- शरत्चंद्र देशप्रभू
मंदिरे सुशोभित झाली, नूतनीकरण झाले, विजेचा झगमगाट आला, परंतु कुठेतरी काहीबाही कमी पडते याची खंत संवेदनशील मनाला जाणवते. कदाचित निसर्गसंपन्न परिसराचा ऱ्हास हे एकमेव नसले तरी मुख्य कारण असू शकते.
पणजीतील महालक्ष्मी मंदिरात रथसप्तमीनिमित्त साजरा होणाऱ्या रथोत्सवाला जाणे झाले. पणजी अन् परिसरातील भाविकांसाठी ही पर्वणीच! परंतु आजच्या जमान्यात बहुतेक वेळा ज्येष्ठांची उपस्थिती दिसून येते. मी मंदिरात पोचेपर्यंत रथ पुरातन वृक्षाला फेरा काढून पायऱ्यांवर चढवून वरच्या रस्त्यावर ओटी-अर्पणासाठी स्थानापन्न झालेला. पुरोहितांची तिसरी पिढी महालक्ष्मीची निस्सीम सेवा करताना दिसत होती. आता वर जाणारी शिडी सिमेंट-काँक्रीटने पूर्णपणे बांधून काढलेली आहे. पूर्वी ओबडधोबड दगडधोंड्यांनी बांधून काढलेल्या पायऱ्यांतून रथ वर काढणे जिकिरीचे होत असे. वृद्धांना पण पायऱ्या चढणे-उतरणे म्हणजे दिव्यच! आता दोन्ही बाजूंनी भक्कम रेलिंग्स बसवल्यामुळे सर्वांची सोय झाली आहे. वरच्या रस्त्यावर रथाचे थांबे नक्षीदार रांगोळ्यांनी अधोरेखित केले होते. काळाशी सुसंगत ढोल अत्याधुनिक चारचाकी हातगाडीवर विराजमान झाले होते.
आमच्या तरुणपणी या मंदिरात एक वयस्क सनईवादक होता. सनईचे फुंकण्याचे टोक सदैव याच्या तोंडात. ते अलग केल्याशिवाय लोहाराच्या भात्यासारख्या धपापत्या उराने हा सनईचे मंजूळ स्वर उमटवत असे. श्वासोच्छ्वासाचे नियोजन करण्याचे कसब अतुलनीय, परंपरेने आलेले. सनई वाजवताना फुग्यासारखे फुगवलेले गाल आठवतात. कालौघात ही परंपरा, कसब लुप्त झालेले दिसते. उत्सवमूर्तीला दंडवत घालून खाली आलो तर छोट्या शिवमंदिराच्या समोरच्या पुरातन ‘करमली’च्या खोडाजवळच्या सोप्यावर मंदिराचे मुख्य पुजारी भेटले. लहानपणापासून यांनी रथोत्सवाचे होणारे स्थित्यंतर पाहिलेले. झरीसमोरच्या परिसरात जोमाने अन् जोषाने नाचवलेला अन् गोल गरागरा फिरवलेला रथ यांच्या स्मरणचक्षूंसमोर येतो. रथ आपल्याच भोवती विलक्षण गतीने फिरवला जात असे ती जागा आक्रमणामुळे संकुचित झाल्याची खंत, वेदना त्यांच्या स्मृतिजागरातून जाणवत होती. महाप्रसादाऐवजी समराधना हा शब्द ऐकून बरे वाटले. आता देवस्थानाकडे पैशांचा ओढा वाहतो आहे. यामुळे नूतनीकरण, पूजाअर्चा, अनुष्ठाने, पुनर्प्रतिष्ठापना हे सहज शक्य झाले आहे. परंतु या साऱ्या खटाटोपात मंदिराचा प्राकार अन् परिसर कितपत सुरक्षित ठेवला जातो याचे भान ठेवले जात नसल्याचे प्रतीत होत आहे.
