अरुणाचल प्रदेशातील अकरा ठिकाणांना आपल्या नकाशात चिनी नावे देऊन चीनने भारताची पुन्हा एकदा कुरापत काढली आहे. भारतीय भूप्रदेशातील ठिकाणांचे नामांतर करण्याची चीनची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही दोन वेळा चीनने असा प्रयत्न केला होता. 2017 साली सहा ठिकाणांचे आणि 2021 साली पंधरा ठिकाणांचे नामांतर अशाच प्रकारे चीनने केले होते. आता त्यात आणखी अकरा ठिकाणांची भर घातली आहे. नामांतर केलेल्या ठिकाणांत पाच पर्वतशिखरे आहेत, दोन नद्या आहेत, दोन भूभाग आहेत, तर दोन गावे आहेत. अगदी अरुणाचल प्रदेशची राजधानी असलेल्या इटानगरजवळच्या ठिकाणाचेही चिनी नामांतर करण्यापर्यंत चीनची मजल गेली आहे. नकाशात कोणतीही नवी नावे जरी दिली, तरी प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती बदलत नसते. अरुणाचल प्रदेश हा एकात्म भारताचा भाग आहे हे भारताने वेळोवेळी ठणकावून सांगितलेले आहे. गेल्या डिसेंबरमध्ये याच अरुणाचलच्या तवांग प्रांतात यांगत्सेमध्ये तीनशे चिनी सैनिकांनी अचानक भारतीय हद्दीत घुसखोरी केली, तेव्हा भारतीय सैन्याने त्यांना शौर्याने पिटाळून लावले होते ही घटना तर ताजीच आहे. एकीकडे भारताशी मैत्री वृद्धींगत करण्याची भाषा करणारा चीन दुसरीकडे भारताची कुरापत काढायची एकही संधी सोडताना दिसत नाही. गलवान असो, गोग्रा असो, पँगाँग त्सो असो किंवा यांगत्से असो, लडाखपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत प्रत्येक ठिकाणी भारतीय भूप्रदेशावर दावे करीत चीनने तो विवादित विषय बनवलेला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा स्पष्टपणे निर्धारित केली गेलेली असताना भारतीय भूप्रदेशावर दावा करण्याचे आणि घुसखोरी करण्याचे प्रयत्न सातत्याने चीन करीत आहे, त्यामुळे भारतानेही आता चीन सीमेकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. चीनच्या कोणत्याही आक्रमणास तोंड द्यायला आपण समर्थ आहोत असे संरक्षणमंत्री म्हणत आहेत ते उगाच नव्हे.
अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्येचे अगदी टोकाचे दुर्गम राज्य. ब्रिटिशांच्या काळात या भागाला नॉर्थ ईस्ट फ्रंटियर प्रोव्हीन्स किंवा नेफा प्रांत म्हणायचे. भारतीय भूप्रदेशावर उगवणारा सूर्य पहिल्यांदा येथे आपले दर्शन देतो. महाभारतकाळापासून त्या प्रदेशाची, तेथील प्रभुपर्वताची वर्णने आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये आहेत. भगवान व्यासांनी तेथे ध्यान केल्याचे वर्णन आहे. परशुराम पापक्षालनार्थ अरुणाचल प्रदेशात गेला होता अशीही एक कथा आहे. त्या प्रदेशाचे भारतीयत्व असे प्राचीन ग्रंथांमधून प्रकटत असताना चीन मात्र अजूनही त्या प्रदेशाला दक्षिण तिबेटचा भाग मानते. सध्या जे अकरा ठिकाणांचे नामांतर चीनने आपल्या नकाशात केले आहे, त्यातही अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग म्हणजे ‘झंगनान’ म्हणून दाखवलेला आहे. स्थलनामे बदलण्याची ही कृती केवळ लहर आली म्हणून चीन करीत नाही. भविष्यात कधी अरुणाचल प्रदेशचा सीमावाद आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला, तर आपली बाजू बळकट करण्यासाठीच चीन या सर्व ठिकाणांचे नामांतर करून ठेवतो आहे की, ज्याद्वारे ही सगळी ठिकाणी आपली असल्याचे सांगता यावे. नुकतीच इटानगरमध्ये जी 20 परिषदेच्या अनुषंगाने सदस्य राष्ट्रांची बैठक झाली, त्यालाही चीनचा प्रतिनिधी अनुपस्थित राहिला हे उल्लेखनीय आहे. म्हणजेच भारताच्या भूभागावर दावा करून आणि जमले तर तो बळकावून आपले विस्तारवादी धोरण पुढे रेटण्याच्या प्रयत्नात चीन आहे. त्यामुळे त्याला तशाच प्रकारे काटशह देण्याची गरज आहे. यापूर्वी जेव्हा चीनने भारताची कुरापत काढली आणि आपल्या जवानांचा बळी घेतला, तेव्हा भारत सरकारने चीनच्या आर्थिक नाड्या आवळल्या. चिनी ॲप्सवर बंदी घातली, चिनी उद्योगांना दणका दिला. त्यामुळे आता देखील चीन जर अशीच वळवळ करायला लागला, तर ही अरेरावी मुकाट सहन न करता चीनच्या आर्थिक नाड्या यथास्थित आवळाव्या लागतील. सध्या जी 20 देशांच्या परिषदेचे अध्यक्षपद भारतापाशी आहे. येत्या जुलैमध्ये एससीओ परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारत दौऱ्यावर यायचे आहेत. गेल्या महिन्यात चीनचे विदेशमंत्री भारतभेटीवर येऊन गेले होते. दोन्ही देशांदरम्यान सीमाविवादांवर लष्करी चर्चा, बैठका तर सुरूच असतात. असे असूनही अशा प्रकारे पुन्हा पुन्हा भारताची कुरापत काढली जाणार असेल, तर चीनसंदर्भात खमकी नीती भारताने स्वीकारावी लागेल. अर्थात, चीनच्या सामरिक ताकदीशी आपली तुलनाच होऊ शकत नाही. परंतु आर्थिक आघाडीवर आपण चीनचा बंदोबस्त करू शकतो. पण त्यासाठी चीनसंदर्भातील दुटप्पी नीती सोडून आपल्याला आधी आपले त्यांच्यावरील अवलंबित्व टप्प्याटप्प्याने कमी करावे लागेल. तरच आपण अशआ कुरापतखोरीला भविष्यात चोख प्रत्युत्तर देऊ शकू.