पावसाळ्यातील संपन्नता

0
19
  • अंजली आमोणकर

निसर्ग आपोआपच त्या-त्या ऋतुमानाप्रमाणे शरीराला पोषक अशा भाज्या-फळांची उत्पत्ती करत असतो. अर्थात हे उत्पादन विविध प्रदेशांमध्ये विविध तऱ्हांचे असते. आपण पावसाळ्यात गोमंतकात तयार होणाऱ्या रानभाज्या, फळभाज्या, फळे यांच्याबद्दल जाणून घेऊ…

आपल्या शरीरावर ऋतूनुसार होणाऱ्या वातावरणातील बदलांचा नक्कीच परिणाम होत असतो; हवामानातही बदल होतो. आपले आरोग्य टिकवायचे असेल तर या बदलांप्रमाणे आहारात बदल करणे आवश्यक असते. पावसाळ्यात सूर्यकिरणांचा अभाव असतो. अधिक रोगराई वाढत असते. अग्निमांद्य होते. वातावरण पचनाला अनुकूल असत नाही. म्हणून या दिवसांत आहार हलका- ताजा- उष्ण- कमी वातुळ असावा. निसर्ग आपोआपच त्या-त्या ऋतुमानाप्रमाणे शरीराला पोषक अशा भाज्या-फळांची उत्पत्ती करत असतो. अर्थात हे उत्पादन विविध प्रदेशांमध्ये विविध तऱ्हांचे असते. आपण पावसाळ्यात गोमंतकात तयार होणाऱ्या रानभाज्या, फळभाज्या, फळे यांच्याबद्दल जाणून घेऊ.

प्रचंड पडणारा पाऊस आणि उपलब्ध असणारी मर्यादित साधनसामग्री यामुळे बायका-महिला रानावनांकडे वळल्यास नवल नाही. आषाढ, श्रावण आणि अगदी भाद्रपद संपेपर्यंत गोमंतकातील महिला रानावनातील साधनसंपत्तीवर अवलंबून असतात. आताच्या या यंत्रयुगात सर्वकाही- सगळीकडे- केव्हाही उपलब्ध असते हे कबूल; परंतु या रानभाज्यांची चव, पोषण गुण इतरत्र कोठेही शोधून सापडणार नाहीत.

धो-धो पावसात सुखाची लहर म्हणजे आता अळंबी (अळमी) उगवून हाताशी येणार. मानवाच्या अळंबी ‘ओरबाडण्या’च्या वृत्तीमुळे मात्र यांचे संवर्धन होण्याऐवजी कमी कालावधीत झटपट पैसे कमवण्याच्या नादात व्यवस्थित वाढ न झालेली, आकाराने अगदीच लहान अळंमी बाजारात आणली जातात. अत्यंत लोकप्रिय असलेल्या या अळम्यांना अनेकजण अजूनही शाकाहारी समजत नाहीत. त्यात कृत्रिमरीत्या पैदास केलेल्या अळम्यांचं उत्पादन वर्षभर हाताशी असतं. पण नैसर्गिकरीत्या उत्पादित अळम्यांचं तोंडाक तोंडाला पाणी आणतं. रवा लावून चुरचुरीत भाजलेल्या अळम्यांचा जो घमघमाट घरभर पसरतो तो अफलातून असतो. सत्तरी, डिचोली, नेत्रावळी, सांगे या भागांतील रानावनांतून अळंमी बाजारात येतात. प्रचंड महाग असतात ती. पण पैशांची परवा न करता खरेदीला झुंबड उडते. अत्यंत पौष्टिक अशा या भाजीत व्हिटॅमिन्स व लोह खच्चून भरलेले असते. बुरशीचीच एक जात असलेली अळंबी हॉटेल व्यावसायिकांनादेखील भरभरून श्रीमंत करते.
पावसाळ्यात पाण्यालगत जे मातकट रंगाचे भाजीचे कोंब उगवतात त्यांनाच ‘आकूर’ म्हणतात. प्रत्यक्षात कुरकुरीत वाटणारे हे कोंब चिरले की थोडे बुळबुळीत होतात. पण शिवराक असेल तर चण्याची डाळ वा वाटाणे व इतर वेळी सुंगटांबरोबर घमघमीत गरम मसाल्याचं आकुराचं तोंडाक झक्कासच लागतं. बाजारात आणल्या-आणल्या आकुराच्या जुड्या हा हा म्हणता खपतात.

