>> सभापती; जुलैच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यापासून सुरुवात
पुढील जुलै महिन्यात होणारे पावसाळी अधिवेशन हे अधिक कालावधीचे असेल आणि ते अंदाजे 15 ते 20 दिवसांचे असेल, अशी माहिती गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.
हे अधिवेशन जुलै महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यापासून सुरू होण्याची व ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र गोवा विधानसभेच्या या पावसाळी अधिवेशनासंबंधी फाईल अद्याप आपणाकडे आली नसल्याचेही त्यांनी काल पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना स्पष्ट केले.
पावसाळी अधिवेशन नक्की कधी सुरू होईल, याविषयीची घोषणा चालू महिन्यांच्या तिसऱ्या आठवड्यात करण्यात येणार असल्याचेही तवडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच विरोधी पक्षांना आपले सगळे प्रश्न विधानसभेत मांडता यावेत यासाठी हे पावसाळी अधिवेशन अधिक कालावधीचे ठेवण्यात येणार असून, ते सुमारे 15 ते 20 दिवसांचे असेल, असेही तवडकर यांनी स्पष्ट केले.
गेल्या मार्च महिन्यात झालेले गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे केवळ चार दिवसांचे झाले होते आणि त्या अधिवेशनाचे दिवस वाढवण्याची मागणी त्यावेळी विरोधी पक्षांनी केली होती. मात्र, ती मागणी सरकारने मान्य केली नव्हती. किमान आता आगामी पावसाळी अधिवेशन जास्त कालावधीचे होण्याची शक्यता असल्याने आमदारांना जनतेचे विविध प्रश्न व समस्या मांडता येणार आहेत.
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला उद्या गोव्यात
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचे गुरुवार दि. 15 जून रोजी गोव्यात एका दिवसाच्या दौऱ्यावर आगमन होणार असल्याची माहिती काल सभापती रमेश तवडकर यांनी या पत्रकार परिषदेत दिली.
दि. 15 रोजी सकाळी 10.30 वाजता ओम बिर्ला हे पर्वरी विधानसभेत गोवा विधानसभा सदस्यांना संबोधित करणार असून, ‘विकसित भारत 2047 : लोकप्रतिनिधींची भूमिका’ हा त्यांच्या भाषणाचा विषय असेल, असे तवडकर यांनी स्पष्ट केले.
सकाळी त्यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर सभापती रमेश तवडकर हे विमानतळावर स्वागत करतील. आपल्या गोवा भेटीत ओम बिर्ला हे गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचीही राजभवनवर भेट घेणार आहेत. तद्नंतर ते पर्वरी येथे विधानसभा सदस्यांना संबोधित करतील. यावेळी सभापती रमेश तवडकर यांचे स्वागतपर भाषण होईल.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचेही भाषण होईल, तर उपसभापती जोशुआ डिसोझा हे आभार मानतील.
आपल्या गोवा भेटीत ओम बिर्ला हे काणकोण येथील श्री बलराम निवास विद्यालयाला भेट देतील. त्यावेळी ते बलराम ट्रस्टने बांधलेल्या घराच्या चाव्या लाभार्भ्यांकडे सुपूर्द करतील.