शिवसेनेवरील सर्जिकल स्ट्राईकनंतर बरोबर एका वर्षाने भारतीय जनता पक्षाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला काल दणका दिला. भाजपशी सत्तासोबत करण्यासाठी कधीपासून देव पाण्यात घालून बसलेल्या अजित पवारांनी भाजपप्रणित सरकारमध्ये दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण यावेळी ते एकटे गेलेले नाहीत, तर आपल्यासोबत पक्षाच्या आठ ज्येष्ठ नेत्यांनाही त्यांनी मंत्रिपदाची शपथ घ्यायला लावली आहे. छगन भुजबळ किंवा हसन मुश्रीफ यांच्यासारखे जुनेजाणते निष्ठावंतही यावेळी अजितदादांसोबत दिसत आहेत. भुजबळ, मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि खुद्द अजित पवार या सगळ्यांविरुद्ध ईडी, सीबीआय आदी केंद्रीय यंत्रणा हात धुवून मागे लागलेल्या होत्या. त्यामुळे भाजपची सोबत करून त्यातून मोकळीक आणि सत्ताही मिळत असेल तर त्यांना ती हवीशी वाटली तर आश्चर्य नाही. त्यात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचाराने बरबटला असल्याची दोन दिवसांपूर्वीच केलेली टिप्पणी आता केंद्रीय यंत्रणा आपल्या मागे लागल्यावाचून राहणार नाहीत याची प्रखर जाणीव करून देणारी असल्यानेच या मंडळींना धीर धरवला नसावा. अजितदादांबरोबर आठजणांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली असली, तरी यावेळी त्यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत व जे शिवसेनेचे झाले तेच राष्ट्रवादीचे होणार का हे अद्याप स्पष्ट नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील या बंडाची तीव्रता किती हे जाणून घेण्यासाठी एक दोन दिवस थांबावे लागेल. विशेषतः पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांना पुढील निवडणुकीत अद्दल घडवणे हा आपला एककलमी कार्यक्रम राहील अशी दिलेली ग्वाही आणि पक्षाचा आश्वासक चेहरा कोण या पत्रकारांच्या प्रश्नावर स्वतः अजूनही मैदानात असल्याचे दिलेले संकेत यामुळे अजितदादांसोबत जाणाऱ्या किती आमदारांत चलबिचल होते आणि कितीजण परततात हे पहावे लागेल. ऐंशीच्या दशकात आपल्या तत्कालीन पक्षाच्या 58 आमदारांपैकी आपल्यासोबत केवळ पाच उरले होते, पण त्यानंतर आपण पक्ष बांधायला बाहेर पडलो आणि पुन्हा 69 आमदार निवडून आणले याची आठवण पवारांनी जरी काल करून दिलेली असली, तरी तेव्हाचे सक्रिय शरद पवार आणि आजचे वयोज्येष्ठ, दुर्धर आजाराशी सामना करीत असलेले शरद पवार यामध्ये मोठे अंतर आहे, आजची राजकीय आणि सामाजिक परिस्थितीही वेगळी आहे हे विसरून चालणार नाही. परंतु महाराष्ट्राच्या जनतेवर आणि कार्यकर्त्यांवर त्यांनी जो दृढ विश्वास काल पुन्हा पुन्हा व्यक्त केला, त्या हाकेला महाराष्ट्र कसा ओ देतो हेही पाहणे औत्सुक्याचे असेल. शरद पवारांची सारी पुण्याई आता पणाला लागली आहे. 2009 साली पक्षाच्या सर्व पदांचा त्याग करून अज्ञातवासात गेलेल्या अजितदादांना काकांनी पुन्हा पक्षात आणले. 2019 मध्ये पहाटे झालेल्या शपथविधीनंतरही नाक मुठीत धरून पक्षात परत यायला लावले. मात्र, यावेळी गेलेले अजित पवार पूर्ण तयारीनिशी गेले असल्याने त्यांना सोडाच, परंतु त्यांच्यासोबत गेलेल्या कितीजणांना पवार परत आणू शकतात यावर त्यांच्या पक्षाचे स्थान, नाव आणि चिन्ह अवलंबून राहणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही अस्तित्वाची आणि स्वतः शरद पवारांसाठी वैयक्तिक प्रतिष्ठेची लढाई आहे. अजितदादा नुसते गेलेले नाहीत, तर त्यांनी यावेळी पक्षावरच दावा केलेला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे लोढणे इच्छा नसताना गळ्यात घालून घ्यावे लागले आहे. शिंदे गटाचे महत्त्व आणि मूल्य या नव्या घडामोडीनंतर निश्चितपणे कमी होईल. वापरा आणि फेकून द्या म्हणजे काय असते याचा त्यांना आता प्रत्यय येऊ लागेल. त्यांच्या सोळा आमदारांवर असलेल्या अपात्रता याचिकेचा निकाल विरोधात गेला तरीही आपले सरकार टिकवण्यासाठी भाजपला ही नवी चाल साह्यकारी ठरेल ते वेगळेच. उपमुख्यमंत्रिपदी आता देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवार दाखल झाले असले, तरी देवेंद्र यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या लवकरच होणाऱ्या फेरबदलात मानाचे स्थान मिळू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, महाराष्ट्र भाजपमध्येही या नव्या घडामोडीमुळे अस्वस्थताच आहे. आधी शिवसेनेत आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण घडवून आणलेली उभी फूट ही जनतेला रुचलेली नाही याची भाजप श्रेष्ठींनाही जाणीव आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीवेळीच महाराष्ट्राची विधानसभा निवडणूकही घेतली जाऊ शकते आणि मोदींच्या चेहऱ्यावर मते मागितली जाऊ शकतात. फोडाफोडीचे राजकारण जनतेला रुचत नाही हा इतिहास आहे. त्यामुळे बंडखोरांचे निवडणुकीत अनेकांचे जे व्हायचे ते होईल, परंतु या सत्तासोबतीने भ्रष्टाचाराचे आरोप भाजपच्या धुलाई यंत्रात धुवून निघतील एवढे मात्र खरे.