>> दीपक ढवळीकर यांचे प्रतिपादन
मगो व भाजप यांची जी युती आहे ती 2027 साली होऊ घातलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीतही अबाधीत राहणार आहे, असे काल मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले. 2027 ची निवडणूक आपण लढवणार आहे. मात्र, ती कुठल्या मतदारसंघातून लढवेन ते आताच सांगता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या जिल्हा पंचायत निवडणुकीत मगो पक्ष बांदोडा, खांडेपार व अन्य एक-दोन जागांवर दावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मगो व भाजप यांची युती अबाधित राहणे हे दोन्ही पक्षांसाठी फायद्याचे असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले. सध्या तरी दोन्ही पक्ष युतीधर्मांचे पालन करीत असल्याचे ते म्हणाले.
भाजप जसा आपला पक्ष बळकट करण्यास वावरत आहे तसेच आम्हीही मगो पक्ष तळागाळापर्यंत पोचावा यासाठी प्रयत्नरत असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीला अद्याप विलंब असून निवडणूक जवळ आल्यानंतर मगो व भाजप एकत्र बसून जागांचे वाटप व अन्य प्रश्नांवर चर्चा करणार असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.