पित्तदोष व पित्ताचे विकार

0
15
  • डॉ. मनाली महेश पवार

हल्लीच्या या लाइफ स्टाइलमुळे, आहार-विहारातील बदलांमुळे पित्ताचे विकार सर्रास पाहायला मिळतात. हे पित्तज विकार टाळण्यासाठी आपल्या शरीरातील प्राकृत पित्तदोष समजणे खूप आवश्यक असते. त्याचप्रमाणे आपली प्रकृती व त्याप्रमाणे आहार-विहार, सेवन-आचरण समजून घेणे आवश्यक आहे.

आयुष्यात कधीच कुणाला पित्ताचा त्रास किंवा हायपर ॲसिडिटी झाली नाही असे क्वचितच असेल. सगळ्यांनीच कधी ना कधी त्या पिवळ्या-हिरव्या, दुर्गंधीयुक्त, आंबट-कडू पित्ताचे दर्शन घेतलेच असेल. हल्लीच्या या लाइफ स्टाइलमुळे, आहार-विहारातील बदलांमुळे हे पित्ताचे विकार सर्रास पाहायला मिळतात. हे पित्तज विकार टाळण्यासाठी आपल्या शरीरातील प्राकृत पित्तदोष समजणे खूप आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपली प्रकृती व त्याप्रमाणे आहार-विहार, सेवन-आचरण समजून घेणे आवश्यक आहे.

पचन, उष्णता, दर्शनशक्ती, भूक, तहान, रुची, कांती, मेधा, प्रज्ञा, शौर्य, देहमार्दव इत्यादिकांना जे कारणीभूत असते ते म्हणजे पित्त. हे पित्त प्राकृत असणे गरजेचे आहे, अन्यथा अनेक प्रकारचे विकार उत्पन्न होतात.
नाभी, आमाशय, स्वेद, लस, रक्त, रस व स्पर्शेंद्रीये ही पित्ताची स्थाने आहेत. त्यांपैकी नाभी हे मुख्य स्थान आहे. म्हणजेच पित्तज विकार उत्पन्न झाल्यावर फक्त पोट बिघडत नाही तर रस-रक्त, घाम, लसिका, त्वचा यांचेही विकार उत्पन्न होऊ शकतात. म्हणून या विकारांमध्ये विरेचन, रक्तमोक्षण यांसारखे संशोधन सांगितले आहे. नाभी हे पित्ताचे मुख्य स्थान असल्याने सगळ्या प्रकारचे पचनविकार हे बहुतेकवेळा पित्तदुष्टीतूनच उत्पन्न होतात.
मनुष्य शरीराचा विचार केल्यास शरीराच्या वरच्या भागात म्हणजे उरःप्रदेशात उपन्न होणाऱ्या व्याधी म्हणजे कफव्याधी (श्वसनविकार, हृदयविकार). शरीराच्या मधल्या भागात उत्पन्न होणारे विकार म्हणजे पित्तज विकार (पचनसंस्था, आमाशय, लिव्हर यांचे विकार). शरीराच्या अधोभागात उत्पन्न होणारे आजार म्हणजे वातज विकार (गर्भाशय, प्रोस्टेट, किडणी, गुदविकार इ.). लक्षणांवरून साधारण आपला कोणता दोष बिघडला याचा प्रथमदर्शनी अंदाज येतो व त्याप्रमाणे आपल्याला चिकित्सा करता येते. रुग्णाला आहार-विहाराद्वारे काळजी घेता येते.

