पुन्हा स्वदेशी

0
13

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच देशवासीयांना एक नवा मंत्र दिला – स्वदेशी. एकेकाळी महात्मा गांधींनी पारतंत्र्याच्या काळात भारतीयांना स्वदेशी अंगिकारण्याचे आवाहन केले होते. आता इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकवार स्वदेशीचे महत्त्व अधोरेखित होण्यास तसेच कारणही घडले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर नुकताच पंचवीस टक्के आयात कर लादला. भारत आणि अमेरिका ह्या देशांतील द्विपक्षीय व्यापार असमान पातळीवर आहे असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. भारताने अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात आयातही केली पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. भारताने अमेरिकी उत्पादनांवर अव्वाच्या सव्वा आयात कर लावलेला आहे असे ट्रम्प म्हणत आहेत. ट्रम्प यांच्या ह्या सगळ्या अरेरावीच्या वागण्याबोलण्यातून एक गोष्ट पुरती स्पष्ट झाली आहे ती म्हणजे आज आंतरराष्ट्रीय व्यापार अशा लहरी नेत्यांच्या हुक्कीवर अवलंबण्याजोगी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ती कोणत्याही सार्वभौम देशासाठी त्रासदायक आहे. पंतप्रधानांनी स्वदेशीचा विषय पुढे आणण्यास दुसरे कारण ठरले आहे ते नुकतेच झालेले ऑपरेशन सिंदूर. त्यामध्ये संरक्षणक्षेत्रातील आत्मनिर्भरतेची गरज कधी नव्हे एवढ्या ठळकपणे अधोरेखित झाली. कोणत्याही देशावर अवलंबून राहण्याजोगी स्थिती आजच्या जगात राहिलेली नाही. रशियाकडून होणाऱ्या आयातीवर युक्रेन – रशिया युद्धाचे सावट आहे. चीनकडून आयात करण्यासारखी स्थिती राहिलेली नाही. युरोप आपल्याच आर्थिक संकटात गुरफटलेला आहे आणि अमेरिका केवळ स्वदेशहितापुढे जगाची पर्वा करायला तयार नाही, ही अशी स्थिती असताना आत्मनिर्भरतेचा मार्ग हाच सर्वांत योग्य मार्ग ठरतो. उत्पादनामध्ये मेक इन इंडियाला एकीकडे चालना देत असतानाच ह्या देशातील एकशे चाळीस कोटी जनतेने जर स्वदेशीचा ध्यास घेतला आणि तो मार्ग अवलंबायला सुरूवात केली, तर निश्चितपणे चालू खात्यातील तूट कमी करण्याचा तो सर्वांत प्रभावी मार्ग ठरेल. सध्या निर्यातीपेक्षा आयात अधिक होत असल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर नेहमीच ताण येत असतो. त्यामुळे स्वदेशीचा आग्रह धरल्यास त्यातून स्थानिक उत्पादकतेला प्रोत्साहन आणि चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही. विदेशी उत्पादनांची गुणवत्ताच चांगली असते हा आपल्या देशात एक गोड गैरसमज आहे. दुसरी बाब खरेदीला कारण ठरत असते ती म्हणजे किंमतीतील तफावत. चिनी उत्पादने गुणवत्तेच्या बाबतीत अगदीच खालच्या दर्जाची असतात, परंतु स्वस्त असल्यामुळे लोक त्याकडे वळतात. तीच बाब इतर अनेक देशांतून आपल्या देशात अक्षरशः मारा केल्या जाणाऱ्या अनेक उत्पादनांबाबत सांगता येईल. स्वस्तातील आणि बनावट कपड्यांपासून खेळण्यांपर्यंत हे जे कमी दर्जाची उत्पादने भारतीयांच्या माथी केवळ किमतीची स्पर्धा लावून मारण्याचे प्रकार वर्षानुवर्षे चालले आहेत, त्यांना चाप लावण्याचीही जरूरी आहे. स्वदेशीचा विषय काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हाती घेतला होता. त्यासाठी स्वदेशी जागरण मंच पुढे झाला होता. परंतु नंतर जागतिकीकरणाच्या रेट्यात स्वदेशीचा तो जोश ओसरला. जागतिकीकरणामुळे जग जवळ आले आहे खरे, परंतु त्यामुळे त्यातून धोकाही वाढला आहे. आज आपल्या देशातील सामान्य दुकानदार देशोधडीला लागण्याची स्थिती उत्पन्न झालेली आहे. त्यांची जागा बड्या बड्या उद्योगसमूहांकडून घेतली जाताना आणि सरकारही त्यांचीच पाठराखण करीत त्यांच्यासाठी पायघड्या अंथरताना दिसत आहे. स्वदेशीचा आग्रह धरीत असताना त्याचा फायदा देशातील छोट्या व मध्यम उत्पादकांना व्हायला हवा. त्या उत्पादनांच्या विक्रीचे जे पारंपरिक जाळे ह्या देशामध्ये घाऊक – किरकोळ विक्रेत्यांच्या माध्यमातून उभे आहे, त्यांना मॉल संस्कृतीने आणि बड्या आंतरराष्ट्रीय सुपरमार्केटस्‌‍मार्फत हादरा देता उपयोगी नाही. ह्या देशातील लघुउद्योग तरायला हवेत. शेतकरी समृद्ध व्हायला हवा. तरच स्वदेशीच्या आग्रहाला अर्थ राहील. ज्या क्षेत्रांमध्ये मोठ्या भांडवली गुंतवणुकीची गरज असते, अशा क्षेत्रांमध्ये बड्या उद्योगसमूहांनी उतरलेच पाहिजे, परंतु किरकोळ विक्री, कृषीमालाची विक्री अशा क्षेत्रांमध्ये हे बडे मासे उतरून छोट्या माशांना गिळंकृत करीत सुटले आहेत ते योग्य नाही. कोरोनाकाळामध्ये छोट्या व मध्यम व्यवसायांची वाताहत झाली. त्यांना उभारी घेण्याची संधी मिळाली पाहिजे. स्वदेशीला चालना देण्यासाठी स्वदेशी उत्पादकांना अधिकाधिक व्यवसायसुलभता कशी मिळेल, त्यांच्यात गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता कशी वाढेल आणि त्याचा फायदा ग्राहकापर्यंत कसा पोहोचेल हे सरकारने पाहिले गेले पाहिजे. देशाची विदेशी चलनाची गंगाजळी वारेमाप आयात करून संपवण्याची जी परंपरा निर्माण झाली आहे ती थांबवण्यासाठी स्वदेशीचा आग्रह हाच योग्य उपाय आहे. मात्र, त्याची कार्यवाही केवळ इव्हेंटबाजीपुरती न राहता प्रत्यक्षामध्ये स्वदेशीचे आचरण व्यवहारात कसे उतरेल ह्यावर भर द्यावा लागेल. देशप्रेमी जनता ह्याला उत्स्फूर्तपणे पुन्हा एकवार पाठिंबा दिल्यावाचून राहणार नाही.