भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून पायउतार करून सत्ता हस्तगत करण्यासाठी उतावीळ झालेल्या कॉंग्रेसचा कालच्या निकालांनी दारूण अपेक्षाभंग केला. आतापर्यंत भाजपविरोधी आघाडीत शिरण्याची भाषा करीत आलेल्या मगोने मात्र संधिसाधूपणाची कमाल करीत निकालानंतर काही तासांतच कोलांटउडी घेत भाजप सरकारला पाठिंबा जाहीर केला. अर्थात, भाजपला स्पष्ट बहुमत जरी मिळू शकलेले नसले तरी घसघशीत २० जागा मिळालेल्या असल्याने आणि अपक्षांचा पाठिंबा मिळवण्यात तो पक्ष आधीच सफल ठरलेला असल्याने मगोशी सौदेबाजी करण्याची त्याला गरज वाटत नाही. उलट पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करून लवकरच मगोची दोन शकले केली गेली तरी आश्चर्य वाटू नये.
भाजपविरोधकांची एकजूट बांधण्याचा प्रयत्न न करता उलट त्यात खो घालत स्वबळाचा तोरा दाखवत आलेल्या कॉंग्रेसने या मतविभाजनातून आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे.
या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे ते रिव्हल्युशनरी गोवन्स या पक्षाचे गोव्याच्या राजकारणातील दमदार पदार्पण आणि आम आदमी पक्षाने विधानसभेत खोललेले खाते. सांत आंद्रेची जागा आरजीने जिंकली आणि वाळपई आणि नुवेमध्ये तो नवखा पक्ष दुसर्या स्थानी आलेला आहे. सहा मतदारसंघांमध्ये त्याची कामगिरी चमकदार आहे. आरजी हा प्रस्थापित राजकीय पक्षांच्या पठडीतला पक्ष नव्हे. ती मूलतः युवकांची एक संघटना आहे आणि प्रादेशिकत्वाचा आग्रह ही त्याची एकमेव विचारधारा आहे. अशा प्रादेशिकतावादी संघटनेला गोव्याच्या राजकारणात मिळालेले स्थान आणि पाठिंबा गोमंतकीय मतदारांची विशेषतः युवकांची प्रस्थापित राजकारण्यांबाबतची हताशाच अधोरेखित करीत आहे असे निश्चितपणे म्हणता येते.
आम आदमी पक्षाने यश मिळवले असले तरी त्यात त्यांच्या भंडारी मुख्यमंत्री करण्याच्या आश्वासनाचा काही वाटा दिसत नाही. बाणावलीत पक्षाला जो विजय मिळाला आहे, त्यात तेथील स्थानिक कार्याचा वाटा आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीतही तेथे पक्षाला यश प्राप्त झालेले होते. २०१७ च्या निवडणुकीतही बाणावलीत व्हेन्झी व्हिएगश यांनी चार हजार मते मिळवलेली होती. तेच वेळ्ळीच्या जागेबाबतही म्हणता येईल. वेळ्ळीत २०१७ च्या निवडणुकीतही आपच्या क्रुझ सिल्वांनी तेथे साडे तीन हजार मते मिळवलेली होती. त्यामुळे त्या दोघांच्या सातत्यपूर्ण कामावर मतदारांनी विश्वास व्यक्त करीत तेथील जुन्या धेंडांना घरी बसवले आहे. या निवडणुकीत फार मोठा गदारोळ करीत उतरलेल्या तृणमूल कॉंग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही, पण मगो आणि आपच्या खालोखाल ५.२१ टक्के मते मिळाली आहेत. भारतीय जनता पक्षाच्या जागा तर निवडणूकपूर्व आयातीच्या जोरावर गेल्यावेळच्या पेक्षा वाढल्या तर आहेतच, पण त्यांची मतेही ३२.९ टक्क्यांवरून यावेळी ३३.३१ टक्क्यांवर पोहोचली आहेत. कॉंग्रेसच्या जागाही घटल्या आणि मतेही २८.७ वरून २३.४६ टक्क्यांवर आली आहेत. याचाच अर्थ गोव्यात अवतरलेल्या आप आणि तृणमूलने कॉंग्रेसचाच जनाधार कमकुवत केला आहे. स्वबळाचा आग्रह न धरता कॉंग्रेसने या पक्षांशी तडजोड केली असती तर निश्चितपणे त्याचा फायदा पक्षाला झाला असता.
