पुरामुळे राज्यात शेतीचे ८.९२ कोटींचे नुकसान

0
184

>> कृषिमंत्री चंद्रकांत कवळेकर यांची माहिती

राज्यात ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे राज्यभरातील ६,३३६ शेतकर्‍यांच्या १९२० हेक्टर जमिनीतील पिकाची नासधूस झाली असून पुरामुळे शेतीचे सुमारे ८.९२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा कृषिमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

कृषी खात्याने राज्यातील पुरामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचा आढावा घेतला असून सविस्तर अहवाल तयार केला आहे. डिचोली, बार्देश, पेडणे या तालुक्यांतील विविध भागात दौरा करून पुरामुळे पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. त्यावेळी अंदाजे १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. आपला हा अंदाज खरा ठरला आहे. शेतकर्‍यांच्या वैयक्तिक तक्रारीनंतर नुकसानीचा आकडा वाढू शकतो, असेही कृषिमंत्री कवळेकर यांनी सांगितले.

उत्तर गोव्यातील १४६३ हेक्टर आणि दक्षिण गोव्यातील ४६० हेक्टर जमिनीतील पिकाची हानी झाली आहे. उत्तर गोव्यात ६.७४ कोटी आणि दक्षिण गोव्यात २.३ कोटींची हानी झाली आहे. पेडणे तालुक्यातील १७,०६२ शेतकर्‍यांच्या ५९८ हेक्टर जमिनीतील शेतीचे नुकसान झाले आहे. या तालुक्यातील शेतकर्‍यांच्या नुकसानाची आकडा सुमारे २ कोटी ८१ लाख रुपये एवढा आहे. डिचोली तालुक्यातील ४८० हेक्टर, साखळीतील २८६ हेक्टर, वाळपई येथील ९४.८ हेक्टर जमिनीतील पिकाची हानी झाली आहे, असेही मंत्री कवळेकर यांनी सांगितले.

दक्षिण गोव्यातील फोंडा येथील २३५ हेक्टर, मडगाव येथील १९१ हेक्टर, केपे येथे ४ हेक्टर, सांगे येथील ५.४ हेक्टर, काणकोण येथील ४.३ हेक्टर जमिनीतील पिकाची हानी झाली आहे, असेही मंत्री कवळेकर यांनी सांगितले.