पावसाळ्यासाठी वीज खाते सज्ज

0
11

>> वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचा दावा; खात्याच्या मान्सूनपूर्व कामांचा घेतला आढावा; सुरळीत वीजपुरवठ्यासाठी प्रयत्नशील

पावसाळ्यात राज्यातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज खाते सज्ज झाले आहे, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी वीज खात्याच्या मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतल्यानंतर पणजीत एका पत्रकार परिषदेत काल दिली. पावसाळ्यापूर्वीच वीजवाहिन्यांच्या जवळील धोकादायक झाडे तोडली आहेत; मात्र ऐन पावसाळ्यात घडणाऱ्या दुर्घटना टाळल्या जाऊ शकत नाहीत. असे असले तरी त्वरित वीजपुरवठा सुरळीत करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. खंडित वीजपुरवठ्याच्या तक्रारींसाठी वीज खात्याच्या संकेतस्थळावर कार्यकारी अभियंत्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात मागील दोन वर्षांत वीज वितरण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याचे काम हाती घेण्यात आल्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांत थोडी घट होऊ शकते. वीज खाते पावसाळ्यासाठी पूर्णत: सज्ज झाले आहे. पावसाळ्यात लागणाऱ्या आवश्यक साधनसुविधा विभागीय वीज कार्यालयांना उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच, काही अतिरिक्त वीज साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तातडीची गरज भासल्यास अतिरिक्त ट्रान्स्फॉर्मर आणि इन्सुलेटर सुध्दा उपलब्ध केले आहेत. मात्र पावसाळ्यात वादळ आणि जोरदार वाऱ्यांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडू शकतात. अशा परिस्थितीत कमीत कमी वेळेत वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्राधान्य देण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले.

राज्यातील अनेक भागात मर्यादेपेक्षा जास्त विजेच्या वापरामुळे वीजपुरवठा वरच्यावर खंडित होण्याचे प्रकार घडत आहे. वीज ग्राहकांकडून विविध इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर केला जातो. तथापि, त्या भागातील साधनसुविधांवर अतिरिक्त ताण येऊन वीजपुरवठा वरच्यावर खंडित होण्याचे प्रकार घडतात. नागरिकांनी आपापल्या भागातील विजेचा भार वाढवून घेण्यासाठी वीज खात्याशी संपर्क साधला पाहिजे, असे आवाहनही ढवळीकर यांनी केले.
राज्यातील पथदीप सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची सूचना वीज खात्याच्या अधिकाऱ्यांना केली आहे. औद्योगिक वसाहतीतील पथदीपची सुद्धा दुरुस्ती व देखभाल केली जाणार आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले.

राज्यातील विविध भागातील बंच केबल बदलण्याचे सुमारे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. या बंच केबलमुळे सुमारे 150 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. या घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू आहे, असेही ढवळीकर म्हणाले.
यावेळी वीज खात्याचे मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस, अधीक्षक अभियंता मयूर हेदे, अधीक्षक अभियंता श्री. बुरये यांची उपस्थिती होती.

तक्रारींसाठी अभियंत्यांचे संपर्क क्रमांक जारी करणार
पावसाळ्यात नागरिकांच्या तक्रारींसाठी वीज खात्याच्या वेबसाईटवर कार्यकारी अभियंत्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिक एसएमएसच्या माध्यमातून तक्रार पाठवू शकतात. वीज खात्याच्या कॉल सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. रात्र पाळीत काम करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे.

तमनार वीज प्रकल्पाची नितांत गरज
राज्यात दरवर्षी विजेच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. यावर्षी विजेची मागणी 820 मॅगावॅटवर्यत वाढली आहे. गतवर्षी 780 मॅगावॅट एवढी होती. या पार्श्वभूमीवर तमनार वीज प्रकल्पाची नितांत गरज आहे. तमनार प्रकल्पासाठी राज्यातील आवश्यक साधनसुविधा येत्या ऑगस्टच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार आहेत. या प्रकल्पासाठी 7 टॉवर उभारण्यात येत आहेत. कुडचडे येथील टॉवरला काहींनी हरकत घेतली आहे. स्थानिक आमदार व नागरिकांना विश्वासात घेऊन या प्रश्नावर तोडगा काढला जाणार आहे. कर्नाटकमधून तमनार वीज येत नसेल, तर पश्चिम ग्रीडकडून अतिरिक्त वीज खरेदी केली जाऊ शकते, असेही वीजमंत्र्यांनी स्पष्ट केले.

33 केव्ही, 11 केव्हीचे 40 टक्के काम पूर्ण
राज्यातील 33 केव्ही, 11 केव्ही वीजवाहिन्यांसाठी भूमिगत वाहिनी घालण्याचे काम आत्तापर्यंत 40 टक्के पूर्ण झाले आहे. वीज उपकेंद्राचा दर्जा वाढविण्याचे काम सुरू आहे. आगामी दोन वर्षांच्या काळात वीज व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याची सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठ्यात आणखी सुधारणा निश्चित होऊ शकते, असा विश्वास वीजमंत्र्यांनी व्यक्त केला.