पावसाळ्यात गोव्यात कुठेही जा, रस्त्याच्या कडेला प्रचंड प्रमाणात वाढलेले ‘तेरे’ (पांढरे अळू) उगवलेले दिसते. काळ्या-तांबड्या अळूमध्ये व तेऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. भरीला काहीतरी आंबट (बिमलां, चिंच, करमलां) घालून केलेली भाजी, सुंगटा घालून केलेलं तोंडाक हातच सुकवत नाही. पुण्याच्या अळूच्या ‘फतफत्याला’देखील लाजवेल अशी त्याला चव!
अगदी कारल्यासारखं दिसणारं रूप हे या फागलांचं वैशिष्ट्य आहे. केवळ पावसाळ्यातच मिळणारी फागलां भाजीत मस्त लागतात की कुरकुरीत तळून? हा एक चर्चेचा खमंग विषय होऊ शकतो.
तायखिळा, फोडशी, पिडुशी, कील्ल, कुडुक या सर्वच पावसाच्या पाण्यावर पोसल्या जाणाऱ्या व आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या भाज्या आहेत; ज्या मासळीची कमी भरून काढतात, ताटात आपली हक्काची जागा निर्माण करतात व वर्षातून एकदाच खायला मिळणार या जाणिवेने ताव मारून खाल्ल्या पण जातात.

फणसाच्या आठळ्या, कोंब आलेल्या काजूबिया (घोडकां), घोळ, कांद्याची पात यादेखील लोकप्रिय भाज्या आहेत. प्रत्येक रानभाजीमध्ये असणाऱ्या लोहामुळे, तंतुमय पदार्थांमुळे त्या आपली प्रतिकारशक्ती वाढवायलाही मदत करतात. यांच्यावर जंतुनाशकांचा मारा केलेला नसतो. त्यामुळेही या अत्यंत गुणकारी, पाचक व विश्वसनीयरीत्या स्वादिष्ट असतात. कोणत्याही मेहनतीशिवाय उगवणाऱ्या या भाज्या उन्हाळ्यात शरीरात संचय झालेल्या पित्ताचा नाश करतात. शेपू, शेवग्याची पाने, चिव्याचे कोंब, कणकीचे कोंब, कोरफड, हळदीची पाने वैगरेंचादेखील श्रावण व गणपतीत भरपूर वापर केला जातो. हळदीच्या पानात केल्या जाणाऱ्या ‘पातोळ्या’ म्हणजे तर गोमंतकीयांचा जीव की प्राण! हा गोमंतकीयांचा लाडका पदार्थ. या रानभाज्या म्हणजे प्रतिकारशक्तीचा बुस्टर डोसच असतो. या रानभाज्यांबरोबर पावसाळ्यात लाल दुधी भोपळा, पडवळ, दोडका, कारले, मेथी, तांबडा माठ, शेवगा, सुरण, राजगिरा, रताळे, बीट या भाज्याही गोमंतकात मूबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यांचे प्रमाणात सेवनही अत्यंत लाभदायी ठरते. भेंडी, लसूण, कांदा, कारलेसुद्धा पावसाळी भाज्यांमध्ये समाविष्ट होताना दिसतात.

एरव्हीच्या दिवसांत मासळी व पावसाळ्यात रानभाज्यांनी सुशोभित, संपन्न असा हा गोमंतक सर्व खवैयांचे लाड वेगवेगळ्या रूपातल्या पदार्थांतून पुरवत असतो.