>> निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे प्रतिपादन
पुढील अनेक दशके भारतीय राजकारणावर भाजपचे वर्चस्व राहणार आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे मोदी युग संपण्याची वाट पाहत आहेत हेच ते चुकीचे करत आहेत. असे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काल गोवा दौर्यावर आले असताना म्हटले आहे. प्रशांत किशोर सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम करत आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूलने विजय मिळवल्यानंतर किशोर यांनी ममता बॅनर्जींसोबत काम करत नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर, प्रशांत किशोर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात अशा बातम्याही आल्या होत्या, पण चर्चेच्या अनेक फेर्यांनंतर आता प्रशांत किशोर पुन्हा एकदा तृणमूलसोबत काम करत आहेत. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूलसाठी ते गोव्यात आले आहेत.
यावेळी प्रशांत किशोर यांनी, राहुल गांधी भाजप केवळ मोदी लाटेपर्यंतच सत्तेत राहणार आहे या भ्रमात असल्याचे स्पष्ट केले.
भाजप जिंकेल किंवा हरेल, पण कॉंग्रेसच्या ४० वर्षांच्या कारभाराप्रमाणेच भाजप भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहील. भाजप कुठेही जाणार नाही. यावेळी त्यांनी भाजप विरोधकांना इशारा देताना, लोक संतप्त होऊन मोदींना उखडून टाकतील या चक्रव्यूहात कधीही पडू नका. लोक मोदींना हटवू शकतात, पण भाजप कुठेही जाणार नाही. पुढील अनेक दशके तुम्हाला भाजपचा सामना करावा लागेल, असे सांगितले.
राहुल गांधींना अजून हेच समजत नाही. जोपर्यंत तुम्ही मोदींची ताकद समजून घेत नाही आणि त्यांची ताकद स्वीकारत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांचा सामना करू शकणार नाही. मला दिसत असलेली अडचण अशी आहे की लोक मोदींची शक्ती समजून घेण्यास जास्त वेळ देत नाहीत, त्यांना समजत नाही की मोदी इतके लोकप्रिय कसे होत आहेत. जर तुम्हाला हे माहीत असेल तरच तुम्ही त्यांचा सामना करू शकाल, असे प्रशांत किशोर म्हणाले.
कॉंग्रेस नेते मात्र लोक मोदींना कंटाळले आहेत, सत्ताविरोधी लाट येईल आणि लोक मोदींना हटवतील अशाच भ्रमात आहेत. मात्र असे होणार नाही. मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आणि तरीही त्यांच्याविरोधात मोठा जनक्षोभही निर्माण झालेला नाही, याचे उदाहरणही प्रशांत किशोर यांनी दिले.