महालक्ष्मी मंदिर परिसर अजून तरी भौगोलिक वैशिष्ट्यामुळे अन् भाविकांच्या, व्यवस्थापनाच्या परिपक्व दृष्टिकोनामुळे अबाधित राहिल्याचे दिसून येते. आठवते, महालक्ष्मी मंदिराच्या समोरच्या केणी घराण्याच्या पुरातन वास्तूचे नूतनीकरण करावे न करावे यावर खल झाला होता. खुद्द केणी कुटुंबीयांची नूतन इमारतीला उंची द्यावी की नाही, यावरून द्विधा मनःस्थिती असल्याचे ऐकिवात होते. आज गोव्यात जमिनीला सोन्याचा भाव आल्यामुळे एक तर मंदिर प्राकार अन् परिसरात अतिक्रमण होते किंवा जमीन विकली जाते. यावर गगनचुंबी इमारती उभ्या राहतात. देवालयाचा कळस पण खुजा वाटतो. परिसर आकुंचित झाल्यासारखा वाटतो. सोरटी सोमनाथ मंदिर अन् जांबावली श्री दामोदर संस्थानात पण दर्शनी भागाची भव्यता बांधकामामुळे दबलेली वाटते. कदाचित संरक्षणाच्या दृष्टीने हे बांधकाम अनिवार्य असेल; परंतु मंदिराच्या अन् विशाल सागराच्या भव्यतेत अनिर्बंध बांधकामामुळे हस्तक्षेप होणे योग्य नव्हे. काही देवदेवतांच्या मूळ रांगड्या आविष्काराला अत्याधुनिक साज दिला जातो- मूळ स्थापत्यकलेचा अन्वयार्थ न उमजून. यामुळे देवदेवतांच्या प्रखर, प्रत्ययकारी स्वरूपाला मवाळ, रेशमी रूप दिले जाते. बोडगिणीचा बोडगेश्वर, कलंगुटचा बाबरेश्वर किंवा सिकेरीचा व्याघ्रेश्वर ही उदाहरणे घेतली तर मूळ आक्रमक परंतु आश्वस्त वलय कमजोर झाल्याचे प्रतीत होते. अंत्रुज महाल म्हणजे देवदेवतांचे माहेरघर. येथील काही मंदिरे पूर्वीपासून प्रसिद्ध. मंदिरे सुशोभित झाली, नूतनीकरण झाले, विजेचा झगमगाट आला, परंतु कुठेतरी काहीबाही कमी पडते याची खंत संवेदनशील मनाला जाणवते. कदाचित निसर्गसंपन्न परिसराचा ऱ्हास हे एकमेव नसले तरी मुख्य कारण असू शकते. रथसप्तमीच्या तिसऱ्या दिवशी मारुतीगडावरची जत्रा साजरी होते. गर्दी टाळण्यासाठी अलीकडच्या वर्षात मी जत्रेच्या दुसऱ्या दिवशी देवाची भेट घेतो. आता हे मंदिर अत्याधुनिक झाले आहे. उत्सवाचा बाज अजून शाबूत आहे. पालखीतील उत्सवमूर्ती सुवर्णाने मढवली गेली आहे. नाट्यप्रयोग आयोजित केले जातात भव्य मंडपात. गर्भगृह चांदीने आच्छादलेले आहे. गाडी सर्किट हाउसजवळ अडवली गेली. दुसऱ्या दिवशी पण मंदिरात भाविकांची अतोनात गर्दी. जोडीला युरोपियन पर्यटक. सारे काही असून भक्तिभावाचा अभाव. तथाकथित भाविक यांत्रिकपणे देवाचे दर्शन घेताना दिसले. चेहऱ्यावरचा तणाव मंदिरात असून पण निवळण्याची चिन्हे दिसत नव्हती. रांगा हळूहळू सरकत होत्या अन् भाविकांची चुळबुळ एकंदर वातावरणात विरोधाभासाची प्रतिक्रिया उमटवत असल्याचे संकेत मिळत होते. देवाशी लीन होणे भाविकांच्या व्यग्र मनाला कठीण होत होते. परंतु चेहऱ्यावरची याचना तणावपूर्ण वातावरणात पण स्पष्टपणे अधोरेखित होत होती. याचनांचे स्वरूप कुठलेही असो, संरक्षक-कवच पुरवण्याचे किंवा मनातील ईप्सित पूर्ण करण्याचे, परंतु समर्पणाची भावना चेहऱ्यावर प्रतिबिंबित होत नव्हती. देवाचे मूळ तत्त्व कमजोर होण्यात मुख्य कारण आहे कमजोर भक्तिभावच. नानोडा येथील निसर्गसंपन्न परिसरातील मंदिरात गूढ शांततेत पवित्र लहरींची अनुभूती अनाहूतपणे जाणवते. माणगावला महाद्वार ओलांडताच पवित्र लहरींचा मनाला स्पर्श होतो. मंदिराच्या प्राकारात तर असीम शांतता लाभते. दुपारच्या आरत्या ऐकून मन प्रसन्न होते. यक्षिणीच्या मंदिरातला नैसर्गिक ढाच्याचा मंडपच गूढ वलय निर्माण करतो. कोरीव लाकडी खांब, झगझगीत प्रकाशविरहित गर्भगृहातील यक्षिणीची विशाल मूर्ती मनावर गारूड पसरवते. मंदिराच्या सभागृहातून आत जायला शीर वाकवावे लागते. स्थापत्यकलेतच समर्पणाची प्रक्रिया उमटवण्याचे अनोखे कसब. बाजूलाच असलेले टेंबेस्वामींचे समाधिस्थळ. एकंदर वातावरणात कृत्रिमतेचा लवलेश आढळत नाही. आजचे माणगाव मंदिर अन् प्राकार काळाप्रमाणे अद्ययावत केेलेला आहे. परंतु शांत वलयाला तडा गेलेला नाही. उद्या काय होणार याची आजच चिंता कशाला? दत्तात्रय अन् टेंबेस्वामींच्या अस्तित्वाची ऊर्जा भाविकांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करेल. व्यवहार अन् व्यापार याची सरमिसळ मंदिरांच्या प्राकारात होणे असमर्थनीय.
