पुन्हा आयसिस

0
8

नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात लोक असताना अमेरिकेच्या न्यू ऑर्लियन्समध्ये गर्दीमध्ये वाहन घुसवून
कित्येकांचा घेतला गेलेला बळी आणि न्यूयॉर्कमध्ये एका नाईटक्लबमध्ये अंदाधुंद गोळीबारात केली गेलेली अनेकांची हत्या ह्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनांनी सन 2025 ची भीषण सुरूवात झाली आहे. याच वेळी लास वेगासमध्ये ट्रम्प टॉवरसमोर एका वाहनात बॉम्बस्फोटही झाला. म्हणजेच एकीकडे जग नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आतुर असताना आणि त्यापासून आशाआकांक्षा बाळगून राहिले असताना, दहशतवादाचा मार्ग पत्करलेल्या रानटी प्रवृत्ती मात्र ह्या सुसंस्कृत जगापासून पूर्ण फारकत घेत मृत्यूचे तांडव माजवणे पसंत करू लागलेल्या ह्या घटनांतून पाहायला मिळाल्या. न्यू ऑर्लियन्समध्ये गर्दीत घुसवल्या गेलेल्या ट्रकवर आयसिसचा झेंडाही लावलेला होता. ह्या हल्लेखोराची ओळखही पटली असून त्याचे नाव शमसुद्दिन जब्बार असे आहे. आता हा दहशतवादी हल्ला त्याने स्वतःहून एकट्याने केला की एखाद्या संघटित संघटनेसाठी त्याने तो केला हे तपासातूनच स्पष्ट होऊ शकेल, परंतु जिहादी दहशतवादाचे सावट जगावर अजूनही कायम आहे ह्याची प्रखर जाणीव मात्र ह्या घटनांनी करून दिली आहे. दहा दिवसांपूर्वीच जर्मनीमध्ये अशाच प्रकारे गर्दीत वाहन घुसवून अनेकांना ठार मारले गेले होते. त्याचीच पुनरावृत्ती न्यू ऑर्लियन्समध्ये झाली आणि त्यात निरपराध माणसे नाहक बळी गेली. आयसिसच्या विचारधारेने प्रेरित होऊन आपण हे कृत्य केल्याचे शमसुद्दिन म्हणत आहे. आयसिसचा जन्म होऊन त्याने जगाला दहशतवादाच्या सावटाखाली आणले त्याला आता एक दशक उलटून गेले आहे. इराक आणि सीरियामधील यादवीचा फायदा उठवत तेथील भूप्रदेश त्या संघटनेने बळकावले आणि खिलाफत सुरू केली, तेव्हापासून जगाला त्याच्या धोक्यांची जाणीव झाली होती. ह्या आयसिसची पाळेमुळे खणून काढण्यासाठी महासत्तांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली. प्रदीर्घ युद्धानंतर आयसिसच्या ताब्यातील प्रदेश परत मिळवता आले. मात्र, तोवर त्यांनी स्थानिक मूळ निवासी जमातींवर प्रचंड अत्याचार केले, महत्त्वाच्या वास्तू उद्ध्वस्त केल्या. सुसंस्कृततेला काळीमा फासणारी कृत्ये केली. दहशतवाद हा एखाद्या देशापुरता वा भागापुरता सीमित उरला नाही. तो कोठेही, कठीही, कशीही चाहुल देऊ शकतो ही जाणीव जगाला पुढील काळात झाली. दहशत माजवण्याचे नवनवे मार्ग अवलंबिले गेले, त्याद्वारे सामान्य नागरिकांमध्ये दहशत माजली. ‘लोन वूल्फ’चे हल्ले म्हणजेच एकांड्या शिलेदारांचे हल्ले ही बाब युरोपमध्ये वारंवार दिसून आली. कोण्या तरी माथेफिरूने अचानक उठायचे आणि आपण निवडलेल्या ठिकाणी, निवडलेल्या वेळेस हल्ला चढवून मोकळे व्हायचे असे धोकादायक प्रकार वाढीस लागले. संघटित दहशतवादाचा मुकाबला करणे तुलनेने सोपे असते, कारण कोठे तरी कोठून तरी एखादा माहितीचा स्रोत हाती लागतो आणि त्यातून अशा दहशतवादी कृत्यांस रोखण्यासाठी प्रयत्न तरी करता येतो, परंतु एकांड्या व्यक्तींकडून मात्र कधी कुठे कशा प्रकारे दहशतवादी हल्ला होईल ह्याची कल्पनाही करता येत नाही. त्याचाच फायदा घेत जगभर अशा प्रकारच्या हल्ल्यांचे पेवच फुटले. काल नववर्षाच्या प्रारंभी झालेले दहशतवादी हल्ले हे अशाच प्रकारचे एकांड्या हल्लेखोरांनी केलेले हल्ले आहेत की त्यामध्ये काही सूत्रबद्धता आणि परस्परसंबंध आहे ह्याचा तपास सुरक्षा यंत्रणांना करावा लागणार आहे. न्यू ऑर्लियन्समधील हल्ला आणि लास वेगासमधील बॉम्बस्फोट यांचा परस्परांशी संबंध असावा असा संशय तपास यंत्रणांना आहे, कारण एका विशिष्ट ॲपवरून ह्या दोन्हींसाठी लागणाऱ्या गोष्टी भाड्याने घेतल्या गेल्या होत्या अशी माहिती मिळाली आहे. काही असो, आयसिसचे भूत अजून गाडले गेलेले नाही ह्याची जाणीव नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जगाला ह्या घटनांनी करून दिलेली आहे. आयसिसपाशी आज भले त्यांचा स्वतःचा असा भूप्रदेश शिल्लक राहिलेला नसेल, अल कायदाप्रमाणेच त्यांचे नेतृत्वही नेस्तनाबूत करण्यात महासत्तांना यश आले असेल, परंतु ती विचारधारा आणि तिने प्रेरित होऊन दहशतवादासारख्या अमानवीय, अराष्ट्रीय कृत्यांना अमलात आणण्यास धजावणारे माथेफिरू यांना रोखण्यात जगाला अजूनही यश आलेले नाही. कर्मठ, धर्मांध गटांमधून असे माथेफिरू अधूनमधून निपजत आहेत. दहशतवादी कृत्यांनी आपले आणि आपल्या सैतानी विचारधारेचे अस्तित्व दाखवून देत आहेत. दहशतवादाच्या ह्या संकटाचा मुकाबला करायचा असेल तर त्यासाठी संपूर्ण जगाने, प्रत्येक देशाने स्वार्थ त्यागून एकत्र यावे लागेल आणि मतभेद विसरून मानवहिताच्या व्यापक भावनेतून दहशतवादावर घाव घालावा लागेल. परंतु अशा प्रकारची आदर्श स्थिती कधी उत्पन्न होणार हाच प्रश्न आहे.