पीओके घेतल्यास काश्मीर प्रश्न सुटेल

0
2

>> परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे लंडनमध्ये प्रतिपादन

पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारताने ताब्यात घेतल्यानंतर काश्मीरप्रश्न पूर्णपणे सुटेल असे काश्मीरबाबत बोलताना भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. मंत्री जयशंकर हे सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर असून 5 मार्च रोजी लंडनमधील चॅथम हाऊस थिंक टँकमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
जयशंकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेल्या संबंधांचा वापर काश्मीर प्रश्नावर तोडगा काढतील का असे विचारले असता जयशंकर यांनी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात झालेला बदल अपेक्षेप्रमाणे आहे. ट्रम्प प्रशासनाच्या कृतींमुळे जग एका नवीन व्यवस्थेकडे वाटचाल करत असल्याने हे अनेक प्रकारे भारतासाठी अनुकूल असल्याचे सांगितले.

काश्मीर समस्या 3 टप्प्यात सोडवली
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी, आम्ही काश्मीरचे बहुतेक प्रश्न सोडवले आहेत. कलम 370 रद्द करणे हे पहिले पाऊल होते. मग दुसरे पाऊल म्हणजे काश्मीरमध्ये विकास, आर्थिक क्रियाकलाप आणि सामाजिक न्याय पुनर्संचयित करणे. मोठ्या प्रमाणात मतदान झालेल्या निवडणुका घेणे हे तिसरे पाऊल होते असे सांगून जयशंकर यांनी, आपण जेव्हा पीओखे ताब्यात घेऊ तेव्हा खात्रीने काश्मीर प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खलिस्तानी समर्थकांनी घेरले
लंडनमध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या गाडीला खलिस्तानी समर्थकांनी घेरले होते. त्यापैकी एक जण त्यांच्या गाडीसमोर आला आणि त्याने तिरंगाही फाडला. खलिस्तान समर्थक तिरंगा फाडताना दिसताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले आणि गाडीतून दूर नेले. दुसरीकडे, काही लोक हातात खलिस्तानचा झेंडा घेऊन घोषणा देत होते. या घटनेमुळे भारतीय समुदायात संतापाची लाट उसळली आहे.