पावसाळ्यातील अंगदुखी, सांधेदुखी आणि उपाय

0
21
  • डॉ. मनाली महेश पवार

ताप नाही, पण अंगमोड, अंगदुखी आहे. सांधेदुखीचा त्रास पण वाढला, अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांच्या संख्येमध्ये सध्या वाढ दिसत आहे. ताप, सर्दी, खोकला पावसाळ्यात सगळ्यांना मान्य आहे; पण सांधेदुखी? असा काहीसा रुग्णांचा सूर असतो; पण सांधेदुखी, अंगमोड ह्या सुद्धा तक्रारी वर्षाऋतूत आढळतात. योग्य काळजी व ऋतूचर्येचे पालन केल्यास यावर मात करता येते आणि आपण आपले दैनंदिन कामकाज सुरळीत करू शकतो.
पावसाळ्यात बाह्य वातावरणातील शैल्य, आर्द्रता वाढते व शरीरातील ह्या गुणांचा म्हणजे शीत, द्रव, गुणांची वाढ होते, म्हणजे पिंडी ते ब्रम्हांडी या न्यायाने शरीरातील ह्या गुणांची वाढ होते व शरीरातील वाताचा प्रकोप होतो. म्हणजेच वातदोष दूषित होतो, अग्निमांद्य होते, पचनाच्या तक्रारी सुरू होतात, भूक लागत नाही. परिणामी ‘आम’ साठायला लागतो व शरीरात दुर्बलता येते. उत्साह कमी होतो, हालचाली कमी होतात, सारखे झोपून राहावेसे वाटते. व्यायाम नाही म्हटल्यावर वातदोष आपल्या स्थानी (घरात) साठायला सुरुवात करतो. वातदोष व अस्थि (संधी) यांचा आलयालसी संबंध असल्याने दूषित साठलेला वात सांध्याना आणि संपूर्ण अस्थिंना त्रास द्यायला सुरुवात करतो. शरीरातील शीत गुण वाढल्याने सांध्यामधील लवचिकता कमी होते, हालचाल मंदावते, सुज आल्यासारखी वाटते किंवा सूज येते, पाणी साचते व सांधे दुखू लागतात. सर्व सांध्याबरोबर पूर्ण शरीरच जड जड होते व अंग सारखे दुखल्या सारखे होते.
ज्याप्रमाणे पावसाळ्यात आपल्या घरचे दरवाजे फुगतात तशाच प्रकारचे काहीसे आपल्या शरीरात देखील होते. वाताचे द्रव, शीत सारखे गुणे दूषित होतात, वाढतात व सांध्यांना हानी करतात, सांध्यावरचे स्नायू आवरण फुगते व शरीरामध्ये सारख्या वेदना निर्माण होतात.

सांधेदुखीची लक्षणे :

  • सांधेदुखीमध्ये लहानापासून मोठे सगळेच सांधे दुखतात; पण गुडघ्याचे सांधे दुखणे हे विशेष लक्षण सांधेदुखीचे आहे.
  • शरीरात सारखी कणकण वाटते.
  • अंग दुखते, मोडल्याप्रमाणे वाटते, सारखी मरगळ जाणवते.
  • बसून किंवा झोपून उठल्यावर तर पाय जमिनीला टेकवता येत नाही.
  • शरीराच्या हालचाली कमी, घराची आणि ऑफिसची कामे बसूनच केली जातात. बऱ्याच वेळा बाहेर जाणे टाळले जाते.
  • पावसाचा आधार घेवून व्यायाम करणे टाळले जाते. अया अनेक कारणांनी सांधे जखडतात व दुखतात.

उपाय काय?
मग पूर्ण पावसाळा व पुढे हिवाळा वाताचे विकार बळावतात म्हणजेच वेदना बळवते, अशा अवस्थेत आपण काय करायला पाहिजे? वेदनाशामक गोळ्या साधारण पाच दिवस घेऊ शकतात. तीन ते सहा महिने तर घ्या गोळ्यांचा औषधांचा वापर करू शकत नाही. मग काय करावे?
सांधे दुखीचा त्रास असलेल्यांनी तो बळावू नये व इतरांनी हा त्रास होवू नये म्हणून योग्य आहार-विहाराचे आचरण करावे. त्याचबरोबर काही औषधोपचार करावेत. औषधोपचारांमध्ये पंचकर्माला खूप महत्त्व आहे. त्यामुळे संधी वेदनेचा त्रास असलेल्यांनी किंवा त्रास होवू नये म्हणून बस्ती ह्या उपक्रमाची वैद्याकडून चिकित्सा करून घ्यावी. स्नेह व काढ्यांनी बस्ती घेऊन प्रथम आपले अन्नवह स्रोनस, पुरीपवद स्रोनस ह्यांचे शोधन करून, सामत घालवून अग्निमांद्य दूर करावे. म्हणजे शीराचा व मनाला हलकेपणा येतो व त्यामुळे काही अंशी जडत्व दूर होऊन प्रसन्नता निर्माण होते. हालचाल करण्यास थोडीशी उभारी येते. काही अंशी व्यायामही करता येतो. हळूहळू सांध्यामध्ये लवचिकता येते.

  • सांधेदुखी व जखडणे जास्त प्रमाणात असल्यास गुडघेजास्त दुखत असल्यास ‘जानुबस्ती’ व कंबरदुखत असल्यास ‘कटीबस्ती’ ही चिकित्सा वैद्याकडून करून घ्यावी.