या निवडणुकीतील बहुतेक मतदारसंघांमध्ये अत्यंत अटीतटीच्या लढती झाल्या. बहुसंख्य उमेदवारांची विजयी आघाडी अत्यल्प आहे. त्यामध्ये दिवसभरात चढउतार दिसून आले. पराभूत उमेदवारांतही दुसरी जागा प्राप्त करण्यासाठी जोरदार चढाओढ पाहायला मिळाली. तासातासाला उमेदवारांचे मताधिक्क्य मागेपुढे होताना पाहायला मिळाले. हळदोणे, डिचोली, काणकोण, पणजी, फोंडा, प्रियोळ, सांगे, शिवोली, सांत आंद्रे, म्हापसा आणि खुद्द मुख्यमंत्र्यांच्या साखळीतही जोरदार संघर्ष झाल्याचे दिसले. बाणावली, कुंकळ्ळी, मडकई, नावेली, पर्वरी, वेळ्ळी आदी मतदारसंघांमध्ये दुसर्या स्थानासाठीही चढाओढ दिसली. विश्वजितनी आपल्या पत्नीला भरघोस मताधिक्क्य पर्येत जरूर मिळवून दिले, पण खुद्द वाळपईत त्यांच्याशी आरजीसारख्या नवख्या पक्षाने जोरदार संघर्ष केला. देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पणजीच्या लढतीत बाबुश मोन्सेर्रातना उत्पल पर्रीकरांनी जबरदस्त टक्कर दिली. मायकल लोबोंनी पत्नीला शिवोलीतून निवडून आणले खरे, परंतु त्यासाठी त्यांना तेथे मोठी अटीतटीची झुंज द्यावी लागली.
मतदार कार्यक्षम उमेदवारांच्या पाठीशी राहतात हे या निवडणुकीतही दिसून आले आहे. दिगंबर कामत, सुदिन ढवळीकर, विश्वजित राणे, मायकल लोबो, रोहन खंवटे, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स अशा नेत्यांच्या मागे लोक राहतात ते त्यांच्या कार्यक्षमतेमुळे. आलेक्स रेजिनाल्डनी तर धरसोड वृत्तीची कमाल केली होती. शेवटी ते अपक्ष उभे राहिले, तरीही विजयी झाले आहेत. रोहन खंवटेंनी पक्षांतर केले, परंतु तरीही त्यांचा मतदार त्यांच्या पाठीशी राहिला. याउलट आमदार म्हणून निष्क्रीय राहिलेली मंडळी, कलंकित नेते आणि मुख्य म्हणजे फुटिरांना मतदारांनी धडा शिकवला आहे. गेल्या पाच वर्षांत जे कॉंग्रेस आणि मगोतून भाजपात शिरले त्या बारा जणांपैकी त्यांचे नेते बाबू कवळेकर आणि बाबू आजगावकर या दोघा उपमुख्यमंत्र्यांसह फ्रान्सिस सिल्वेरा, विल्फ्रेड डिसा, आंतोनियो फर्नांडिस, क्लाफासियो डायस, फिलीप नेरी रॉड्रिग्स, इजिदोर फर्नांडिस आणि दीपक पाऊसकर हे नऊ जण या निवडणुकीत घरी बसले आहेत. त्या फुटिरांपैकी केवळ मोन्सेर्रात दांपत्य आणि नीळकंठ हळर्णकर एवढेच निवडणूक जिंकू शकले आहेत.
भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या तोंडावर आपले संख्याबळ वाढवण्यासाठी जे आयात धोरण अवलंबिले, त्याचा फायदा पक्षाला झाला आहे. भाजपच्या २० ह्या घसघशीत संख्येमागे प्रेमेंद्र शेट, प्रवीण आर्लेकर, गोविंद गावडे, कृष्णा साळकर, रोहन खंवटे, रवी नाईक हे सहाजण ही अर्थातच आयात केलेली मंडळी आहे. त्यामुळे हे यश पक्षाच्या सरकारच्या कामगिरीवर आधारित निर्विवाद यश म्हणता येणार नाही. ते देवेंद्र फडणवीस यांच्या मुत्सद्देगिरीचे यश आहे. विरोधक एकसंध नसूनही भाजपला त्याचा जेवढा अपेक्षित होता तेवढा फायदा मिळवता आलेला दिसत नाही. एकेका जागेसाठी भाजपला झगडावे लागले आहे. स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची अल्प आघाडी पाहिली तर त्यामागील कारणांचा शोधही घ्यावा लागणार आहे. भाजपने त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली होती, परंतु काल निकालांनंतर मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय पक्षनिरीक्षक आल्यानंतर घेतला जाईल असे प्रभारी देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्याचा अर्थ पक्षामधील मुख्यमंत्रिपदाचे अन्य दावेदार आता पुढे सरसावलेले दिसतात. सावंत यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद प्राप्त करण्यासाठी श्रेष्ठींचा पाठिंबा मिळवावा लागेल. राजकीय स्थैर्य आणि विकास ही दोन आश्वासने भाजपने या निवडणुकीत मतदारांना दिलेली होती. आता स्थैर्य तर लाभले आहे. येणार्या काळात गेल्या पाच वर्षांतील चुकांची पुनरावृत्ती न करता एक चांगले कार्यक्षम सरकार राज्याला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न होईल अशी अपेक्षा मतदारांनी करावी काय?