गोव्यातील विद्यमान सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान धोरणाला नुकतीच राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे आणि येत्या रविवारी केंद्रीय मंत्री रविशंकरप्रसाद यांच्या हस्ते या धोरणाचे अनावरण होणार आहे. गोवा ही माहिती तंत्रज्ञानाची पंढरी बनवणे आणि या क्षेत्रामध्ये गोमंतकीयांसाठी आठ ते दहा हजार नोकर्या निर्माण करणे अशी दोन स्वप्ने राज्य सरकारने आपल्या या प्रस्तावित धोरणातून गोव्याच्या तरुणाईला दाखवली आहेत. अर्थात, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासंदर्भात गोमंतकीयांना अशा घोषणा नव्या नाहीत. अगदी दयानंद नार्वेकर, रमाकांत खलप यांच्या मंत्रिपदाच्या काळापासून दिगंबर कामत, मनोहर पर्रीकर, लक्ष्मीकांत पार्सेकरांच्या कारकिर्दीपर्यंत गोव्याला माहिती तंत्रज्ञानाची पंढरी बनवण्याच्या घोषणा आजवर अनेकदा होत आल्या. मात्र, अजूनही गोव्याचे भवितव्य बदलून टाकू शकणारे या क्षेत्रातील प्रस्तावित प्रकल्प पूर्णत्वास येऊ शकलेले नाहीत. आयटी हॅबिटॅटची पहिली घोषणा २००७ साली झाली होती, परंतु गोव्याच्या तरुणाईचे आशास्थान असलेले अशा प्रकारचे सारे प्रयत्न या ना त्या कारणाने एक तर वादाच्या भोवर्यात किंवा राजकीय विरोधाच्या वावटळीत सापडले आणि लयाला गेले. त्यांची प्रस्तावित ठिकाणे फक्त बदलत राहिली. कधी दोनापावला, कधी तुये, कधी मांद्रे, कधी चिंबल अशा एकेका ठिकाणांचे वायदे होत राहिले तरी अजूनपर्यंत गोमंतकीय तरुणाईचे हे स्वप्न काही साकार होऊ शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर विद्यमान सरकारने पुन्हा एकवार माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये गोव्याची कधीच चुकलेली बस गाठायची धडपड आपल्या ह्या नव्या धोरणाद्वारे चालवली आहे. आजूबाजूच्या पुणे, हैदराबाद, बेंगलुरू सारख्या शहरांनी माहिती तंत्रज्ञानाचा देशात जोर असताना संधी साधली आणि ती शहरे केव्हाच पुढे निघून गेली. आज माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा तो जोर जागतिक पातळीवर ओसरताना दिसतो आहे आणि अशावेळी आपला गोवा हे आयटी पंढरीचे स्वप्न नव्याने पाहतो आहे. नव्वदच्या दशकात जेव्हा माहिती तंत्रज्ञान उद्योगाला देशामध्ये सुरवात झाली तेव्हा एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत त्याचे योगदान जेमतेम १.२ टक्के होते. आता ते सात साडेसात टक्क्यांच्या वर जाऊन पोहोचलेले आहे. विदेशी कंपन्या आऊटसोर्सिंगसाठी भारताकडे वळल्या आणि बघता बघता हे क्षेत्र विस्तारले. पण आज मात्र पुन्हा एकवार परिस्थिती पालटताना दिसते आहे. मध्यंतरी ‘हेडहंटर्स’ या सल्लागार संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात आयटी उद्योगाचा बहर ओसरला असून बड्या बड्या कंपन्या तिमाहींमध्ये तोटा दाखवू लागल्याने त्या आता नोकरभरती तर दूरच, नोकरकपातीच्या मागे लागल्या आहेत असे दाखवून दिले होते. अमेरिकेचे ‘अमेरिका फर्स्ट’ धोरण, ‘एच१बी’ व्हिसावर घातलेले निर्बंध अशा अनेक कारणांचा फटका या उद्योगातील आऊटसोर्सिंगला बसला. त्याची परिणती म्हणून भारतामध्ये दरवर्षी या क्षेत्रातील पावणे दोन ते दोन लाख नोकर्या गमवाव्या लागणार आहेत असे ‘हेडहंटर्स’चे म्हणणे होते. काही महिन्यांपूर्वी हैदराबादेत या क्षेत्रातील तरुणांनी निदर्शनेही केल्याचे आपल्याला आठवत असेल. खरे तर आज आयटी हे खासगी क्षेत्रातील सर्वाधिक रोजगार पुरवणारे क्षेत्र आहे, परंतु हे चित्र आता बदलू लागले आहे. आयटीचे स्वप्न विरू लागले आहे ही वस्तुस्थिती नाकारण्यात अर्थ नाही. या पार्श्वभूमीवर गोवा या क्षेत्रामध्ये विविध सवलती देऊ करून माहिती तंत्रज्ञान उद्योगाला गोव्याकडे आकर्षित करण्याची धडपड ह्या धोरणाद्वारे करू पाहतो आहे. गोव्यामध्ये माहिती तंत्रज्ञान प्रकल्प उभारणार्यांना बांधकामक्षेत्रात सवलत, भाडेपट्टीत सवलत, भांडवली गुंतवणुकीत मदत, वेतनावर अनुदान, वीज, इंटरनेट, मुद्रांक शुल्क आदी बाबतींत सवलत अशा अनेक घोषणा सरकारने केल्या आहेत. गोव्यातून तरुणाईचे बाहेर होणारे स्थलांतर थांबवून त्या तरुणाईला पुन्हा गोव्यात आणण्याचे स्वप्न सरकार या धोरणातून पाहते आहे. माहिती तंत्रज्ञान उद्योगांसाठी टेक्नोलॉजी पार्क, सुसज्ज तयार संकुले, प्रशिक्षणासह इन्क्युबेशन सेंटर्स, प्लग अँड प्ले सुविधा अशा अनेक गोष्टींचा वायदा सरकारने या धोरणात केलेला आहे. आल्तिनोवरील आयटी हबच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना तत्कालीन मुख्यमंत्री पार्सेकर गोवा येत्या काही वर्षांत आयटीच्या क्षेत्रात दाक्षिणात्य राज्यांना मागे टाकील असे उद्गारले होते. गेल्या निवडणुकीत त्यांचे सरकार गेले आणि ते प्रकल्पही रेंगाळले. नव्या सरकारने नव्याने गोमंतकीय तरुणाईला आयटीचे स्वप्न दाखवायला सुरूवात केली आहे. मध्यंतरी स्टार्ट अप धोरण सरकारने जाहीर केले होते. आता माहिती तंत्रज्ञान धोरण येते आहे. कागदोपत्री ही धोरणे अत्यंत आकर्षक आहेत याविषयी शंकाच नाही, परंतु प्रत्यक्षात जेव्हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक तरी बडी कंपनी गोव्याकडे आपला मोहरा वळवील आणि येथील स्थानिक तरुणाईच्या भरतीसाठी वर्तमानपत्रांतून जाहिराती झळकतील तेव्हाच या स्वप्नपूर्तीची चाहुल गोमंतकीयांना लागेल. आपण त्या दिवसाची वाट पाहूया!