पुलावच्या जागी चपाती-भाजीचा प्रस्ताव
मध्यान्ह आहारातून आता शिर्यापाठोपाठ पुलाव देणेही बंद करण्यात येणार असून पुढील शैक्षणिक वर्षापासून पुलावच्या जागी विद्यार्थ्यांना चपाती-भाजी देण्याचा विचार असल्याचे शिक्षण संचालक जी. पी. भट यांनी काल सांगितले. शिरा देणे यापूर्वीच बंद करण्यात आले आहे; तर आठवड्यातून एकदाच दिला जाणारा पुलाव देणे येत्या शैक्षणिक वर्षापासून बंद करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. मुले पुलाव खाण्यास टाळाटाळ करीत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर येत्या शैक्षणिक वर्षापासून मध्यान्ह आहारातून पुलाव द्यायचा नाही, असा निर्णय शिक्षण खात्याने घेतला असल्याचे भट यांनी स्पष्ट केले. मध्यान्ह आहारातून देण्यात येणार्या भाजी-पाव व भाजी-पुरीला विद्यार्थ्यांकडून चांगली मागणी आहे. त्यामुळे पुलाव देणे बंद करून आता चपाती-भाजी सुरू करण्याचा विचार आहे, असे भट म्हणाले.फळे देण्याचा प्रस्ताव आहे काय, असे विचारले असता नाही, असे उत्तर त्यांनी दिले. गोव्यात फळे पिकत नसतात. ती बाहेरून आणावी लागतात. बाहेरून ती आणली तर ठेवण्यासाठी शीतगृहेही नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे केंद्राकडून मध्यान्ह आहारासाठी देण्यात येणारा निधी शिजवलेल्या अन्नासाठी दिला जातो. केंद्र गहू व तांदुळही देते. फळे द्यायची त्यासाठी राज्य सरकारने निधी द्यावा लागेल, असे ते म्हणाले.
अक्षयपात्रची सरकारची योजना होती तिचे काय झाले असे विचारले असता बेंगलोरस्थित कंत्राटदार कर्नाटकात अक्षयपात्र योजनेसाठी अन्न पुरवत असतात. गोव्यात ती सुरू करायची झाल्यास त्याच कंत्राटदाराला कंत्राट द्यावे लागेल. तसे केल्यास सध्या मध्यान्ह आहार योजनेखाली अन्न पुरवणार्या १११ स्वयंसहाय्य गटांना हे अन्न पुरवता येणार नाही व त्यांचे नुकसान होणार असल्याने अक्षयपात्र योजनेचा विचार बदलल्याचे श्री. भट यांनी स्पष्ट केले.