पुन्हा सावंत

0
50

भारतीय जनता पक्ष राज्यात आगामी विधानसभा निवडणूक विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याच नेतृत्वाखाली लढवणार असल्याचा पुनरुच्चार पक्ष प्रभारी सी. टी. रवी यांनी आपल्या गोवा भेटीत केला. वास्तविक, आगामी निवडणूक सावंत यांच्याच नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याचे पक्षाने यापूर्वीही वेळोवेळी स्पष्ट केले असताना पुन्हा पुन्हा भाजप नेतृत्वाला हा प्रश्न करणेच चुकीचे आहे. याचे प्रमुख कारण भाजपपाशी राज्याला नेतृत्व देऊ शकेल असा स्वतःचा असा दुसरा चेहराच नाही आणि त्यांच्याऐवजी दुसरा एखादा चेहरा ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुढे करणे म्हणजे आपल्या सरकारच्या अपयशाची कबुली देणे असा होणार असल्यामुळे तो वेडेपणा पक्षनेतृत्व कधीही करणार नाही.
मनोहर पर्रीकर यांच्या मृत्यूनंतर डॉ. प्रमोद सावंत यांच्यापाशी राज्याच्या सत्तेची कमान आली तेव्हा वय, अनुभव कमी असला तरीही तोवरची स्वच्छ प्रतिमा आणि मुख्य म्हणजे पर्रीकरांनी केलेली त्यांच्या नेतृत्वगुणांची जडणघडण आणि आपला संभाव्य उत्तराधिकारी म्हणून ठेवलेला विश्वास ह्या गोष्टी सावंत यांच्या बाजूने होत्या. तरुण वय असल्याने आणि कोणत्याही गतगोष्टींचे ओझे वा जोखड अंगावर नसल्याने राज्याच्या हाती आलेल्या सत्तेचे सोने करून दाखवण्याची संधी त्यांच्यापुढे उभी होती. शिवाय प्रथमच एक दमदार मराठा नेतृत्व त्यांच्या रूपाने गोव्याला लाभले होेते. सरकारमधील घटक पक्षांनी चालवलेल्या ब्लॅकमेलिंगला घाऊक पक्षांतरांद्वारे असे काही जबरदस्त उत्तर दिले गेले की सरकार भक्कम तर झालेच, परंतु सरकारच्या मार्गातील अंतस्थ अडथळेही कायमचे दूर झाले. मात्र, सावंत यांच्या दुर्दैवाने पुढे कोरोना महामारी उद्भवली आणि सावंत यांची अर्धीअधिक राजवट ही ह्या महामारीनेच झाकोळून टाकली.
वास्तविक पाहता, राज्याच्या हिताच्या अनेक नव्या कल्पना नव्या मुख्यमंत्र्यांनी मांडल्या होत्या. पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारता’च्या हाकेला त्यांनी ‘स्वयंपूर्ण गोवा’ ची जोड दिली आणि सरकारी योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी अधिकार्‍यांना कामाला लावत दमदार सुरूवात केली होती. पर्रीकर यांच्या कार्यकाळातील असंख्य साधनसुविधा प्रकल्प अपुर्णावस्थेत होते, त्यामुळे पहिल्या वर्षी तर हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचे श्रेयही त्यांच्या पदरी पडले. सावंत यांची प्रतिमा बर्‍याच अंशी ढासळली ती कोरोना महामारीच्या हाताळणीत. त्यात दोष खरे तर त्यांचा एकट्याचा नव्हता. त्यांनी आपल्या वैयक्तिक प्रयत्नांत कुठेही कसर ठेवली नव्हती हे खरे, परंतु त्यांना वेळोवेळी मिळालेले चुकीचे सल्ले, त्यातून घेतले गेलेले चुकीचे निर्णय आणि त्याचे गोमंतकीयांना भोगावे लागलेले परिणाम या सर्वांचा दोष नेते या नात्याने त्यांच्या माथी आला. अजूनही हे चुकीचे सल्लागार त्यांच्या अवतीभवती वावरताना दिसतात आणि सावंतही त्याच प्रकारच्या चुका पुन्हा पुन्हा करताना दिसतात. ‘आप’च्या मोफत विजेच्या घोषणेला ‘मोफत पाण्या’च्या घोषणेचे उत्तर हा असाच एक वेडेपणा.
कोरोनाकाळात, विशेषतः दुसर्‍या लाटेतील अखंड मृत्युसत्रामुळे सरकारला सामोर्‍या जाव्या लागणार्‍या जनप्रक्षोभामुळे राज्यात नेतृत्वबदलाचा विषय ऐरणीवर आला. भाजप श्रेष्ठींनी इतर अनेक राज्यांतील आपले नेते बदलले. उत्तराखंडमध्ये चार महिन्यांत तीन मुख्यमंत्री बदलले गेले. कर्नाटकातील येडीयुराप्पांनाही अलीकडेच बाहेरचा रस्ता दाखवला गेला. गोव्यामध्येही नेतृत्वबदलाचा विचार दिल्लीत चालल्याच्या खात्रीशीर बातम्या राष्ट्रीय दैनिकांनी दिल्या होत्या. त्यामागे त्यांच्या नेतृत्वाला आव्हान देऊ इच्छिणारे अंतर्गत घटकही त्यांच्या प्रतिमेला सार्वजनिकरीत्या मलीन करण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु ही परिस्थिती लक्षात येताच सावंत यांनी तो प्रयत्न संबंधितांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून असा उलटवला की ही अंतर्गत वळवळ पूर्णपणे थांबली. पक्षानेही यावेळी सावंत यांची साथ दिल्याने अंतर्गत विरोध बासनात गुंडाळणे संबंधितांना भाग पडले आहे.
त्यामुळे आता सावंत यांचा आपल्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थात, पक्षाला पुन्हा विजयाप्रत घेऊन जाण्याची जबाबदारी सर्वस्वी त्यांची असणार आहे, कारण त्यांच्या आणि त्यांच्या सरकारच्या कामगिरीच्या मोजमापावर जनता मतदान करणार आहे. सावंत यांनी आजवरच्या आपल्या कामातून जनतेचा विश्वास कमावला की गमावला हे निवडणूक निकाल सांगेल.