पावसाळ्यात आहार कसा असावा?

0
18
  • डॉ. मनाली महेश पवार

या ऋतुसंधीच्या काळात आरोग्यास फार जपावे लागते. कारण या काळात वातावरण दूषित असते. ग्रीष्म ऋतूत संचित झालेल्या वायूला रुक्षतेबरोबरच शैत्याचीही जोड मिळाल्याने वर्षा ऋतूत वात अधिकच प्रकुपित होतो. या काळात पित्त साचायला लागते, वाताचा प्रकोप होतो, अग्निमांद्य व देह-दुर्बलता जाणवते. म्हणून या काळात आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.

उन्हाळ्यात संतप्त झालेली धरणी पावसाच्या आगमनाने शांत झाली आहे आणि बाहेरच्या थंड वातावरणाने शरीरातील अग्नी कोंडला गेलेला आहे. काही दिवसांपूर्वी नको नको वाटणारे खाणे- आता सारखे काहीतरी खावेसे वाटत आहे. काही दिवसांपूर्वी नको-नकोशी वाटणारी उष्णता आता हवीहवीशी वाटू लागली आहे. पावसाच्या या थंड सरीनी गरम चहा व भजी-पकोड्यासारखे तळलेले पदार्थ खावेसे वाटतात. पण खरेच असे तळलेले पदार्थ पावसाळ्यात खावेत का? ऋतू बदलला की आहारही बदलावा का? मग पावसाळ्यात आपला आहार कसा असावा?
या ऋतुसंधीच्या काळात आरोग्यास फार जपावे लागते. कारण या काळात वातावरण दूषित असते. पाणी दूषित असते. या काळात शैत्यामुळे अनेक प्रकारचे प्राणवह स्रोतसांचे आजार संभवतात. सर्दी-खोकला, दमा, डोकेदुखीसारखे आजार होतात. दूषित पाण्यामुळे अतिसारासारखे आजार होतात. मळमळ, गुडघे दुखी, तापासारखेही आजार वारंवार होतात. ग्रीष्म ऋतूत संचित झालेल्या वायूला रुक्षतेबरोबरच शैत्याचीही जोड मिळाल्याने वर्षा ऋतूत हा वात अधिकच प्रकुपित होतो. याचवेळी दुर्बल अशा देहामध्ये बाह्य वातावरणातील आर्द्रता व इतर बाबींमुळे अग्निमांद्यही फार मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते व दुर्बलता अधिक जाणवू लागते. या काळात पित्त साचायला लागते, वाताचा प्रकोप होतो, अग्निमांद्य व देह-दुर्बलता जाणवते.

आहार कसा असावा?
या काळात पचनशक्ती मंद होते व त्याचबरोबर इम्युनिटीदेखील कमी होत असते. त्यामुळे पचायला हलका असा आहार घ्यावा. त्याचबरोबर आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी विविध काढे घ्यावेत. बल कमी होत असल्याने बल्य असा आहार घ्यावा असे प्रथमदर्शनी वाटते म्हणून बरेच जण या काळात मांसाहार खाणे पसंत करतात. त्याचबरोबर तळलेले, मसालेदार पदार्थ खाणे पसंत करतात. पण असा आहार सेवन केल्यास अग्निमांद्य अजूनच वाढते व अपचनाचे विविध आजार निर्माण होतात. म्हणून या काळात प्रथम हलका आहार सेवन करून, अग्नीचे बल वाढवून मग हळूहळू बल्य आहार सेवन करावा. त्यामुळे रोजच्या जेवणात जे धान्य वापरतात ते धान्य एका वर्षापेक्षा जास्त जुने असावे.