1982 साली मी पाहिलेले शिर्डीचे साईमंदिर आज कुठे आहे? खऱ्या भाविकाला हा फरक जाणवणार नाही, परंतु सर्वसामान्यांना या फकिराला सोन्याच्या पिंजऱ्यात बंदिस्त केलेले कसे मानवेल? देशातील भव्य मंदिरांत खास दर्शनाची सोय आहे. यासाठी मोबदला द्यावा लागतो. वृद्धांसाठी, दिव्यांगांसाठी खास दर्शनाची सुविधा आवश्यक, परंतु तरुणांनी भरमसाट मोबदला देऊन दर्शन का घ्यावे? आज तरुणाई जागतिकीकरणाच्या वेगामुळे आलेल्या समृद्धी अन् तणावामुळे चिंतन, मनन या आवश्यक गरजांना पारखी झालेली आहे. देवदर्शन तर त्यांच्यासाठी औपचारिकता राहिली आहे. प्रार्थना, श्लोक, स्तोत्रपठण तर त्यांच्या खासगी जीवनातून हद्दपारच झालेले आहे. ध्यानधारणेची तर आशाच सोडा. या गोष्टीतील वैज्ञानिक महत्त्व पण समजून घ्यायला कोणाला वेळ नाही. आरोग्य सांभाळण्यासाठी प्रार्थना, ध्यानधारणा किती महत्त्वाची आहे हे ॲलोपॅथिक सेवा देणाऱ्यांना पण उमजले आहे. यामुळे औषधासमवेत ‘होलिस्टिक’ जीवनशैलीचे अनुसरण करण्याचा आग्रह ते रुग्णांना करताना दिसत आहेत. देशात मूर्तिपूजेचा उदय झाला तो ध्यान केंद्रित करण्याच्या दृष्टीने. देवाच्या मूर्तीवर दृष्टी अन् ध्यान केंद्रित करण्यात मिळालेली ऊर्जा अनुष्ठानापेक्षा शतपटीने परिणामकारक. याला ना षोडशोपचाराची आवश्यकता, ना आर्थिक अपव्ययाची. परंतु हे होताना दिसत नाही. आज देव अन् वृद्ध यांची स्थिती समान झाल्याचे दिसते. मंदिरावर करोडोंनी पैसे खर्च केले जातात, वृद्धांसाठी अद्ययावत सेवा दिल्या जातात, परंतु त्यांना वेळ द्यायची गरज कोणाला आवश्यक वाटत नाही. मंदिरातील मूर्तीचा शक्तिस्रोत म्हणजे निर्मळ, पारदर्शक भक्तिभाव. वृद्धांचा कर्दनकाळ म्हणजे एकाकीपणा. तो औषधोपचारांनी कसा बरे हटवला जाणार? या उणिवांची भरपाई देवाच्या पायाशी पैशांच्या राशी ओतल्या किंवा वृद्धांचे वाढदिवस पंचतारांकित हॉटेलांमध्ये केल्याने होणार नाही. शब्द, भक्तिभाव अन् आपलेपणा याला पर्याय नाही. अलीकडेच गोव्यातील देवस्थानच्या कमिटीसाठी निवडणुका झाल्या. निवडून आलेल्या समितीसमोर आव्हान असेल पावित्र्य राखून जीर्णोद्धार, नूतनीकरण करण्याचे. अर्थात यात भाविकांचे महत्त्वाचे योगदान असेल.