>> मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन
चिकणमातीची मूर्ती, माटोळी व सजावटीसाठी प्लास्टिकचा वापर न करता हरीत चतुर्थी साजरी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
गणेश चतुर्थी हा गोमंतकीयांचा एक प्रमुख उत्सव आहे. आमची चिकणमातीची मूर्ती पुजण्याची परंपरा आहे. त्यामुळे कोणीही प्लास्टर ऑफ पॅरीसची गणेशमूर्ती विकत आणू नये, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारने प्लास्टर ऑफ पॅरीसच्या श्री गणेश मूर्तीवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. कोणीच प्लास्टर ऑफ पॅरीसची मूर्ती खरेदी केली नाही, तर विक्रेतेही प्लास्टर ऑफ पॅरीसची मूर्ती विकण्यासाठी ठेवणार नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले आहे.
माटोळीसुद्धा पारंपरिक असावी. प्लास्टिकच्या वस्तू माटोळीला बांधू नयेत. हार तसेच सजावटीलासुद्धा प्लॅस्टिक वापरू नये. रानात जाऊन मोटोळीचे सामान आणणे शक्य नाही, तर त्यांनी ई-बाजारमार्फत ऑनलाइन खरेदी करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.