पुतळे निकाली!

0
187

गोवा विधानसभेच्या आवारात पुतळे उभारण्यासंदर्भातील सर्वच्या सर्व खासगी ठरावांना अनुमती नाकारून सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी एक अकारण उकरून काढला गेलेला विषय जवळजवळ निकाली काढला आहे. जनमत कौलाच्या सुवर्णमहोत्सवाच्या सांगतेचे निमित्त साधून विजय सरदेसाई यांना डॉ. जॅक सिक्वेरा यांच्याप्रती एकाएकी प्रेम उफाळून आले आणि या वादाला सुरूवात झाली. विधानसभेच्या आवारात गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांचा पुतळा आहे, त्यामुळे तेथे त्यांचे तत्कालीन राजकीय प्रतिस्पर्धी डॉ. जॅक सिक्वेरा यांचाही पुतळा असायलाच हवा हा काही मंडळींचा अट्टहास या सार्‍या वादाला खरे तर कारणीभूत होता. विजय सरदेसाई दुर्दैवाने त्याला बळी पडले आणि त्यांच्या नथीतून पुतळ्यासंबंधीचे तीर मारले गेले. खरे तर पुतळा हे एक निमित्त होते. त्या निमित्ताने आपापले राजकीय अजेंडे पूर्ण करण्यासाठी काही मंडळी पुढे सरसावली होती. जनमत कौलाच्या आठवणी ताज्या करण्यामागेही हाच कुटील डाव आहे. सरदेसाई यांचा गोवा फॉरवर्ड अद्याप बाल्यावस्थेत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाला अकल्पित आणि अनपेक्षित यश मिळाले असले, तरी त्याला तत्कालीन राजकीय परिस्थिती कारणीभूत होती. आता गोव्याच्या राजकारणात टिकाव धरायचा असेल तर स्वतःची अशी मतपेढी निर्माण करणे गोवा फॉरवर्डसाठी आवश्यक बनलेले आहे आणि तीच घडवण्याच्या धडपडीत सरदेसाई आहेत. त्यामुळे आपल्या या संभाव्य मतपेढीला खेचून घेण्यासाठीच एकेक मतलबी विषय सरदेसाई उपस्थित करीत असतात. मुळात गोवा फॉरवर्ड जी मतपेढी घडवू पाहतो, ती सारी प्रामुख्याने कॉंग्रेसची मते आहेत. त्यातही प्रामुख्याने ख्रिस्ती मतांवर त्याची भिस्त आहे. भाजप, मगोसारख्या हिंदुत्ववादी विचारसरणीशी छत्तीसाचा आकडा असलेल्या कडव्या ख्रिस्ती मतदारांना दुसरा कोणताही राजकीय पर्याय नसल्याने ते आजवर कॉंग्रेसच्या वळचणीला असायचे, परंतु आता त्यांना गोवा फॉरवर्डमध्ये जुन्या ‘यु. गो.’ च्या पडछाया दिसत आहेत. त्यामुळे अशा राजकीयदृष्ट्या एकाकी पडलेल्या जनसंख्येला आकृष्ट करायचे असेल तर डॉ. जॅक सिक्वेरांचे उदात्तीकरण हा हुकुमी एक्का आहे हे सरदेसाई जाणून आहेत. पुतळ्याचा सारा विषय एवढा प्रतिष्ठेचा बनवला गेला तो त्यासाठीच. त्यांच्या त्या प्रयत्नांना भाजपचे मायकल लोबो बळी पडले, कारण त्यांना आपल्या ख्रिस्ती मतदारांना सांभाळायचे आहे, परंतु भाजपच्या अन्य आमदारांनी त्यांना साथ न दिल्याने पक्षात ते पूर्ण एकाकी पडले. डॉ. सिक्वेरा यांच्या पुतळ्याची मागणी सरदेसाईंनी करताच इतर पुतळ्यांचे प्रस्ताव पुढे आले. त्यामागे अर्थातच सिक्वेरांच्या पुतळ्याचा प्रस्ताव शीतपेटीत टाकण्याचाच उद्देश होता. गोव्याच्या मुक्तीलढ्याचे प्रणेते डॉ. राममनोहर लोहिया, खंदे स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी. बी. कुन्हा इथपासून ते छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत अनेक नावे पुढे आली, परंतु त्यामागे ते पुतळे उभारण्याच्या आग्रहापेक्षा सरदेसाईंना काट्याने काटा काढत काटशह देण्याची खेळीच अधिक होती. मुळात एखाद्या व्यक्तीचे संस्मरण पुढील पिढ्यांना अक्षय्य राहावे यासाठी पुतळा उभारणे ही फारच उथळ कल्पना आहे. त्या व्यक्तीचा जीवनपट, त्यातील आदर्श, त्या व्यक्तीचे कार्य, त्यातील उदात्तता, त्या व्यक्तीने मागे ठेवलेला वारसा हे सगळे पुढील पिढ्यांपर्यंत निश्‍चित जायला हवे, परंतु ते दगडाच्या वा धातूच्या निर्जीव पुतळ्यांतून नव्हे. ते रसरशीतपणे पुढील पिढ्यांपर्यंत संक्रमित व्हायला हवे विचारांतून आणि मुळात त्यासाठी ते त्या तोडीचे असायला हवे. शिवाजी महाराजांचा आदर्श पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला तो त्यांच्या पुतळ्यांमुळे नव्हे. त्या सार्‍या इतिहासातून त्यांची महानता, त्या व्यक्तिमत्त्वाची थोरवी पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचली. महात्मा गांधी मोठे ठरले ते त्यांच्या पुतळ्यांमुळे अथवा ठिकठिकाणी रस्त्यांना त्यांचे नाव दिल्यामुळे नव्हे. त्यांच्या कार्यातून गांधी जगभरात पोहोचले, वंद्य ठरले. एखाद्याचा उगाच कोणी उदोउदो केला म्हणून त्याला मान्यता मिळत नसते. कोणी एखाद्याला हट्टाने प्रति-ज्ञानेश्वर बनवायला निघाले म्हणून काही तो ज्ञानेश्वर बनत नसतो. वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणार्‍या ज्ञानेश्वराची अलौकिकता त्यांचा एकही पुतळा नसताना पुढील पिढ्यांपर्यंत सर्वदूर गेलीच ना? त्यामुळे मुळात ज्याचे उदात्तीकरण करायचे त्याच्यापाशी ती थोरवी असायला हवी आणि ती सर्वमान्य असायला हवी. भाऊसाहेब बांदोडकर हे गोव्याचे लोकोत्तर व्यक्तिमत्त्व होते. दीनदुबळ्यांशी थेट संपर्क असलेला, सर्वांनाच आपलासा वाटणारा असा नेता गोव्यात आजतागायत दुसरा नाही. त्यामुळे कोणालाही ती उंची गाठता येईल हा भ्रम आहे. सभापतींनी आपल्या निर्णयातून तो दूर केला असेल अशी अपेक्षा आहे.