कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला साठा काल बुधवारी सकाळी ६:२२ वा. विमानाने गोव्यात दाबोळी विमानतळावर दाखल झाला. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाला देशभरात शनिवार दि. १६ पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे कालपासून पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लशीचे वितरण सुरू झाले. त्यानुसार विविध राज्यांत लस पोहोचण्यात येत आहे. ऑक्सफर्ड स्ट्राझेनेफाने विकसित केलेल्या या लशीचा पहिला टप्पा १३ शहरांमध्ये पाठवण्यात आला आहे. यात गोव्यालाही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या लशीची अखेर प्रतीक्षा संपली आहे. आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या लशीचे दोन बॉक्स काल गोव्यात दाबोळी विमानतळावर पोहोचले.
दरम्यान काल दि. १३ रोजी पहाटे ६:२२ वा. पुण्याहून विमानाने दाबोळी विमानतळावर लस पोहोचली. टीम गोवाने ती स्वीकृत केल्यानंतर ती आरोग्य खात्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी दाबोळी विमानतळावर आरोग्य खात्याचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर सदर कोविशिल्ड लशीचे बॉक्स खास वॅक्सीन व्हॅनमधून पणजी येथे आरोग्य खात्यात नेण्यात आले.