‘पीके’ चित्रपटाविरोधात विविध ठिकाणी निदर्शने

0
88

दिग्गज अभिनेता आमीर खान याच्या बहुचर्चित ‘पीके’ या चित्रपटाविरुद्ध देशात विविध ठिकाणी जोरदार निदर्शने होऊ लागली असून काल नागपूर व दिल्लीतही तशा घटना घडल्या. दिल्लीत बजरंग दल व हिंदू सेना यांच्या कार्यकर्त्यांनी ‘पीके’ विरोधात निदर्शने केली. चित्रपटगृहांबाहेर या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीसह चित्रपटाचे पोस्टरही जाळले. तसेच चित्रपटाच्या निर्मात्यांविरुद्ध पोलिसात एफआयआर नोंदविण्याची मागणी केली. श्रीराम सेनेनेही चित्रपटावर बंदीची मागणी केली आहे. रामदेव बाबा तसेच भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही या चित्रपटावर टीका केली आहे.
दरम्यान, अशी निदर्शने विविध ठिकाणी चालू असली तरी सरकार गप्प आहे याकडे लक्ष वेधून कॉंग्रेसने सरकारही यात सहभागी असल्याचा आरोप केला आहे. काल उत्तर प्रदेशातही हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी ‘पीके’चे प्रदर्शन असलेल्या सिनेमागृहात जाऊन शो बंद पाडला. तसेच आमीर खानच्या पुतळ्याचे दहन केले.