वनमंत्री विश्वजीत राणे यांची माहिती; सोनसडा येथून उपक्रमाचा शुभारंभ
केंद्र सरकारच्या ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाखाली पुढील 3 महिन्यांत राज्यात 5 लाख झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती काल वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. या उपक्रमाचा शुभारंभ काल मडगावच्या सोनसडा येथे 500 झाडे लावून केल्यानंतर ते बोलत होते.
कचरा टाकण्याचे स्थळ म्हणून कुप्रसिद्ध ठरलेल्या सोनसडा येथे एकूण 66 हजार झाडे लावण्यात येणार असून, आज 500 झाडे लावण्यात आली आहेत. उर्वरित झाडे दुसऱ्या टप्प्यात लावण्यात येणार असल्याची माहिती राणे यांनी दिली. कचऱ्यामुळे काळा डाग लागलेल्या सोनसडा येथे आता एक घनदाट जंगल उभे राहिलेले पहावयास मिळणार असून, तेथे हे जंगल उभे राहिल्यानंतर सोनसड्याचे भाग्य उजळणार आहे. गोव्याच्या पर्यावरणासाठी हे सगळे केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुसऱ्या टप्प्यात गोवाभरात झाडे लावण्यात येणार असून, एकूण 5 लाख झाडे पुढील 3 महिन्यांत लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती राणे यांनी दिली.
सोनसडा हा कचऱ्याच्या ढिगाऱ्यांसाठी प्रसिद्ध होता; पण आता या कचरा प्रकल्पात व परिसरात झाडे लावून सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. इथे लोकांना फिरण्यासाठी जागा तयार केली जाईल. गोव्यातील 13 नगरपालिका आणि पणजी महापालिका क्षेत्रातही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नगरपालिका जागा निवडतील आणि वन खाते नगर विकास खात्याच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येईल, असेही राणे यांनी सांगितले.
देखरेखीसाठी नोडल
अधिकाऱ्याची नियुक्ती
या उपक्रमावर देखरेख ठेवण्यासाठी लवकरच एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असून ही वृक्ष लागवड विक्रमी वेळेत करून घेणे व नंतर लागवड केलेल्या वृक्षांची कशी निगा राखली जाते यावर पूर्णपणे लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही सदर नोडल अधिकाऱ्याची असेल, असे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केले.
पर्यावरणाचे जतन करण्यासाठी बालवाडीच्या विद्यार्थ्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुलांमध्ये पर्यावरणाविषयी आस्था व प्रेम वाढीस लागेल, असेही राणे यांनी सांगितले.
‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाखाली सरकारबरोबरच प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावावे, असे आवाहन यावेळी राणे यांनी केले.
सोनसडा येथे वृक्ष लागवडीसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मडगावचे आमदार दिगंबर कामत, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्ष बबिता नाईक, मुख्य वनपाल कमल दत्ता, नगरपालिका प्रशासन संचालक ब्रिजेश मणेरीकर, नगरसेवक तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.