पुढील चार दिवस राज्यात मुसळधार

0
5

हवामान खात्याने वर्तवला अंदाज

आज 1 जुलै ते 4 जुलैपर्यंत राज्यातील काही भागांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान खात्याने या काळात पिवळ्या रंगाचा इशारा दिला असून सावध राहण्याची सूचना केली आहे.

दरम्यान, हवामान खात्याने गेल्या 24 तासांत ठिकठिकाणी कोसळलेल्या पावसाची आकडेवारी जाहीर केलेली असून सर्वाधिक पाऊस साखळी येथे पडल्याचे म्हटले आहे. साखळी गेल्या 24 तासांत 67.2 मी. मी., फोंड्यात 48 मी. मी., केप्यांत 40 मी. मी., पेडण्यात 38.4 मी. मी., कोणकोणात 37.8 मी मी., मडगावमध्ये 24 मी. मी., वाळपईला 23.7 मी. मी., पणजीला 22.9 मी. मी., जुने गोवे येथे 21.7 मी. मी. दाबोळीला 14.6 मी. मी., मुरगांवला 14.6 मी. मी. एवढा पाऊस कोसळल्याचे म्हटले आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागांत कमी-जास्त प्रमाणात पाऊस कोसळत असून राज्यात सूर्यदर्शन दुर्लभ झाले आहे. शुक्रवार व शनिवारी पावसाने राज्यातील विविध भागांत हजेरी लावली तर काल रविवारीही राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस कोसळला. ज्या भागात पाऊस कोसळतो तेथील हवेत गारवा निर्माण होत असतानाच ज्या भागांत पाऊस कोसळत नाही त्या भागातील लोकांना मात्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. 4 जुलैपर्यंत चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

केदारनाथमध्ये हिमस्खलन

उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये काल रविवारी पहाटे हिमस्खलन झाले. सुदैवाने यात कोणतीच जीवित वा वित्त हानी झाली नाही. मंदिराच्या पाठीमागे असलेल्या डोंगरावरून मोठ्या प्रमणात बर्फ खाली कोसळला. केदारनाथ मंदिरामागील पर्वतांवर रविवारी पहाटेच्यावेळी अचानक हिमस्खलन झाले. डोंगरावरुन मोठ्या प्रमाणात बर्फ कोसळू लागला. सुदैवाने हा बर्फ मंदिरापर्यंत पोहोचला नाही. रविवारी झालेले हिमस्खलन फार मोठे नव्हते, त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. 2013 रोजी केदारनाथमध्ये भीषण ढगफुटीमुळे महापूर आला होता. या पुरात तेथील सर्व काही उद्ध्वस्त झाले होते.