पावसाळ्यात वाढवा मुलांची व्याधी-प्रतिकारशक्ती

0
13
  • डॉ. मनाली महेश पवार

योग्य आहाराची योजना, पुरेशी झोप, तणावाचे व्यवस्थापन व व्यायाम यांची योग्य सांगड मुलांना घालून दिली व त्याचे आचरण करण्यास लावले तर पावसाळ्यातदेखील मुलांचे व्याधिक्षमत्व टिकून राहील व मुलं पावसाचा आनंद लुटू शकतील.

सध्या पाऊस नुसता कोसळत आहे. पावसाच्या या ओलसर, दमट हवामानाने सूक्ष्मजंतूच्या वाढीस व भरभराटीस पोषक वातावरण बनले आहे. सर्दी, ताप, हगवण, दमा याचबरोबर डेंग्यूसारख्या तापाचे अनेक रुग्ण आढळत आहेत. कमी प्रतिकारशक्ती असलेल्यांना याचे लगेच संक्रमण होत आहे. यामध्ये मुलं व वृद्धांची संख्या जास्त आहे. कारण मुलांची व वृद्धांची रोग-प्रतिकारशक्ती इतरांच्या तुलनेने कमी असते. वृद्ध काही काळापुरती घरात राहू शकतात व योग्य काळजी घेतल्यास स्वस्थ राहू शकतात; मात्र लहान शाळकरी मुलांना किती वेळा सुट्टी देणार? शिवाय त्यांना घरात बसवून थोडंच ठेवू शकतो! असे हे ऋतूनुसार उत्पन्न होणारे आजार व त्यांची लागण मुलांना होऊ नये म्हणून मुलांची रोग-प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल?
मुलांची रोग-प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ऋतूनुसार योग्य आहार सेवन करावा. व्यायाम, योग्य निरोगी झोप, ताण यांचे व्यवस्थापन व त्याचबरोबर काही औषधी द्रव्यांचे सेवन केल्यास लहान मुलांची व्याधी-प्रतिकारशक्ती वाढते व पावसाळ्यातसुद्धा मुलं पावसाचा आनंद लुटून निरोगी राहू शकतात.

  • आहार कसा असावा?
    पावसाळ्यात फार दौर्बल्य असते, त्यामुळे बल देणाऱ्या पदार्थांचे (आजच्या काळात प्रथिनयुक्त) सेवन करावे असे कुणालाही वाटेल. पण सर्वसामान्यपणे बल्य म्हणून खाल्ले जाणारे सगळे पदार्थ गुरू, शीतवीर्यात्मक असतात. म्हणजे ते पचायला जड असतात. आणि पावसाळ्यात दौर्बल्याच्या जोडीला अग्निमांद्यही असते हे विसरून चालणार नाही. अग्निमांद्य आपली पचनशक्ती मंदावते. भूक लागल्यासारखी वाटते पण लागत नाही. म्हणून जठराग्नी वाढवून नंतरच पचनशक्ती वाढल्यावर हळूहळू बल्य पदार्थांचा वापर करणे सुरू करावे. म्हणूनच पावसाळा सुरू झाला की लगेच चिकन-मटण सुरू करू नये. प्रथमतः लघु- पचण्यास हलका आहार देऊन, अग्नी वाढवून, भूक चांगली लागू लागली की मगच गुरू, बल्य असे पदार्थ द्यावेत.