त्याचप्रमाणे बालवयात जसे सर्दी, खोकला, ताप इत्यादी कफाचे आजार जास्त प्रमाणात होतात व उतारवयात वाताचे म्हणजे संधिवात, कंबरदुखी, गुडघेदुखी इत्यादी विकार होतात. त्याचप्रमाणे तुमच्या लक्षात आले असेल की मध्यमवय, किशोरावस्था, तरुणावस्था हे पित्ताचे काळ आहेत. या वयात मुलांना चटपटीत-मसालेदार खायला आवडते. गोड पदार्थ, दूध, पारंपरिक पदार्थ खायला नको वाटतात. सकाळी उठायला आवडत नाही, रात्री जागरण आवडते. शिस्त नको वाटते. आपल्या मनाप्रमाणे वागायला आवडते. भूक व्यवस्थित लागते. नवनवीन पदार्थ खायला आवडतात. नवनवीन शिकायला आवडते व काही साहस करायला आवडते. त्याचबरोबर रागही लवकर येतो. म्हणूनच या वयातील मुलामुलींना ‘सळसळतं रक्त आहे’ असं म्हटलं जातं. या काळात मुलामुलींचे सौंदर्यही खुलू लागते. मुलांची बुद्धीही तेज होऊ लागते. असे का होते माहीत आहे? या काळात पित्तदोष जास्त प्रमाणात कार्यरत होतो. पित्ताचे भूक, तहान, रुची, पचन ही कार्ये जास्त प्रमाणात प्रभावित होतात. याच काळात पित्ताचे मेधा, प्रज्ञा, शौर्य हे कार्य अजूनही तेज बनते, म्हणून या वयात मुलांनी त्याचा योग्य वापर केल्यास, आपला आहार-विहार योग्य रीतीने सेवन केल्यास, योग्य आचरण केल्यास मुलांची बुद्धी तेज बनते, आणि तेच हे पित्त अयोग्य रीतीने वापरल्यास मुलं चिडखोर, बंडखोर, तापट बनतात. या वयात मुलांचा पित्तदोष प्राकृतरीत्या चांगल्या गुणांनी वाढवल्यास मुलं अद्वितीय कार्य करू शकतात आणि त्यांना योग्य मार्गदर्शन न दिल्यास मुलं बिघडूही याच वयात शकतात.
पित्ताचे देहमार्दव, कांती हे कार्यदेखील या वयात उजळून निघते म्हणून या काळात पित्तशमन करणारा आहार-विहार असावा. पित्त वाढवणारा, दूषित करणारा आहार-विहार असल्यास मुरमे, त्वचाविकार इत्यादींचा जास्त प्रमाणात उद्रेक होतो.
पित्तदोष अग्नी व आप तत्त्वापासून बनलेला आहे. शरीरातील हार्मोन्स, एन्झाइम यांचे नियंत्रण पित्तदोष करतो. शरीरातील तापमान, पाचक अग्नीचे नियंत्रणही पित्ताद्वारे होते.

पित्त हे पाच प्रकारचे असतात-

  • पक्वाशय व आमाशय यांच्यामध्ये असते ते पाचक पित्त. यात अग्निअंश जास्त असतो. हे पित्त द्रवत्व त्याग करून अन्न पचवते.
  • सत्त्वांशय मलापासून पृथक्करण करते व इतर पित्तविकारांना बल देते.
  • रंजक पित्त हे आमाशयात असते. रसाला रंगविणे म्हणजे रक्ताला रंग देण्याचे कार्य रंजक पित्त करते.
  • हृदयात राहणारे ते साधक पित्त बुद्धी, धारणा, अहंकार इत्यादींचे साधन करणारे पित्त म्हणजे साधक पित्त.
  • रूपग्रहण करणारे व नेत्रात असणारे पित्त म्हणजे आलोचक पित्त.
  • त्वचेत राहणारे व तेजास कारणीभूत असणारे पित्त म्हणजे भ्राजक पित्त.
    हे पित्त बिघडल्यास शास्त्राप्रमाणे चाळीस प्रकारचे रोग उत्पन्न होतात.

पित्तदोष वाढण्याची सर्वसाधारण कारणे
पित्तप्रकृती असलेल्या व्यक्तींना कुठल्या कारणाने आपल्याला पित्तज विकार होतात हे माहीत असणे आवश्यक आहे. कारण अशी कारणे सतत घडत राहिली तर अशा व्यक्तींना पित्तज विकार लगेच उत्पन्न होतात.

