्वभावनिष्ठ विनोद, प्रासंगिक विनोद, विडंबन उपहासात्मक विनोद, विसंगतीवरचा विनोद असे विनोदाचे प्रकार पडतात.
एका पानवाल्याची रसिकता किती और आहे, हे सांगताना पुलंची निरीक्षणशक्ती किती सूक्ष्म आहे याचे दर्शन होते. ते म्हणतात, त्याच्या दुकानात कुठल्याशा गोस्वामी बालब्रह्मचारी आणि ‘बंदुककी आवाज’ फेम लवंगलता या दोघांचेही फोटो एकाच फ्रेममध्ये बसवलेले मी या उघड्या डोळ्यांनी पाहिले आहेत. अनासक्ती आणि आसक्ती याचा असा योगायोग जुळवून आलेला त्यानंतर मी कुठेही पाहिलेला नाही. दर्याचा उल्लेख करताना मोठमोठ्या लेखकांनी ‘ऐलतीर पैलतीर’ पाहिलेला आहे, हा शब्दप्रयोग पुलंना मजेशीर वाटतो. ते म्हणतात, ‘ही भाषा वापरायला दर्या म्हणजे काय कोल्हापूरची पंचगंगा आहे?’ असे विनोद मांडताना त्यांना सामाजिक स्थित्यंतराची जाणीव होते. चाळ ही संस्कृती लोपल्यानंतर कुटुंब ही संकल्पनाही लोप पावणार, ओलाव्याचं नातं संपणार, बंद दार असलेली संस्कृती येणार हे त्यांनी ५० वर्षांपूर्वी लिहिलेले होते. ब्लॉक माणूसपण न जपता खासगीपण जपणार हे त्यांनी तेव्हाच ओळखले होते. पुलंचे हे चिंतन मराठी मन जपते.
निकोपपणे माणसाच्या जगण्याकडे पहा असा जणू संदेश त्यांच्या विनोदवृत्तीने दिला आहे. अमंगल, गुंतागुंतीचे जगणे त्यांच्या खेळकर वृत्तीने नाकारले आहे. माणसाने सुंदरपणाने जगावे असे त्यांना वाटे. पुलंनी विनोदकार म्हणून लौकिक मिळवला, पण अंगाला अहंकाराचा वारा लागू दिला नाही. पुलंनी लिहिलेले काही किस्से सतत आठवत राहतात. ते एके ठिकाणी लिहितात, हौस म्हणून पाळले जाणारे प्राणी तीनच. पोपट, मांजर आणि कुत्रा. एका इसमाने माकडही पाळले होते, पण दोघांच्याही आचरटपणाची इतकी चढाओढ लागायची की, कोणी कोणाला पाळलेय हेच कळत नसे. आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं का विश्वातून शून्य? असा त्यांना माणसाच्या कर्तबगारीबद्दल प्रश्न पडतो. पुलंनी मात्र विनोदाचे एक स्वतंत्र विश्व निर्माण केले. खळखळून हसविले आणि मोकळेपणाने जगाकडे पाहायला शिकविले.