पुन्हा घुसमट

0
29

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची सध्या त्यांच्या पक्षात जी उपेक्षा चालली आहे ती खरोखर आश्चर्यकारक आहे. २०१७ च्या निवडणुकीत सतरा आमदार निवडून येऊनही कॉंग्रेसला पाच वर्षे जी गळती लागली, तिला न जुमानता अगदी शेवटपर्यंत पक्षात टिकून राहणारे दिगंबरच होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षासाठी जोरदार काम केले. निधीही मिळवला. परंतु निवडणुकीत पक्षाची सत्ता गेल्याने नाराज झालेल्या कॉंग्रेस श्रेष्ठींनी स्थानिक पक्षसंघटनेच्या फेररचनेचा जो घाट घातला आहे, त्यामध्ये दिगंबर कामतांची जी काही अवस्था करून टाकण्यात आली आहे ती शोचनीय आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर या पराभवाची कारणमीमांसा करून पक्षाची पुनर्रचना झाली पाहिजे अशी जोरदार मागणी दिल्लीत झालेल्या कार्यसमिती बैठकीत झाली होती. जी – २३ गट स्थापन करून पक्षनेतृत्वालाच आव्हान देणारी मंडळी त्यात आघाडीवर होती. त्यांनी पुढे केलेली मागणी खरे तर पक्षश्रेष्ठींनी आता पायउतार व्हावे असेच सूचित करणारी होती. परंतु पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पाच राज्यांच्या निवडणुकांतील पराभवाचे खापर केवळ राज्यस्तरीय नेत्यांवर फोडलेले दिसले. त्यांनी विविध राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे घेतले. तेथे नवी माणसे नेमली आणि हे करीत असताना पक्षाच्या राज्यस्तरीय ज्येष्ठ नेत्यांनाही डावलण्याची नीती अवलंबिली आहे.
गोव्यापुरते बोलायचे तर राज्यातील कॉंग्रेस पक्ष संघटनेची फेररचना करताना नवा प्रदेशाध्यक्ष नेमताना आणि नवा विधिमंडळ गटनेता निवडताना दिगंबर कामतांसारख्या पक्षातील सध्याच्या सर्वांत ज्येष्ठ, अनुभवी नेत्याचे मत विचारातही घेतले जाऊ नये हे काही चांगल्या नेतृत्वाचे लक्षण नव्हे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये स्वार्थ साधत नाही हे दिसताच कॉंग्रेसवासी झालेले मायकल लोबो यांना विधिमंडळ गटनेतेपदी निवडून त्यांनी बार्देशमधून पक्षाला मिळवून दिलेल्या विजयाची बक्षिसी दिली गेली. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दोन वेळा राजीनामा दिलेला असताना नाकारणार्‍या श्रेष्ठींनी निवडणुकीतील पराभवानंतर मात्र त्यांचा राजीनामा मागून घेतला आणि त्याजागी नव्या नेतृत्वाची नेमणूक केली. डाव सुधारण्यासाठी पत्ते पिसले जाण्यात गैर काही नाही, परंतु ते करीत असताना निष्ठेने पक्षासोबत राहिलेल्या नेत्यांना जर उपेक्षिले जाणार असेल, तर त्यातून पक्ष कार्यकर्त्यांत आणि निष्ठावंतांत काय संदेश जाईल?
दिगंबर कामत यांनी आपली ही नाराजी आपल्या समर्थकांपाशी व्यक्त केली आहे आणि ती अनाठायी नक्कीच नाही. त्यांच्या जागी कोणीही असता तरी त्याला असेच वाटले असते. कामत हे संयमी आणि विचारी नेते आहेत. त्यामुळे वाचाळपणे आपली नाराजी त्यांनी चव्हाट्यावर जरी मांडलेली नसली, तरी एकूण देहबोलीतून ती व्यक्त झाल्याशिवाय राहिलेली नाही. रोज भाजपा सरकारविरुद्ध तोफ डागत आलेल्या दिगंबर कामतांच्या ट्वीटर खात्यात गेल्या एक एप्रिलपासून शुकशुकाट आहे. या पार्श्वभूमीवर ते भाजपवासी होणार असल्याच्या वावड्या उडाल्या आहेत.
भाजपमध्ये घुसमट होताच रातोरात कॉंग्रेसवासी झालेले दिगंबर कॉंग्रेसमधील घुसमट मुकाट सहन करणार का? नव्या सरकारचे खातेवाटप जाहीर झालेले असले तरी त्यातील वीजमंत्रिपद मागे ठेवण्यात आलेले आहे. दिगंबर यांच्यासाठी ते राखीव ठेवण्यात आल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. अटीतटीच्या निवडणुकीत साडेतेरा हजार मते मिळवणार्‍या आणि साडे सात हजारांवरची आघाडी घेणार्‍या दिगंबरांसाठी पोटनिवडणुकीतून पुन्हा निवडून येणे काही कठीण नाही. कॉंग्रेसमध्ये भवितव्य नाही हे तर स्पष्टच झाले आहे. भाजप सरकारने डोक्यावर लटकवलेली ‘जायका’ ची टांगती तलवारही अशा पक्षांतरातून हटू शकेल. त्यामुळे कधी नव्हे तो दिगंबरांच्या पक्षांतराच्या वावड्यांनी जोर धरला आहे. यापूर्वीही वेळोवेळी दिगंबर भाजपवासी होणार असल्याच्या चर्चा रंगत आलेल्या होत्या, परंतु प्रत्येकवेळी त्यांनी त्यांचा इन्कार केला आणि राज्यातील एकूण भाजप सरकारविरोधी वातावरण लक्षात घेऊन ते गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे सुकाणू हाती धरून अटीतटीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले. लुईझिन फालेरोंपासून प्रतापसिंह राणेंपर्यंत एकेका नेत्याने पक्षाला दगा दिला तरी ते पक्षासोबत राहिले. मात्र, मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव घोषित करणेही पक्षाने व्यवस्थितपणे टाळले. आता विधिमंडळ गटनेतेपदाची म्हणजे पर्यायाने विरोधी पक्षनेतेपदाची माळ मायकल लोबोंच्या गळ्यात घालण्यात आली आहे ती वेगळीच. या सगळ्या परिस्थितीत, राजकारणात केव्हा काहीही घडू शकते. या घुसमटीचा विचार त्यामुळे कॉंग्रेस नेतृत्वाला गांभीर्याने करावा लागेल.