हवामान खात्याचा अंदाज
पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने काल वर्तवली. जून महिना जवळजवळ कोरडा गेलेला असून, राज्यात आतापर्यंत 7 इंचही पाऊस न झाल्याच्या व पावसाच्या तुटीची टक्केवारी 71 एवढी असल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकच्या, तसेच केरळच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असून, त्यामुळे पुढील चार दिवस गोव्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली.
याच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे काल शुक्रवारी राज्यातील विविध भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पुढील चार दिवस म्हणजेच मंगळवार दि. 27 जूनपर्यंत राज्यात जोरदार पाऊस कोसळणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. ताशी 40 किलोमीटर एवढ्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून पडणार असल्याचे खात्याने म्हटले आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीसह गोव्यातील किनारपट्टीवरही या काळात ताशी 45 ते 55 किमी. एवढ्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत राज्यात 64.4 मिमी. एवढ्या पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या काळात मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही हवामान खात्याने दिला.
दरम्यान, जून महिन्यातील 20 दिवस पावसाशिवाय जवळजवळ कोरडेच गेल्याने राज्यातील धरणांची पाणीपातळी अगदीच खाली गेल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा धोका निर्माण झाला होता; मात्र आता पाऊस कोसळू लागल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतीच्या कामांनाही जोर
राज्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गही सुखावला असून, शेतीची कामे सुरू झाली आहेत. भातशेती, तसेच गावठी मिरचीची लागवड यासह शेतीची सगळीच कामे गेल्या 20 दिवसांपासून पावसाअभावी अडून पडली होती. आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे.
मच्छिमाराचा तळ्यात बुडून मृत्यू
वार्का येथील तळ्यात मच्छिमारीसाठी गेलेल्या तेथीलच एका 43 वर्षीय मच्छिमाराचा काल सदर तळ्यात बुडाल्याने मृत्यू झाला. मृताचे नाव व्हिन्सेंत आंतोनियो फर्नांडिस असे आहे. काल सकाळी 11.30 च्या सुमारास तो मच्छिमारीसाठी गेला होता. त्यानंतर तळ्यात त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
दिवसभरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या
शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता, तो खरा ठरला. काल सकाळी काही ठिकाणी, तर सायंकाळी पेडण्यापासून काणकोणपर्यंत सर्वच ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. पावसाअभावी गेल्या काही दिवसांत उष्मा वाढला होता; मात्र कालच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याचे जाणवले.