ताजे, हलके व घरचे अन्न मुलांना द्यावे. पचायला जड पदार्थ व तेलकट पदार्थ देऊ नयेत. चीज, पनीर, बर्गर, पिझ्झा, दही, मिठाई इत्यादी कितीही आवडले तरी पावसाळ्यात मुलांना अजिबात देऊ नयेत. शरीरात वात वाढवणारे मटार, छोले, राजमा, हरबरा अशी कडधान्ये म्हणजे त्यांच्या चमचमीत डीश मुलांना देऊ नयेत. त्याऐवजी मुलांची पचनशक्ती सुधारण्यासाठी व पर्यायाने व्याधी-प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी गरम भात व वरण त्यावर तूप किंवा लिंबाचा तुकडा पिळून द्यावे. हे जेवण पचायला हलके असते. यात वात व पित्ताचे शमन होते, त्याचबरोबर अग्निवर्धनही होते. आधुनिक शास्त्राप्रमाणे पाहायला गेलो तर या आहारामध्ये कार्बोहायड्रेड, प्रोटिन, चांगले फॅट व हे सगळे पचण्यासाठी ‘व्हिटामिन- सी’ही असते. त्यामुळे मुलांना अशा पद्धतीच्या आहाराची सवय लावा.
तसेच दूधभात, मुगाचे वरण, हुलग्याचे पिठले, भाकरी, चपाती असे सहज पचणारे पदार्थ आहारात असावेत. बेकरी पदार्थ या ऋतूत तरी अजिबात खाऊ नयेत. तसेच चिप्स, कुरकुरे इत्यादी देण्यापेक्षा साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या वा पॉपकॉर्न देऊ शकता. दही, आईस्क्रीम, दुधापासून बनवलेल्या मिठाया पावसात अजिबात खाऊ नयेत. पण ताक मात्र ग्राही व अग्निवर्धनासाठी उत्तम असे आहारद्रव्य आहे. त्यामुळे दुपारी जेवणानंतर ताज्या ताकात आले, ओव्याची पूड, चिमूटभर हिंग व काळे मीठ ठाकून मुलांना द्यावे. दोडका, पडवळ, भेंडी, दुधी भोपळा यांसारख्या फळभाज्या द्याव्यात. मुलं पालेभाज्या खायला नाक मुरडतात त्यामुळे या ऋतूत पालेभाज्यांचा वापर नाही केला तरी चालेल, पण हंगामी रानभाज्या मात्र एकदा तरी मुलांना या ऋतूत नक्की द्या.

वातदोष कमी करण्यासाठी आहारात स्निग्ध पदार्थ भरपूर हवेत म्हणून मुलांना घरचं साजूक तूप अधिक प्रमाणात खायला द्यावं. कारण तूप हे वातशमन, पित्तशमन करणारे, अग्निवर्धन करणारे व उत्तम व्याधी-प्रतिकारशक्ती वाढवणारे द्रव्य आहे. तेल-तुपासारखे स्निग्ध पदार्थ अधिक प्रणाणात वापरावे. मात्र तळलेले पदार्थ कटाक्षाने टाळावेत. गव्हाचा रवा चांगला भाजून त्यात आले, कडिलिंबू, लिंबू यांसारखी दीपन द्रव्ये टाकून बनविलेला ‘उपमा’ मुलांना द्यावा. दूध हे चांगले रसायनद्रव्य आहे. त्यामुळे मुलांना रोज सकाळी हळद टाकून गरम दूध प्यायला द्यावे. मुलं जरा मोठी झाली की दूध प्यायला टाळाटाळ करतात म्हणून अशा मुलांना रोज दोन भिजवलेले बदाम, दोन काजू व दोन खजूर असा सुकामेवा टाकून, त्याची पेस्ट दुधात मिसळून ॲनर्जी ड्रिंक म्हणून द्यावे वा हळद टाकून गोल्ड मिल्क म्हणून द्यावे म्हणजे मुलं घेतात.

