पुढील सुनावणीपर्यंत बदनामीकारक विधान करणार नाही

0
0

>> सुलक्षणा सावंत बदनामी प्रकरणात संजय सिंह यांच्या वकिलाची हमी

दिल्लीतील आम आदमी पक्षाचे नेते तथा खासदार संजय सिंह यांनी गोव्यातील सरकारी नोकरी घोटाळा प्रकरणात सुलक्षणा सावंत यांच्यावर काही आरोप केले होते. त्यानंतर सुलक्षणा सावंत यांनी त्यांच्याविरुद्ध 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यावर डिचोली न्यायालयात शुक्रवारी सुनावणी सुरू झाली. या याचिकेवरील पुढील सुनावणी 24 जानेवारीला होणार असून, तोपर्यंत माझ्या अशिलाकडून कोणतेही बदनामीकारक वक्तव्य करण्यात येणार नाही, अशी हमी संजय सिंह यांच्या वतीने उपस्थित झालेले वकील एस. बोडके यांनी न्यायालयाला दिली. सुलक्षणा सावंत यांचे वकील प्रल्हाद परांजपे यांनी सुनावणीनंतर ही माहिती दिली.
राज्यात सरकारी नोकरी घोटाळा गाजत असताना खासदार संजय सिंह यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांची पत्नी सुलक्षणा सावंत यांच्यावर आरोप केले होते. यानंतर सुलक्षणा सावंत यांनी संजय सिंह यांच्या विरोधात डिचोली दिवाणी न्यायालयात 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता.
कालच्या सुनावणीवेळी सुलक्षणा सावंत यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सुनील मनोहर, ॲड. प्रल्हाद परांजपे, ॲड. संजय सरदेसाई, ॲड. अथर्व मनोहर, ॲड. टेंबे आणि ॲड. ए. एस. कुंदे हे उपस्थित होते, तर संजय सिंह यांच्या वतीने ॲड. एस. बोडके उपस्थित होते. प्रल्हाद परांजपे यांनी सुनावणी संदर्भात प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितले की, या प्रकरणाची सुनावणी आता 24 जानेवारीला होणार आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत संजय सिंह यांच्याकडून कोणतेही बदनामीकारक वक्तव्य करण्यात येणार नाही, अशी हमी प्रतिवादींच्या वकिलांनी न्यायालयात दिल्याचे त्यांनी सांगितले. हे विधान न्यायालयाने नोंद करून घेतल्याचे त्यांनी सांगितले.