  • धान्यामध्ये तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, गहू यांचा समावेश करता येतो. फक्त जेवणात एकावेळी एकच धान्य सेवन करावे. उदा. जेवणात भात असता पोळी-भाकरी असू नये. पोळी किंवा भाकरी खायची असल्यास भात खाऊ नये. एकावेळी एकच कार्बोहायड्रेड सेवन करावे. नवीन धान्य सेवन करायचे झाल्यास ते धान्य थोडेसे भाजून घ्यावे, म्हणजे अग्निसंस्कार झाल्यास पचायला हलके होते.
  • या काळात साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या यांचे सेवन करावे. कडधान्यांमध्ये मूग, मसूर, हुलगे, कुळीथ, चवळी, हरभऱ्यासारखे कडधान्ये वापरावीत. या काळात वरील कडधान्यांची आमटी, उसळ खाता येते. मुगाचे वरण, हुलग्याचे पीठले यांसारखे पदार्थ आहारात घ्यावेत.
  • भाज्यांमध्ये सर्वप्रकारच्या फळभाज्या खाव्यात. भोपळा, घोसाळे, दोडका, भेंडी, पडवळ, शेवगा, कारले यांसारख्या भाज्या रोजच्या जेवणात असाव्यात. एखादी तरी फळभाजी असावी. कोबी-फ्लॉवरसारख्या भाज्यांमध्ये अळ्या असू शकतात, त्यामुळे भरपूर पाण्यात भाज्या चांगल्या धुवाव्यात व मगच या भाज्यांचे सेवन करावे. या सर्व भाज्या चांगल्या शिजवून सेवन कराव्यात.
  • या काळात भाज्या कच्च्या खाऊ नयेत. सॅलॅड स्वरूपात खायच्या झाल्यास वाफवून घ्याव्यात.
  • या काळात शक्यतो पालेभाज्या खाऊ नयेत. खायच्या झाल्यास भरपूर पाण्यात चांगल्या धुवून, शिजवून खाव्यात.
  • सर्वप्रकारच्या रानभाज्या या काळात खाव्यात. उदा. तायखिळा, गोक्षूर, तांदुळजा, पाथरी, सुरण, बांबूचे कोंब, अळंबी इत्यादी. या रानभाज्या याच काळात उगवतात व त्यात भरपूर प्रथिने असतात. त्यामुळे पावसाळ्यात या भाज्या मनसोक्त खाव्यात.
  • मसाल्यामध्ये हळद, आले, लसूण, दालचिनी, मिरी, सुंठ यांसारख्या मसाल्यांचा भरपूर उपयोग करावा. या मसाल्यामुळे सर्दी-खोकल्यासारखे आजार, त्याचबरोबर अपचनाचे आजारही आटोक्यात येतात.
  • या काळात मांसाहार टाळावा. मांसाहार करणाऱ्यांना चिकन सूप घेता येतो.
  • विविध भाज्यांचे सूप या काळात अग्नी प्रदिप्त करण्यास मदत करतात.
  • आहारामध्ये उपमा, थालिपीठ, घावणे, खिचडी, मिक्स डाळींचे डोसे असा रात्रीचा आहार घ्यावा.
  • इम्युनिटी वाढवण्यासाठी लिंबू, आवळा, सिमला मिरची, पपईसारखे ‘सी’ जीवनसत्त्व असलेली जिन्नस खावेत.
  • दही या ऋतूत अगदी निषिद्ध आहे. कारण दही अग्निमांद्यकर आहे. पण ताक मात्र ग्राही व अग्निवर्धनासाठी उत्तम आहे. म्हणून ताकाचे सेवन करावे किंवा ताकाची कढी प्यावी.
  • जेवणामध्ये सर्व प्रकारची पक्वान्ने टाळावीत.
  • हिंग, सुंठ, मिरे, जिरे, पिंपळी, आले, लिंबू, पुदिना, कोथिंबीर, लसूण यांसारखी दीपन-पाचन करणारी द्रव्ये अधिक प्रमाणात वापरावीत.
  • लसणीचा उपयोग या ऋतूमध्ये अधिकाधिक प्रमाणात करावा. लसूण ही उष्ण, स्निग्ध असून उत्तम वातनाशक व अग्निवर्धकही आहे.
  • जेवणात स्निग्ध पदार्थही भरपूर हवेत. विशेषतः तूप अधिक प्रमाणात खावे. तूप हे वातप्रशमन करणारे, पित्त शमन करणारे व अग्निवर्धक आहे.
  • तेलही वातशमन करणारे आहे. स्वयंपाक करताना फोडणीसाठी भरपूर तेल वापरावे. मोहरी व हिंग यांचाही फोडणीसाठी मुक्त हस्ताने वापर करावा.
  • तेल-तुपासारखे स्निग्ध पदार्थ भरपूर वापरावेत, पण तळलेले पदार्थ मात्र कटाक्षाने टाळावेत. तळलेले पदार्थ खायचे असल्यास घरात बनवून खावेत.
  • बाहेरचे तळलेले पदार्थ पूर्णपणे टाळावेत. शक्यतो घरचेच पदार्थ खावेत.
  • पिण्यास व आंघोळीसाठीही गरम पाण्याचाच प्रयोग करावा.
  • पाणी चांगले काढ्याप्रमाणे उकळून प्यावे.
  • त्याचबरोबर हळदीचे पाणी, दालचिनीचा काढा, तुळशीचा काढा, ग्रीन-टी यांचे सेवन करावे.
  • पावसाळ्यात आहार हा पचण्यास हलका असावा. शिळे अन्न सेवन करू नये.
  • आलेपाक, आमलक रसायन, हिंगवाष्टक चूर्ण, सीतोपलादी चूर्ण, मोरावळा, शतावरी चूर्ण यांचेही वैद्याच्या सल्ल्याने सेवन करावे.
    या गोष्टींचे पालन केल्यास पावसाळ्यात मस्त आनंद लुटता येतो व आरोग्यही सांभाळता येते.