चीनसह जगातील अनेक देशांत कोरोनाची नवी लाट उसळू लागलेली दिसते आहे आणि त्यामुळे भारतामध्येही साहजिकच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आजवर कोरोनाच्या विविध लाटांना हाताळण्याचा अनुभव गाठीस असलेल्या भारत सरकारने यावेळी या नव्या लाटेचा सामना करण्याची जय्यत तयारी जरी ठेवलेली असली, तरी राज्य सरकारांची नीतीही त्या मार्गदर्शक तत्त्वांना पूरक असणे गरजेचे आहे. गोव्यात सध्या नववर्षाच्या स्वागताची धामधूम आहे. प्रचंड संख्येने देशी व विदेशी पर्यटकांचे लोंढे गोव्यात दाखल होत आहेत. समुद्रकिनारे गर्दीने फुलून गेलेले आहेत. अशावेळी योग्य खबरदारी घेण्यात कसूर झाली, तर त्यातून काय घडते, हे खरे तर गेल्यावेळीही गोव्याने अनुभवलेले आहे. तेव्हाही वर्षअखेरीस राज्यात संपूर्ण बेफिकिरी दाखवली गेली, ज्याचा परिणाम म्हणून नववर्षाची धामधूम आटोपताच कोरोनाची नवी लाट उसळलेली पाहायला मिळाली होती. यावर्षी अशा प्रकाराची पुनरावृत्ती होऊ द्यायची नसेल, तर राज्य सरकारनेही केंद्राच्या आदेशाबरहुकूम जबाबदारीने वागायला हवे. काल जुवारी पुलाच्या उद्घाटनाचा मोठा सोहळा झाला. त्यापूर्वी पूल जनतेला पाहण्यासाठी म्हणून खुला केला गेला होता. हा पूल आता रोज येता-जाता दिसणार आहेच. कोरोना उचल खात असताना, तो पाहण्याचा सोहळा कशाला हवा होता? हा असला बेजबाबदारपणाच राज्याला संकटाच्या खाईत ढकलत असतो. पर्यटकांच्या नववर्ष स्वागतासाठीच्या सहलीत कोठेही कमतरता राहू नये यासाठी सरकार ३१ डिसेंबरपर्यंत जनतेवर कोणतेही निर्बंध घालू इच्छित नाही. पूर्वी सरकारला चुना लावून गेलेले सनबर्नसारखे सोहळे भरवू दिले जात आहेत. त्यात नशेत नाचणारी मंडळी धुडगूस घालून परत जातील, परंतु त्यात कोरोना फैलाव झाला तर त्याचे परिणाम स्थानिक जनतेला भोगावे लागू शकतात. सध्या जगभर फैलावत असलेल्या ओमिक्रॉनच्या बीएफ.७ या व्हेरियंटची अत्यंत तीव्र संसर्गजन्यता लक्षात घेता, कोरोनाची नवी लाट उसळण्यास ही बेफिकिरी कारणीभूत ठरू शकते याचे भान राज्य सरकारने ठेवणे नितांत गरजेचे आहे.
सध्या केंद्र सरकारने ज्या देशांत कोरोनाची लाट उसळलेली आहे अशा देशांतून येणार्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे रँडम स्क्रीनिंग सुरू केले आहे. म्हणजेच येणार्या प्रवाशांची विमानतळावर चाचणी केली जात आहे, परंतु येणार्या प्रवाशांपैकी केवळ दोन टक्के प्रवाशांचीच ही चाचणी आहे हे लक्षात घ्यायला हवे. त्यातूनही चाळीसहून अधिक प्रवासी विविध विमानतळांवर कोरोनाबाधित सापडले आहेत. कोरोनाचा हा व्हेरियंट पूर्वीच्या व्हेरियंटपेक्षा कितीतरी पट अधिक संसर्गजन्य आहे असे विषाणूतज्ज्ञ सांगत आहेत. याची एक संसर्गबाधित व्यक्ती कमीत कमी दहा ते पंधरा जणांना बाधित करू शकते. ओमिक्रॉनच्या पूर्वीच्या व्हेरियंटमध्ये ही सरासरी केवळ पाच होती. या विषाणूचा इन्क्युबेशन पिरियडही पूर्वीच्या व्हेरियंटच्या तुलनेत खूप कमी आहे. त्यामुळे कोरोनातून बाहेर पडल्याचा भारतीयांचा आनंद तर हिरावला गेला आहेच, परंतु उद्या काय घडेल या चिंतेची टांगती तलवारही डोक्यावर लटकू लागली आहे. कोरोना नवनव्या व्हेरियंटद्वारे मानवी प्रतिकारशक्तीवर मात करून संसर्गबाधा करीत असतो. लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही हा नवा व्हेरियंट बाधित करीत असल्याचे समोर आलेले आहे. मात्र, या संसर्गबाधेचे स्वरूप किती गंभीर आहे हे अद्याप स्पष्ट नाही. हा व्हेरियंट भारतात गेल्या ऑक्टोबरपासून आहे, परंतु सर्व बाधित बरे झाले आहेत. मात्र, ज्या चीनमध्ये या व्हेरियंटच्या लाटेने कहर माजवला आहे, तेथे मृत्यूचे तांडव सुरू आहे. तेथील लशी आणि आपल्याकडील लशी या वेगळ्या आहेत. शिवाय भारतीयांचे जवळजवळ संपूर्ण लसीकरण झालेले आहे. त्यामुळे या व्हेरियंटचे जे अक्राळविक्राळ रूप चीनमध्ये दिसते, तशाच स्वरूपात ते भारतात दिसेल असे बिलकूल नव्हे, परंतु तरीही सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्याची ही वेळ आहे. पुरेशा औषधसाठ्यापासून इस्पितळांत प्राणवायूच्या उपलब्धतेपर्यंतची सज्जता करण्यासाठी सध्या हाती असलेल्या अवधीचा प्रभावी वापर झाला पाहिजे. जे कोरोनाबाधित आढळत आहेत, त्यांच्या विषाणूचे जिनॉम सिक्वेन्सिंग जेवढे अधिक प्रमाणात होईल, तेवढी त्या विषाणूबाबत अधिक माहिती मिळू शकेल. त्यामुळे त्या दिशेने प्रयत्न झाले पाहिजेत. आपल्याकडील विषाणूचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले गेल्यानंतर अहवाल येईपर्यंत काही महिने जातात. अशाने प्रतिबंधात्मक उपाययोजना परिणामकारक ठरू शकत नाहीत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला धुडगूस घालून एकमेकांना नववर्षाच्या शाब्दिक शुभेच्छा देण्यापेक्षा जबाबदारीने कोरोनाचे भान राखणारे वर्तन केले, तर नववर्ष खर्या अर्थाने सुखाचे जाईल.