दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या द्वितीय स्मृतीदिनी उद्धव व राज ठाकरे यांच्यात झालेल्या गप्पांचे पडसाद महाराष्ट्रातील समाजजीवनात जोराने उमटू लागले आहेत. दोघांमधील कटुता मिटण्याचे संकेत यातून मिळत आहेत आणि त्यातून महाराष्ट्राच्या हिताचे काही घडू शकते अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होऊ लागल्याचे दिसते आहे. अशा प्रकारची अपेक्षा ही ‘बुद्धी गहाण टाकल्या’चे प्रतीक असल्याचा साक्षात्कार काही तथाकथित स्वयंघोषित विचारवंतांना झाला असला, तरी हे दोघे बंधू जर एकत्र येत असतील, तर त्यातून महाराष्ट्राचे अहित घडवणारे काही होणार नाही हे निश्चित. एका नव्या राजकीय समिकरणांची निर्मिती त्यातून होऊ शकते हे मात्र खरे. उद्धव आणि राज यांच्या या भेटीतून एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली याला काही ठळक कारणे आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवाजी पार्कवरील राज यांची उपस्थिती हा निव्वळ उपचार होता असे दिसले नाही. गेल्या वर्षी त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणे हाकेच्या अंतरावर आपले घर असूनही टाळले होते. मात्र, यंदा राज तेथे उपस्थित राहिले एवढेच नव्हे, तर उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जाऊन त्यांना भेटले. राज यांनी त्यांच्या खुर्चीवर मागील बाजूने सलगीने हात ठेवल्याची छायाचित्रेही सर्वत्र प्रसिद्ध झाली आहेत. राज यांची ही देहबोली काही निश्चितपणे सांगते आहे. नुसता उपचार म्हणून ते भेटले असते, मनात कटुता कायम असती, तर ज्या प्रकारे दिलखुलास गप्पा झाल्या, खळखळून हसणे झाले ते झाले नसते. नुसते हस्तांदोलन करून वा चार दोन वाक्ये बोलून राज मागे फिरले असते, परंतु तसे झाले नाही. दोघांनी आस्थेने गप्पा मारल्या, सेनेचे नेतेही त्यात सामील झाले याचा अर्थ राज आणि उद्धव यांच्या पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चेला तोंड फुटावे यासाठीच हे जाहीर गप्पाष्टक पार पाडले गेले. राज ठाकरे सध्या आपले राजकीय अस्तित्व चाचपडत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मनसेचा भ्रमाचा भोपळा फुटला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत राज यांनी प्रयत्नांची शिकस्त करूनही त्यांचा केवळ एक उमेदवार निवडून येऊ शकला. बाकी सर्वत्र त्यांच्या उमेदवारांना आणि नेत्यांना मानहानीकारक पराभव पत्करावे लागले. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी राज नरेंद्र मोदी यांचे गुणगान करीत होते. भाजपापासून दूर राहणार, पण आपले उमेदवार निवडून आले तर मोदींनाच पाठिंबा देणार अशी विचित्र भूमिका राज यांनी तेव्हा घेतली होती. या विधानसभा निवडणुकीच्यावेळी राज मोदींवर तुटून पडले. एकीकडे शिवसेना आणि भाजप यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आणि सेनेचा तोल सुटला होता. मोदी, अमित शहा वगैरेंवर शेलकी टीका सेना नेत्यांनी केली. राज यांनी त्याला आपल्या टोलेबाजीची जोड दिली. मात्र, त्यातून सेना आपले ६३ उमेदवार निवडून आणू शकली आणि राज यांचे मात्र हसे झाले. त्यानंतरच्या एकूण राजकारणात भाजपाने सेनेची उपेक्षा आणि अवमान याचे सत्र चालवले. परिणामी अगदी काल सेनेने आपल्या मुखपत्रातून ‘‘यापुढे आमच्याकडून अपेक्षा ठेवू नका’’असे भाजपला सुनावले होते. पण शरद पवार यांच्या ताज्या वक्तव्यातून पुन्हा सेनेच्या आशेला पालवी फुटलेली दिसते. ज्यांच्या जोरावर भाजपने शिवसेनेला पदोपदी अवमानित केले, ते राष्ट्रवादीचे चाणक्य शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा संदेश दिला आहे. महाराष्ट्रातील अल्पमतातील सरकारचे स्थैर्य त्यांच्या पाठिंब्यावर अवलंबून असतानाही पवार हे सांगतात याचा अर्थ स्पष्ट आहे. त्यामुळे आता या संधीचा लाभ घेत शिवसेना पुन्हा भाजपाशी संधान जुळवून सत्तेत येण्यास उत्सुक आहे. मात्र, त्यासाठी पहिले पाऊल भाजपनेच टाकावे अशी त्यांची अपेक्षा आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांनी स्वतःहून उद्धव यांच्यापर्यंत जाऊन गप्पा मारल्या, खुर्चीवर सलगीने हात ठेवला आणि मनोमीलनाचे संकेत दिले, तरी शिवसेना नेते या संदर्भात अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेणार आहेत असे सांगतात याचा अर्थ तेथेही शिवसेना आपली प्रतिमा उंचावलेलीच ठेवू पाहते आहे. राज शिवसेनेकडे आले, भाजप शिवसेनेकडे आली अशी शेखी त्यांना मिरवायची आहे. अर्थात आपली ही वरचढ वृत्ती बदलण्याची सेनेची तयारी असेल, तरच त्यांना हव्या असलेल्या गोष्टी घडू शकतात!