पुरावे नष्ट केल्याचा ठपका ठेवून दोघा महिला कर्मचार्‍यांना अटक

0
94

वास्कोतील विद्यार्थीनीवरील बलात्कार प्रकरण
दोन वर्षांपूर्वी हेडलँड – सडा येथील एका प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणार्‍या सात वर्षांच्या बालिकेवर प्रसाधनगृहात बलात्कार करून फरार झालेल्या आरोपीचा अद्याप तपास लागला नसला तरी मुरगाव पोलिसांनी या प्रकरणी काल कारवाई करताना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी ब्रिजीनो पीटर गुदिन्हो (५८) व सौ. दिशा कवठणकर (३९) या शाळेच्या दोघा महिला कर्मचार्‍यांना अटक केली. १४ जानेवारी २०१२ रोजी सकाळी शाळेच्या मध्यंतराला पीडित बालिकेवर कथित अत्याचार झाला होता. परंतु हे प्रकरण पोलिसांना मुख्याध्यापिकेने व व्यवस्थापनाने न कळवता दडपण्याचा प्रयत्न केला होता. पीडित बालिकेचे अंगावरील कपडे धुऊन पुरावा नष्ट करण्यात आला होता. परंतु या प्रकरणाला चार-पाच तासांनंतर वाचा फुटल्याने हे प्रकरण गाजले होते. सडा-वास्को परिसरातील नागरिकांनी मोठे आंदोलन पुकारून आरोपीला मोकळे सोडणार्‍या मुख्याध्यापिका व कर्मचार्‍यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली होती. त्यावेळी सडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रात्रीच्या वेळी शाळेला भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घेतले होते व आरोपींना गजाआड करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन दिले होते.
या प्रकरणातील आरोपींचा शोध पोलिसांकडून घेण्यात येऊनही आरोपी सापडू शकले नव्हते. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आले होते. पीडित मुलीचे कपडे धुऊन पुरावे नष्ट करून या प्रकरणाची माहिती पोलिसांना उशीरा देऊन मुख्याध्यापिका, कर्मचारी, शिक्षक तसेच व्यवस्थापनाने मोठी चूक केल्याने त्यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका पोलिसांनी ठेवून गुन्हा नोंदविला होता. यानंतर शाळा व्यवस्थापनाने मुख्याध्यापिकेसह कारकून व एका शिक्षिकेला निलंबित केले होते. तसेच व्यवस्थापनाचे सचिव असलेले मुरगाव पोर्ट ट्रस्टचे श्री. मडकईकर यांची तातडीने मुंबईला बदली केली होती.
या प्रकरणी मुरगाव पोलिस अधिक्षक लॉरेन्स डिसौझा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शैलेश नार्वेकर पुढील तपास करीत आहेत.