पुलवामा ः तपास फलनिष्पत्तीवरून विरोधकांचे सरकारवर टीकास्त्र

0
173

पुलवामा दहशतवादी हल्ल्याला काल एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर या विषयावरून विरोधक व भाजप यांच्यात शाब्दीक चकमकीच्या फैर्‍या झडू लागल्या आहेत. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपवर तोफ डागताना पुलवामा हल्ल्याचा लाभ कोणाला झाला असा सवाल उपस्थित केला. तर प्रत्युत्तरात सत्ताधारी भाजपने राहुल गांधी हे लष्करे तैयबा व जैश ए महंमद यासारख्या दहशतवादी संघटनांचे समर्थक असल्याचा आरोप केला.
यासंदर्भात कॉंग्रेसला माकप नेत्यांनीही साथ देताना पुलवामाच्या अनुषंगाने उत्तरदायित्वाबाबत सवाल उपस्थित केला. त्यावर गेल्या वर्षी १४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरातील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या ४० जवानांच्या हौतात्म्याचा राहुल गांधी आपल्या वक्तव्यांनी अवमान करीत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

तपासकामाचे फलीत काय?
राहुल गांधी यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली. त्याचवेळी त्यांनी सदर दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीचे फलित काय असा प्रश्‍न विचारला आहे. ते म्हणाले, ‘आज आम्ही सर्वजण त्या ४० हुतात्म्यांचे स्मरण करत आहोत. अशावेळी मनात काही सवाल उठत आहेत ते असे – या हल्ल्यातून सर्वाधिक लाभ कोणाला झाला? या हल्ल्याच्या तपासकामाचे फलित काय? हा हल्ला होऊ देण्यास ज्या गुप्तचर यंत्रणेची अकार्यक्षमता उघडी पडली त्यासाठी भाजप सरकारमधील कोणाला जबाबदार ठरवण्यात आले?
राहुल गांधींकडून
सुरक्षा दलांचा अवमान
राहुल गांधी यांच्या या सवाल व आरोपांना भाजपकडून अतिशय तत्परतेने प्रतिसाद दिला गेला आहे. भाजपचे प्रवक्ते नरसिंह राव यांनी राहुल गांधी यांना उद्देशून ‘तुम्हाला लाज वाटायला हवी’ असा टोला लगावला. जेव्हा सारा देश पुलवामाच्या शहीदांना आदरांजली अर्पण करीत आहे, अशा वेळी राहुल गांधी केवळ सरकारवरच आरोप करत नसून सुरक्षा दलांवरही ते आरोप करत आहेत. राहुल गांधी खरा गुन्हेगार असलेल्या पाकिस्तानला कधीच प्रश्‍न विचारणार नाहीत. हा देशाच्या सुरक्षेसाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांचा अवमान आहे असे राव म्हणाले.
राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा लाभ पाकिस्तान आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उठविणार असल्याचा दावा भाजपचे नेते शहनवाज हुसेन यांनी केला आहे.

शहिदांच्या कुटुंबियांसाठी सरकारने काय केले ? येच्युरी
माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांनी पुलवामातील ४० शहीदांना आपण आदरांजली वाहत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी यावेळी प्रश्‍न उपस्थित केला की ज्या ४० जवानांनी हौतात्म्य पत्करले त्यांच्या कुटुंबियांसाठी सरकारने काय केले? ते म्हणाले, ‘मोदी व भाजप यांनी पुलवामातील हुतात्म्यांच्या नावाने सरळ मते मागितली. दहशतवादी हल्ल्याला वर्ष झाले असताना त्याचा तपास अहवाल कुठे आहे? या संदर्भात कोणाला जबाबदार ठरवण्यात आले आहे. याप्रकरणी गुप्तचर यंत्रणांच्या मोठ्या अपयशाला कोण जबाबदार असे सवाल त्यांनी विचारले. माकपचे अन्य एक नेते महंमद सलीम यांनी विचारले, की ८० किलो आरडीएक्स स्फोटके आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून कशी भारतीय हद्दीत आली? या संदर्भातील आमचे अपयश लपवण्यासाठी कोणत्याही स्मारकाची आम्हाला गरज नाही असे ते म्हणाले.