पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बिहारच्या विक्रमगंजमधील सभेत इशारा
‘ऑपरेशन सिंदूर’ हा भारताच्या भात्यातील फक्त एक बाण आहे, असे शत्रूला हे माहित असले पाहिजे. भारताचा दहशतवादाविरोधातील लढा थांबलेला नाही आणि थांबणारही नाही. यापुढे दहशतवाद्यांनी पुन्हा दहशतवादी कारवाया केल्या, तर सापाप्रमाणे बिळातून बाहेर काढून चिरडून टाकू, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिला.
बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील विक्रमगंज येथे एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरच्या यशावर भाष्य केले. भारताने काही दिवसांपूर्वी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर हल्ला करत ते उद्ध्वस्त केले होते.
ज्यांनी पाकिस्तानात बसून आमच्या बहिणींचे सिंदूर नष्ट केले होते. आमच्या सैन्याने त्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. पाकिस्तान आणि जगाने भारताच्या मुलींच्या सिंदूरची शक्ती देखील पाहिली, असे मोदी म्हणाले. दहशतीचा फणा पुन्हा उभा राहिला, तर आम्ही त्याला त्याच्या बिळातून बाहेर काढू आणि चिरडून टाकू. मग ते सीमेपलीकडे असो किंवा सीमेच्या आत, असेही मोदींनी नमूद केले.
या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होत असल्याने, मोदींनी उपस्थितांना जंगल राज आणि सामाजिक न्यायाचे खोटे दावे करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कानपूर भेटीदरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदी याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर शुभम द्विवेदीची पत्नी ऐशन्या द्विवेदीने प्रतिक्रिया दिली. पंतप्रधानांनी दहशतवादाविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही, असे सांगितल्याचे ऐशन्याने म्हटले आहे. मोदींना भेटल्यानंतर शुभम द्विवेदीचे वडील संजय द्विवेदी म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून दहशतवादाविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आल्याबद्दल आम्ही आभार मानतो. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण देश पंतप्रधानांसोबत आहे.