  • चटपटीत मसालेदार खाणे.
  • फास्टफूड, जंकफूडचे अतिप्रमाणात सेवन करणे.
  • अजीर्णानंतर अतिसेवन.
  • दिवसा झोपणे, रात्री जागरण करणे.
  • अतिप्रमाणात मद्यसेवन करणे.
    यांसारख्या अनेक कारणांनी पित्ताच्या गुणांची वृद्धी होते व पित्तज विकार उत्पन्न होतात.

पित्तज विकारातील लक्षणे

  • दाह, लाली, उष्णता, पाक, स्वेद, आर्द्रता, स्राव, कुजणे, गात्रसाद, मूर्च्छा, मद, तोंड आंबट-कडू होणे, राग येणे, थंड खावेसे वाटणे. तसेच त्वचा, मल-मूत्र, नखे किंवा डोळ्यांचा रंग पिवळा होणे इत्यादी पित्तदोष वाढल्याची किंवा दूषित झाल्याची काही लक्षणे आढळल्यास वैद्याचा सल्ला घ्यावा.
    वाढलेल्या पित्ताला शांत करण्यासाठी आयुर्वेदशास्त्राप्रमाणे ‘विरेचन’ ही श्रेष्ठ चिकित्सा आहे.
    पित्तज प्रकृती असलेल्यांनी किंवा पित्त संतुलित करण्यासाठी तुपाचे सेवन करावे, लोणी- दुधाचे सेवन करावे. मधुर, कडू चवीचे व तुरट रसांचे सेवन करावे. भोपळा, गाजर, कोबी, काकडी, लौकीसारख्या फळभाज्या व पालेभाज्यांचे सेवन करावे.
    पित्तज विकार टाळण्यासाठी मिरची, मुळा, टॉमेटोसारख्या भाज्या खाऊ नयेत. तिळाचे तेल, मोहरीचे तेल टाळावे. काजू, शेंगदाणा, पिस्ता आणि न सोलता बदाम खाणे टाळावे. परत परत कॉफी व चहाचे सेवन टाळावे. मद्यपान टाळावे. रात्री जागरण करू नये. स्नानासाठी थंड पाण्याचा वापर करावा. झोपताना तळपायांना तुपाने चोळावे, सुवासिक तेलाने मालीश करावे. चंदनासारख्या शीत द्रव्यांचा वापर करावा.

दूषित पित्ताच्या काही लक्षणांमध्ये उपचार

  • अंगास घाण वास ः चंदनादी वटी सकाळ-संध्याकाळ सेवन करावी.
  • कंठशोषावर ः काळ्या मनुका चावून खाव्यात. एलादिवटी चघळाव्या.
  • अंगात कडकी ः पुरुषांच्या कडकीकरिता वाळा, स्त्रियांकरिता चंदन, तर बालकांकरिता चंदन ही परम औषधे आहेत. शक्यतो ताज्या औषधी वापराव्यात.
  • तोंड आंबट-कडू होणे ः सुंठचूर्णाचा आहारात उपयोग करावा. रात्री त्रिफळाचूर्णाचा उपयोग करावा.
  • अंग गळून जाणे ः च्यवनप्राश सकाळ-संध्याकाळ सेवन करावे.
  • सतत थंड हवेसे वाटणे ः कुष्माण्डपाकाचे सेवन करावे. दूर्वांचा उपयोग करावा.
  • त्वचा निस्तेज ः शतावरी चूर्ण दुधातून घ्यावे.
  • वरचे वर राग येणे ः शतावरी कल्प, च्यवनप्राश यांचे सेवन करावे.
  • लघवी गरम, पिवळी होणे ः गोक्षुर, पुनर्नवा, वरुणादी चूर्णाचा उपयोग करावा.
  • लघवी कमी होणे, आग होणे ः चंदन, सुंठ, धने, वाळा यांचा काढा करून गाळून थोडा थोडा प्यावा.
    बऱ्याच वेळा ही लक्षणे इतर विकारांचा एक भाग असतात. तरी पण स्वतंत्रपणे त्यांचा विचार केला व त्याप्रमाणे उपचार केले तर कदाचित मूळ रोग बराच आटोक्यात येण्यास मदत होते.