पुन्हा संघर्ष

0
18

इराणमध्ये नवे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन सत्तारूढ होतात न होतात तोच इस्रायलने थेट त्याची राजधानी तेहरानमध्ये थेट हल्ला चढवून हमासचा प्रमुख नेता इस्माईल हानियेला यमसदनी पाठवून गेले नऊ महिने चाललेल्या गाझा – इस्रायल युद्धाची समीकरणे पुन्हा एकवार पालटून टाकली आहेत. हा हल्ला जरी हमासच्या प्रमुखाला नष्ट करण्यासाठी झाला असला तरी तो इराणच्या भूमीत झाल्याने हमासचे समर्थन करणाऱ्या इराणसाठी देखील ही जणू खुली ललकार आहे. त्यामुळे इस्रायलला प्रत्युत्तर देणारी कारवाई करण्याचे आदेश इराणने दिले आहेत. हमास आणि इस्रायलदरम्यान गाझामध्ये गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष संपविण्यासाठी अमेरिका आणि युरोपच्या मध्यस्थीने चाललेल्या वाटाघाटींच्या प्रयत्नांनाही हा फार मोठा धक्का म्हणावा लागेल. दरम्यान, हानियेच्या हत्येला चोवीस तास उलटतात तोच इस्रायलच्या लष्कराने आपण गेल्या तेरा जुलैला हमासच्या लष्करी आघाडीचा म्हणजेच अल कासम ब्रिगेडचा नेता महंमद देईफ यालाही यमसदनी पाठवल्याचे जाहीर करून टाकले आहे. गेल्यावर्षी सात ऑक्टोबरला हमासने इस्रायलमध्ये जे मृत्यूचे तांडव घडवले, त्याचा सूड घेतल्याविना आपण कदापि गप्प बसणार नाही ह्याची जाणीवच जणू इस्रायलने ह्या दोन्ही सुनियोजित हत्यांमधून हमासला आणि तिच्या पाठीराख्यांना करून दिली आहे. अर्थात, ह्यात इस्रायलने केवढा मोठा धोका पत्करलेला आहे हे सांगण्याची गरज नाही. इस्रायलला आता केवळ हमासचाच धोका नाही, तर हमासची पाठराखण करीत आलेला इराण, लेबनानमधील हिज्बुल्ला आणि येमेनमधील हौथी ह्या सगळ्यांना इस्रायलने अंगावर ओढवून घेतलेले आहे. येणाऱ्या काळात इराण ह्या सगळ्यांच्या मदतीने इस्रायलवर चौफेर हल्ले चढवताना दिसला तर नवल नसेल. परंतु ठोशास ठोसा ह्या आपल्या तत्त्वाबाबत आपण तडजोड करणार नाही हेच इस्रायलने ह्या आक्रमक धाडसी कारवायांतून दाखवून दिले आहे. महंमद देईफ यानेच गेल्या वर्षीच्या सात ऑक्टोबरच्या रानटी हल्ल्याचे सर्व नियोजन व अंमलबजावणी केलेली होती. त्याच्या आधीही त्याने इस्रायलविरुद्ध अनेक हल्ले चढवलेले होते. त्यामुळे इस्रायल गेली तीस वर्षे त्याच्या शोधात होता. अखेरीस खान युनीसमध्ये त्याचा सुगावा लागताच तब्बल नऊशे किलोंचा बॉम्ब टाकून त्याचा असा काही खात्मा केला गेला की त्याच्या चिंधड्याही सापडू नयेत. ज्या ठिकाणी हा बॉम्ब इस्रायलच्या जेट विमानांनी टाकला, तेथे भला मोठा खड्डा पडला आहे. ह्याच आक्रमक नीतीने इस्रायलने हमासच्या प्रमुखाचा म्हणजे इस्माईल हानियेचा थेट इराणमध्ये घुसून काटा काढला. हा हानिये खरे तर कतारमध्ये सुरक्षित ठिकाणी राहून हमासचे नेतृत्व करीत असे. पण तो इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षाच्या भेटीला येणार ह्याची अटकळ इस्रायलला होती. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. इराणच्या नूतन राष्ट्राध्यक्षांच्या भेटीसाठी आलेल्या हनियेने त्यांची भेट घेतली आणि तो इराणच्या सुरक्षा दलांच्या कडेकोट सुरक्षा घेऱ्यात विश्रामधामात होता, परंतु तिथे त्याचा माग काढून इस्रायलने त्याचा काटा काढला हे लक्षात घेण्यासारखे आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता इराणकडून त्यात मोठी त्रुटी राहिली हे तर यातून दिसतेच, परंतु इस्रायल आपल्या शत्रूचा काटा काढण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते हेही यातून स्पष्ट होते. गाझामध्ये हमासविरोधात चाललेल्या संघर्षात आतापर्यंत जवळजवळ चाळीस हजार लोक मारले गेले आहेत व त्यामध्ये आम नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे, परंतु इस्रायलला त्याची फिकीर दिसत नाही. खुद्द आपले जे अडीचशे नागरिक हमासने ओलीस ठेवले होते, त्यापैकी काहींची त्यांनी अत्यंत धाडसी असे आक्रमक हल्ले चढवून सुटका केली खरी, परंतु अजूनही किमान 111 इस्रायली नागरिक हमासपाशी ओलीस आहेत. पण त्याची फिकीर न करता इस्रायलने हमासच्या दोघा बड्या नेत्यांना यमसदनी पाठवले. जो आपल्यावर हल्ला करील, त्याला त्याची दसपट शिक्षा कशी देता येईल ह्याचा विचार हा देश सतत करत असतो. मग त्यासाठी आपल्या नागरिकांचा जीव धोक्यात घालावा लागला तरीही त्याची त्याला तयारी असते. हमासच्या बड्या नेत्यांवरील हल्ले हेच दर्शवतात. परंतु आता ह्याच्या प्रत्युत्तरादाखल इराण आणि इतर हमाससमर्थक संघटना मिळून इस्रायलवर प्रतिहल्ले चढवले जाण्याची शक्यता असल्याने त्यामध्ये आम नागरिकांचा नाहक बळी जाऊ नये हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे असेल. ठोशास ठोसा हे तत्त्व म्हणून अत्यंत प्रभावी ठरते हे खरे असले, तरी त्याची तेवढीच जबर किंमतही चुकवावी लागू शकते. ह्यातून प्रादेशिक युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता पुन्हा एकदा वाढली आहे.