पावसाळी वातावरणामुळे काल रविवारी व आज सोमवारी असे दोन दिवस स्थलांतरित कामगारांना घेऊन जाणार्या विशेष श्रमिक रेल्वेगाड्या बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे वरील दोन्ही दिवशी गोव्यातून आपल्या गावी जाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या कामगारांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
उद्या मंगळवारी हवामानात बदल घडून आला तर रेल्वेगाड्या सुरू करण्यात येतील असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
श्रमिक रेल्वेगाड्यांतून आपल्या गावी जाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेकडो स्थलांतरित कामगारांना सरकारने बांबोळी येथील स्टेडियमवर ठेवले आहे. रेल्वेगाड्या नसल्याने या कामगारांना आता तेथेच थांबावे लागणार असल्याने सरकारने त्यांच्या खाण्या-पिण्याची व्ययस्था स्टेडियमवर केलेली आहे.
दरम्यान, आत्तापर्यंत गोव्यातून ६० हजार स्थलांतरित कामगार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच आपल्या गावी गेले आहेत. तर अद्याप हजारो कामगार गावी जाण्यासाठीच्या श्रमिक रेल्वेगाड्यांच्या प्रतिक्षेत आहेत.