पुलवामाच्या आठवणी ताज्या करीत पूंछमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनावर नुकताच भ्याड हल्ला झाला, त्यात आपले पाच जवान शहीद झाले. भारत – पाक नियंत्रण रेषेजवळच्या भिंबर गलीच्या जंगलात मुसळधार पाऊस कोसळत असताना लष्कराचा ट्रक रॉकेट प्रॉपेल्ड ग्रेनेडस्चा मारा करून रोखला गेला आणि त्याला सर्व बाजूंनी घेरून किमान पाच दहशतवाद्यांनी त्यावर अंदाधुंद गोळ्या चालवल्या. इंधनाच्या टाकीवर बॉम्ब फेकून ट्रक उडवून दिला गेला. त्यामुळे गोळ्यांनी जखमी झालेले आपले जवान होरपळून मृत्युमुखी पडले. जे घडले ते भीषण आहे आणि त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. बालाकोटनंतर हादरलेला पाकिस्तान पुन्हा वळवळू लागला आहे याचे हे चिन्ह आहे. जम्मू काश्मीरमध्ये कायमची शांतता प्रस्थापित होऊ लागली आहे. तेथे नवी गुंतवणूक येते आहे, श्रीनगरसारख्या ठिकाणी मॉल, चित्रपटगृहे उभी राहत आहेत, नवी विकासकामे होत आहेत हे तर पाकिस्तानच्या आणि पाक समर्थित दहशतवाद्यांच्या डोळ्यांत सलतेच आहे. आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या विविध भागांमध्ये आयोजित केलेल्या जी – 20 सदस्य राष्ट्रांच्या विविध बैठकांपैकी एक थेट श्रीनगरमध्ये घेतली जाणार असल्याने दहशतवाद्यांचे पित्त खवळले असेल तर नवल नाही. खुद्द पाकिस्तान सरकारलाही श्रीनगरमध्ये जी 20 ची बैठक झालेली नको आहे आणि चीनने त्या बैठकीत सहभागी होऊ नये असे आवाहन पाकिस्तानने केले आहे. काश्मीर खोऱ्यातील आपली लोप पावत चाललेली दहशत पुन्हा निर्माण करण्याच्या प्रयत्नात दहशतवादी शक्ती आहेत. काही काळापूर्वी राजौरीमध्ये हिंदू कुटुंबांना लक्ष्य केले गेले, त्यामागे तेच प्रयत्न होते. सध्या काश्मीर खोऱ्याच्या शहरी भागांत लष्कराने आपले कडे आवळले असल्याने आता दुर्गम, ग्रामीण भागांमध्ये नक्षलवाद्यांच्या शैलीत हल्ले चढवायला दहशतवाद्यांनी सुरुवात केलेली आहे असेच पूंछमधील या हल्ल्यावरून दिसते. नक्षलवादी आणि काश्मिरी दहशतवादी यांचे संधान जुळवण्याचे जे प्रयत्न पाकिस्तानकडून चाललेले होते, त्यातून हा हल्ला झालेला नाही ना हे आता तपास यंत्रणांना शोधावे लागेल. या हल्ल्यात किमान पाच दहशतवादी सामील होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे व यापैकी किमान तिघेजण पाकिस्तानी, तर दोघे स्थानिक आहेत असेही सांगितले जात आहे. बाहेरच्या शत्रूंना घरात घेणारे घरचे भेदी हीच काश्मीरची सर्वांत मोठी समस्या आहे. मध्यंतरी एकीकडे भारतीय लष्कराने आणि दुसरीकडे एनआयएने नाड्या आवळल्यानंतर दहशतवादाचा स्थानिक पाठिंबा घटत चालला होता. खोऱ्यात लष्कराने दहशतवादावरील आपले वर्चस्व कायम राखले आहे. तरीही हे प्रयत्न होतात याचा अर्थ कुठे तरी सुरक्षाविषयक त्रुटी राहते आहे. पाकिस्तानी हद्दीतून ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रे भारतीय हद्दीत टाकली जात असल्याचे मध्यंतरी आढळले होते. नियंत्रणरेषेवर काही ठिकाणी जमिनीखालून भुयारे खोदून घुसखोरीही चालते. हे पाकिस्तानी दहशतवादी भारतात आले कसे, त्यांना कोठे कोणी आसरा दिला आणि त्यांना शस्त्रास्त्रे कशी मिळाली या प्रश्नांचा तपास आता तपास यंत्रणांना करावा लागेल आणि सुरक्षेतील या त्रुटी दूर कराव्या लागतील. आपल्या जवानांच्या हौतात्म्याचा सूड उगवल्याविना भारतीय लष्कर राहणार नाही हे तर निश्चित आहे, परंतु या साऱ्यामागचा जो कली आहे, त्या पाकिस्तानला पुन्हा एकदा योग्य भाषेत समज देण्याची गरजही निर्माण झालेली आहे. सध्या कर्नाटक विधानसभेची भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली निवडणूक तोंडावर आहे. अशावेळी पाकिस्तानविरुद्ध एखादी धडक कारवाई झाली तर तिला निवडणूक स्टंट म्हणायला सारे विरोधक पुढे होतील, परंतु पाकिस्तान समर्थित दहशतवादाला पुन्हा डोके वर काढू दिले जाता कामा नये. पाकिस्तानचे राजकीय नेतृत्व आपल्या आयएसआयच्या कारवायांपासून सदैव अलिप्त आणि अनभिज्ञ असते असे कसे मानायचे? लवकरच शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेच्या गोव्यात होणाऱ्या परिषदेला पाकिस्तानचा विदेशमंत्री बिलावल भुत्तो येणार आहे. आपल्या जवानांच्या रक्ताचा लाल सडा पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांकडून पाडला जात असताना या भुत्तोसाठी येथील देशभक्त लाल पायघड्या अंथरणार आहेत काय? खरे तर बिलावल भुत्तोचे हे निमंत्रण आता या बदललेल्या परिस्थितीत भारताने मागे घेतले पाहिजे. एकीकडे रक्ताचे सडे पाडले जात असताना दुसरीकडे गळाभेटी आणि मेजवान्यांचे देखावे पाहून त्या हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना काय वाटेल? पाकिस्तानला भारताशी खरोखर मैत्री हवी असेल, शांतता नांदायला हवी असेल, तर त्याचे हे आयएसआयमार्फत चाललेले उपद्व्याप आधी थांबले पाहिजेत, ही जी भारत सरकारची अधिकृत भूमिका आहे, तिचा विसर पडू नये हाच पूंछमधील हुतात्म्यांचा संदेश आहे.