पीडीपी, भाजपला राज्यपालांकडून सरकारस्थापना चर्चेसाठी निमंत्रण

0
102

जम्मू-काश्मीरमधील नव्या सरकारच्या स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी काल पीडीपी व भाजप या पक्षांना निमंत्रणे पाठविली आहेत. पीडीपी हा सर्वाधिक जागा मिळवलेला पक्ष असून त्यापाठोपाठ भाजपचा क्रम आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यपाल व्होरा पीडीपीचे प्रमुख मुफ्ती महंमद व भाजप प्रदेशाध्यक्ष जुगल किशोर यांना राज्यात सरकार स्थापनेविषयीच्या प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र निमंत्रणपत्रे पाठविली आहेत, अशी माहिती राज्यभनमधील एका अधिकार्‍यांने दिली.
राज्यपालांनी पीडीपी प्रमुखांना १ जानेवारी रोजी सकाळी आपणास भेटण्यास सांगितले आहे. तर याच दिवशी दुपारची वेळ भाजप प्रमुखांना दिली आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेची मुदत १८ जानेवारी रोजी संपणार असून वरील नेत्यांनी नव्या सरकार स्थापनेच्या प्रस्तावांसंदर्भात चर्चा करावी असे राज्यपालांनी आपल्या निमंत्रण पत्रांमध्ये नमूद केले आहे. सरकार स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ प्राप्त होऊ शकणार नसल्यास तसे आपल्याला कळवावे असेही संबंधितांना सुचविण्यात आले आहे. ८७ सदस्यीय जम्मू काश्मीर विधानसभेवर पीडीपीचे सर्वाधिक २८ आमदार निवडून आले आहेत. त्या पाठोपाठ भाजपचे २५ जण निवडून आले आहेत. या दोन्ही पक्षांदरम्यान गेल्या दोन दिवसांत एकत्र येण्याविषयी बोलणी झाली आहेत. मात्र त्याविषयी अद्याप काही उघड झालेले नाही. या विधानसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सचे १५ व कॉंग्रेसचे १२ आमदार निवडून आले आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या पक्षाची भाजपबरोबर कोणतीही हातमिळवणी झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र पीडीपीला पाठिंब्यासाठी केवळ तोंडी प्रस्ताव दिल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.