मुलांना रोज एक मुगाचा, शेंगदाण्याचा किंवा डिंकाचा लाडू आलटून-पालटून द्यावा. विशेषतः मुलींना शतावरीसिद्ध दूध प्यायला द्यावे. त्याचबरोबर सर्दी, खोकला सतावत असल्यास ज्येष्ठमधसिद्ध दूध प्यायला द्यावे. तसेच रोज एक मोरवळा खायला द्यावा. आहारामध्ये हळद, मेथी, लवंग, मीरे, आले, कढीपत्ता, दालचिनी, सुंठ इत्यादी मसाल्याचा अधिकाधिक वापर करावा. हे मसाले व्याधी-प्रतिकारशक्ती वाढवतात. शिवाय बिया, बदाम, अक्रोड, सूर्यफूल, भोपळा बिया आणि तीळ यांसारखे पदार्थ मुलांच्या आहारात समाविष्ट करावेत. बिया, सुकामेवा, फळे रोग-प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करतात. ही फळे ‘व्हिटामिन- ए’, ‘व्हिटामिन- सी’, ‘फायबर’सारख्या पोषणतत्त्वांनी भरलेली असतात. त्यामुळे सफरचंद, पेरू, केळी, संत्री, पपई, डाळिंब, आवळा यांसारखी फळेही आहारात असू द्यावीत.
तसेच शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे पुरेसे पाणी. यासाठी पाणी चांगले स्वच्छ गाळून, चांगले काढ्याप्रमाणे उकळूनच प्यावे. त्यातही मुलांची व्याधी-प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पाणी उकळताना त्यात तुळशीची पाने टाकावीत किंवा ज्येष्ठमधाचा तुकडा किंवा आल्याचा तुकडा टाकावा. त्याचप्रमाणे मुलांची व्याधी-प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मुलांना ‘सुवर्णसिद्ध जल’ द्यावे. यासाठी सोन्याचं नाणं किंवा सोन्याचा एखादा लहान दागिना पाण्यात टाकून ते पाणी चांगले उकळावे व त्यानंतर हे पाणी मुलांना प्रत्येकवेळी प्यायला द्यावे. अशा प्रकारे पालकांनी आपल्या पाल्याला पाश्चात्त्य संस्कृतीच्या खाण्या-पिण्यापासून परावृत्त करून आपल्या भारतीय संस्कृतीचा आहार कटाक्षाने द्यायला सुरुवात केली तर कोणत्याच ऋतूमध्ये कोणतेच आजार मुलांना सतावणार नाहीत.
मुलांना नियमित व्यायाम करायला लावा. चांगल्या चौकस, षड्रसयुक्त आहाराबरोबरच व्यायामालाही तितकेच महत्त्व आहे. आज कॉम्प्युटरच्या युगात मुलांची हालचाल नगण्यच आहे. सगळी कामं बसून, खेळणेसुद्धा मोबाईलवर बसून, मैदानी खेळ शाळेच्या पी.ई. तासापुरतेच राहिले आहेत. शारीरिक हालचाली रक्ताभिसरण वाढवतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पेशींच्या निर्मितीला प्रोत्साहन देतात. त्यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित कमीत कमी अर्धा तास तरी व्यायाम करावा. हा व्यायाम म्हणजे मैदानी खेळ असतील, सूर्यनमस्कार असू शकतात, धावणे-चालणे, योगासने असे कोणत्याही स्वरूपात चालेल.

  • मुलांना तणावमुक्त ठेवा
    या स्पर्धेच्या युगात मुलं खूप तणावाखाली असतात. त्यामुळे त्यांची रोग-प्रतिकारशक्ती कमकुवत होत आहे. त्यासाठी मुलांकडून रोज खोल श्वासोच्छ्वासाचे व्यायाम, ध्यान, योगसारख्या तणाव व्यवस्थापन तंत्राचा वापर करून घ्या. त्याचप्रमाणे मुलांच्या एखाद्या कलागुणाला प्रोत्साहन द्या. त्यांना स्वच्छतेची आवड लावा. जेवणापूर्वी तसेच संडासातून आल्यावर प्रत्येक वेळी हात स्वच्छ साबणाने धुतील हे पहा. घरचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. कुठेच पाणी साठवून ठेवू नका. वारंवार हात धुणे, चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा. त्याचबरोबर हवा शुद्ध करण्यासाठी धूप करावा. याने जंतू नष्ट होतात व हवेत उबदारपणाही येतो. यासाठी वेखंड, सुंठ, ओवा, ऊद, जटामांसी, कडुनिंबाची सुकवलेली पाने यांचे मिश्रण वापरावे.
  • झोपेचे व्यवस्थापन
    पावसाळ्यात रात्री जागरण करू नका. त्याचप्रमाणे दिवसा झोपू नका. लवकर झोपून लवकर उठावे. साधारण 7-8 तास मुलांना झोप आवश्यक आहे. त्यामुळे ‘स्क्रीन टाईम’ आता मर्यादित ठेवावा.
    अशा प्रकारे योग्य आहाराची योजना, पुरेशी झोप, तणावाचे व्यवस्थापन व व्यायाम यांची योग्य सांगड मुलांना घालून दिली व त्याचे आचरण करण्यास लावले तर पावसाळ्यातदेखील मुलांचे व्याधिक्षमत्व टिकून राहील व मुलं पावसाचा आनंद लुटू शकतील.