>> आयसीसी कसोटी क्रमवारी
>> विराट कोहली ‘जैसे थे’
भारताचा आघाडी फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा याने काल मंगळवारी जाहीर झालेल्या ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान मिळविले आहे. कर्णधार विराट कोहली याने आपले पाचवे स्थान कायम राखले आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ पहिल्या स्थानावर आहे. पुढील चार स्थानांवरील खेळाडूंमध्ये केवळ ११ गुणांचे अंतर असल्याने क्रमवारीतील झुंज रंगतदार झाली आहे. तिसर्या स्थानावर असलेल्या इंग्लंडच्या ज्यो रुट याचे ८८१, चौथ्या स्थानावरील न्यूझीलंडच्या केन विल्यमसन याचे ८८० गुण आहेत. नागपूर कसोटीत भारताने श्रीलंकेवर एक डाव व २३९ धावांनी विजय प्राप्त केला होता. या कसोटीत पुजाराने १४३ धावांची खेळी केली होती. मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या रांची कसोटीनंतर पुजाराने सर्वप्रथम दुसर्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती. तर ऑगस्ट महिन्यात कोलंबो येथील लंकेविरुद्धच्या कसोटीत १३३ धावा जमवल्यानंतर अखेरच्या वेळी तो द्वितीय स्थानी पोहोचला होता. नागपूर कसोटीतील खेळीच्या बळावर त्याने २२ गुणांची कमाई करताना आपली गुणसंख्या ८८८ केली आहे. विराट कोहलीने द्वितकी खेळीवर आरुढ होत आपली गुणसंख्या ८१७ वरून ८७७ केली आहे. दुसरीकडे स्मिथने गब्बा कसोटीत १४१ धावांची नाबाद खेळी साकारताना ५ गुण मिळवत आपली गुणसंख्या ९४१ केली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पाचव्या क्रमांकाचे सर्वाधिक गुण स्मिथच्या खात्यात जमा आहेत. केवळ डॉन ब्रॅडमन (९६१), लेन हटन (९४५), जॅक होब्स (९४२) व रिकी पॉंटिंग (९४२) यांनी स्मिथपेक्षा जास्त व पीटर मे (९४१) यांनी स्मिथऐवढी गुण मिळविले आहेत.
नागपूर कसोटीत शतक लगावलेला मुरली विजय व मधल्या फळीतील फलंदाज रोहित शर्मा यांनीदेखील सकारात्मक दिशेने वाटचाल केली आहे. विजयने आठ स्थानांची सुधारणा करत २८वे तर रोहितने सात स्थानांनी वर सरकरताना ४६वे स्थान मिळविले आहे. लोकेश राहुल (-१, नववे स्थान), अजिंक्य रहाणे (-२, १५वे स्थान), दिमुथ करुणारत्ने (-१, १८वे स्थान), शिखर धवन (-१, २९वे स्थान) यांना नुकसान सोसावे लागले आहे.
गोलंदाजांच्या यादीत भारताचा डावखुरा संथगती गोलंदाज रवींद्र जडेजा याने पुन्हा दुसरे स्थान मिळविले आहे. नागपूर कसोटीत त्याने ८४ धावांत ५ बळी घेतले होेते. १२८ धावांत ६ बळी घेऊन ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने पुन्हा ‘टॉप १०’मध्ये प्रवेश केला आहे. तो दहाव्या स्थानी आहे. ३०० कसोटी बळी सर्वांत जलद घेणारा खेळाडू म्हणून रेकॉडबुकात नाव नोंदविणार्या रविचंद्रन अश्विनने आपला चौथा क्रमांक अधिक भक्कम करताना ९ गुण मिळविले. ८४९ गुण असलेला अश्विनचे पहिल्या स्थानावरील जेम्स अँडरसपेक्षा ४२ गुण कमी आहेत. भारताच्या अन्य गोलंदाजांचा विचार केल्यास भुवनेश्वर कुमार व ईशांत शर्माने प्रत्येकी एका क्रमांकाने वर सरकताना अनुक्रमे २८वे व ३०वे स्थान मिळविले आहे. अष्टपैलूंमध्ये रविचंद्रन अश्विनने पुन्हा तिसर्या क्रमांकावर हक्क सांगितला आहे.