निवडणुकीचा प्रचार आता संपला आहे. प्रचाराचा खूप चांगला अनुभव होता. पूर्ण बहुमत मिळून आपल्या सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला ही गोष्ट अनेक वर्षांनी घडली आहे असे सांगत पुन्हा एकदा पूर्ण बहुमत असलेले सरकार येईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदींनी काल पहिली पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सगळ्या देशाचे आभार मानले. देशाच्या जनतेचा कौल काय येईल ते २३ तारखेला स्पष्ट होणार आहे. देशाच्या विकासाचे निर्णय आम्ही घेतो आहोत. यापुढेही घेऊ असेही मोदी म्हणाले.
यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे मोदींनी टाळले. भाजपात अध्यक्षच सर्व काही असतात असे मोदी उत्तरले. मात्र, पत्रकारांच्या प्रश्नांना अमित शहा यांनी उत्तरे दिली.
माझ्या प्रश्नांची आधी
उत्तरे द्या : राहुल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांमध्ये प्रथमच पत्रकार परिषद घेतली. ही अभूतपूर्व घटना आहे. त्यांनी आधी नोटाबंदी, राफेल घोटाळा, जीएसटी, बेरोजगारी, अनिल अंबानी याप्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असा टोला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला. निकालापूर्वी मोदी पत्रकार परिषद घेत असल्याबद्दल राहुल यांनी आश्चर्यही व्यक्त केले.