पुढील १५ वर्षांत अखंड भारत पाहायला मिळेल

0
12

>> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे हरिद्वारमध्ये वक्तव्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हरिद्वारमध्ये बोलताना पुन्हा एकदा अखंड भारताविषयी भाष्य केले आहे. सनातन धर्म हेच हिंदू राष्ट्र आहे. पुढील २० ते २५ वर्षांत अखंड भारत तयार होणार आहे; मात्र आपण सगळ्यांनी मिळून आणखी थोडा प्रयत्न केल्यास स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातील अखंड भारत १० ते १५ वर्षांतच तयार होईल. हा भारत तयार करण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकणार नाही आणि जे कोणी आडवे येतील ते नष्ट होतील, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

सरसंघचालक मोहन भागवत हे हरिद्वार येथे ब्रह्मलीन महामंडलेश्वर श्री १००८ स्वामी दिव्यानंद गिरी यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी आणि श्री गुरुत्रय मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी गेले होते, त्यावेळी त्यांनी अखंड भारताविषयी भाष्य केले. अखंड भारतासाठी आम्ही अहिंसेच्याच मार्गाने पुढे जाणार आहोत, फक्त त्यावेळी आमच्या हातात काठी असेल. आमच्या मनात कोणाविषयीही द्वेष नाही, शत्रुत्त्वाची भावना नाही; पण या जगाला शक्तीचीच भाषा कळते तर आम्ही तरी त्याला काय करणार, असेही भागवत म्हणाले.

मोहन भागवत यांनी या कार्यक्रमात बोलताना हिंदू धर्माविषयी देखील भाष्य केले. जे लोक सनातन धर्माला विरोध करतात, त्या लोकांचेही या धर्मासाठी योगदान आहे. कारण त्यांनी विरोध केला नसता तर हिंदू समाज जागा झाला नसता, असे भागवत म्हणाले.

अफगाणिस्तान, भूतान, म्यानमार, पाकिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंका हे देश पुन्हा भारताला जोडले जाऊन अखंड भारताची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी याआधीही संघाकडून अनेकदा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांनी बुधवारी केलेल्या वक्तव्याची देशभरात जोरदार चर्चा होत आहे.

दरम्यान, मोहन भागवत यांनी अखंड भारतासंबंधी केलेल्या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. अखंड हिंदुस्थानाचे कोणाचे स्वप्न असेल तर आम्ही स्वागत करतो. कोणताही पक्ष त्याला विरोध करणार नाही. आधी पाकव्याप्त काश्मीर आणि नंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान ताब्यात घ्या आणि अखंड हिंदुस्थान निर्माण करा. तुम्हाला कोणी थांबवलेले नाही. पण त्याआधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या. कारण अखंड हिंदुस्थान त्यांचे स्वप्न होते. अखंड हिंदुस्थान जरुर करा; पण आधी काश्मिरी पंडितांची घरवापसी सन्मानाने आणि आदराने होऊ द्या, असे राऊत म्हणाले.