पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पातील नव्या योजना तपशीलवार मांडणार

0
95

येत्या जुलै महिन्यातील पावसाळी अधिवेशनात आपण अर्थसंकल्पातील नव्या योजना तपशीलवारपणे सादर करणार असून त्यासंबंधीची तयारी सध्या सुरू केली आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यानी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आपण आजारी पडल्याने आपणाला अर्थसंकल्प तपशीलवारपणे मांडता आला नव्हता. यावेळी आपण आपल्या सगळ्या कल्पना व योजना मांडणार असल्याचे ते म्हणाले.

साधनसुविधाविषयक काही कामे अडून पडलेली आहेत. तर काही रेंगाळलेली आहेत. ती हातावेगळी करणे व या कामांना वेग देणे यावर आपण आता भर देणार असल्याचे ते म्हणाले. राज्यात ५-६ प्रमुख प्रकल्प आहेत ते काही अचडणींमुळे अडून पडले आहेत. ह्या प्रकल्पांसाठी ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या दूर करण्याकडे खास लक्ष देणार असल्याचे पर्रीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
नव्या मांडवी पुलाच्या कामाने आता वेग घेतलेला असून ह्या वर्षीच तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

जुवारीचे कामही नेटाने पूर्ण करणार
नव्या जुवारी पुलाच्या कामालाही आणखी गती देण्यात येणार आहे. जुवारीवरील सध्याचा पूल सुरक्षित असला तरी तो बराच जुना आहे या गोष्टींकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे ते म्हणाले. या पुलाची तपासणी वेळोवेळी करण्यात येत असल्याची माहितीही पर्रीकर यांनी दिली.

खाणीचा प्रश्‍नही सोडवणार
राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू करण्याची गरज आहे. त्याचाही आढावा घेतला जात आहे. मात्र, खाणींवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणलेली असल्याने तो मुद्दा थोडा गुंतागुंतीचा बनला आहे. त्यावर लवकरच लवकर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
शिक्षणात सुधारणा नोकरभरतीवरही भर
शिक्षणात काही सुधारणा घडवून आणण्याचा आपला विचार असल्याची माहितीही पर्रीकर यानी यावेळी दिली. अडून राहिलेले नोकरभरतीचे कामही आता हाती घेण्यात येईल, असेही त्यासंबंधीचा प्रश्‍नावर उत्तर देताना त्यानी सांगितले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद
जुलैत गोवा भेटीवर
येत्या ७ व ८ जुलै रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दोन दिवसांच्या गोवा भेटीवर येत आहेत. ते गोवा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यासाठी येत आहेत. मात्र, त्यांचे आणखीही काही कार्यक्रम ठरू शकतात, असे पर्रीकर यानी सांगितले.