औषधोपचार काय घ्यावेत?

  • ज्यांना पंचकर्म करून घेणे शक्य होत नाही त्यांनी पूर्वीच्या काळी जसे एरंडेल तेल प्यायचे, तसे करावे म्हणजे सकाळी साधारण चार वाजता 15-20 मिली एरंडेल सेवन करावे व वर गरमपाणी प्यावे. साधारण दोन ते तीन तासांनी जुलाब लागतात. साधारण 2-3 चांगले जुलाब होवून गेले मग साधारण हलके वाटेल.
  • त्या दिवशी पूर्ण दिवस थोडे पाणी प्यावे. पचायला हलका असा आहार सेवन करावा. साधी पेज किंवा मूगाचे सूप, लाह्याचे पाणी ह्याचेच सेवन करावे. लिंबू पाणी किंवा ताकाचे सेवन करता येते. हा प्रयोग दर पंधरा दिवसांनी करावा.
  • चपातीच्या कणकेत किंवा भाकरीच्या पिठात 1-2 चमचे एरंडेल तेल वापरावे व त्या चपातीचे किंवा भाकरीचे सेवन करावे.
  • सांध्याचे स्नेहन व्हावे व झालेली झीज भरून यावी यासाठी आयुर्वेदाने सिद्ध तेलाचा वापर करावा. याने रोग मुळापासून बरा होण्यास उपयोग होतो.
  • आहारामध्ये मुक्त हस्ते तेल व तूपाचा वापर करावा. तळलेले, तेलकट पदार्थ खाऊ नयेत; पण गरम भातांवर तूप घेऊन खावे. फोडणीसाठी तेलाचा उपयोग करावा.
  • स्नेहनांबरोबर निरगुंडी किंवा एरंडीच्या पाला ठेचून शेक घेतल्याने गुडघ्याचे जुनाट दुखणे देखील थांबते.
  • यस्नारी काढा, योगराज गुग्गुळ, महायोगराज गुग्गुळ, त्रिफला गुग्गुळ, दशमुल काढा, अश्वगंधा, शतावरी आदि औषधोपचार वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यावेत.

आहार कसा असावा?

  • वातशमन करणारा व अग्निप्रदिप्त करणारा असा हलका आहार सेवन करावा. तसेच आहार सेवन करताना जेवण हे गरम हवे व ताजे असावे. फ्रीज मधील आहार सेवन करू नये.
  • पचनशक्ती मंदावलेली असल्याने दिवसातून दोन वेळा खावे. एकमुक्त म्हणजे भूक नसल्यास फक्त एक वेळा जेवण केले तरी हरकत नाही. सारखे चटर-फटर खात राहू नये. भूक लागेल तेवढेच खावे.
  • दुपारी पूर्ण जेवण जेवून रात्री फक्त मुगाचे कढण, पालकभाजीचा सूप, कडधान्य, भाज्यांचा सूप, रव्याची लापशी असा द्रवाहार घ्यावा.
  • पाणी चांगले उकळून, काढ्याप्रमाणे सारखे पीत रहावे, पाण्यामध्ये कधी हळद, कधी सुंठ, कधी गवती चहा, कधी मिरी, कधी, दालचिनी यासारखी द्रव्ये टाकून काढा करून प्यावा. ग्रीन-टी सारखे पेय देखील सेवन केल्याने फायदा होतो.
  • ताकामध्ये आले, ओव्याची पूड, हिंग, काळे मीठ टाकून घ्यावे.
  • फोडणीकरिता जिरे, हिंग, धणे, दालचिनी, तमालपत्र, हळद, मोहरी अशा मसाल्यांचा वापर करावा.
  • मुखवास म्हणून ओवा, बडीशेप, धण्याची डाळ यांचे सैधव सह भाजून केलेले मिश्रण वापरावे.
  • दुधाचे पदार्थ पचायला जड असल्याने खावू नयेत. दूधात सुंठ टाकून प्यावे.
  • चहामध्ये आले किसून टाकावे, आलेपाकाचा तुकडा चघळावा.
  • संधीवात असणाऱ्यांनी रोज सकाळी सुंठ, गूळ व तूप यांपासून तयार केलेली बोराच्या आकाराएवढी गोळी खावी.
    अन्य उपाय काय ?
  • सांध्याना नियमित तेल लावावे. शक्य असणाऱ्यांनी पावसाला सुरू होण्याअगोदरच वातशामक तेलाचा बस्ती घ्यावा.
  • थंड फरशीवर पादत्राणे वापरावीत.
  • वेखंड, सुंठ, ओवा, कडुनिंबाची पाने, लसणीची-कांद्याची साले टाकून घरात गोवाऱ्या पेटवाव्यात.
  • घरच्या घरी साधा आणि कमी ताकदीचा व्यायाम करावा. त्यामध्ये सूर्यनमस्कार घालण्याला प्राधान्य द्यावे.
  • सांधेदुखी जास्त जाणवत असल्यास अट्टहासाने व्यायाम करू नये. प्रथम तेल लावून नंतर शेकून सांध्यात लवचिकता आणावी व नंतर हळूहळू व्यायाम सुरू करावा. अश्या प्रकारे आहार-विहाराचे आचरण केल्यास सांधेदुखी, अंगदुखी यामध्ये बऱ्यापैकी आराम मिळतो.

फोटो : 19मनाली, 19मनाली1