पावसामुळे राज्यातील 500 हेक्टर शेतीची हानी

0
4

>> कृषिसंचालक फळदेसाई यांची माहिती

>> भरपाईसाठी अर्ज करण्याचे आवाहन

जुलै महिन्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील शेतीचे मोठे नुकसान झालेले असून पाऊस थांबल्यानंतर राज्यातील सर्व शेतीची पाहणी करून नुकसानीचा अहवाल तयार करण्यात येणार असल्याची माहिती कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाई यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना दिली. भातशेतीच्या करण्यात आलेल्या प्राथमिक पाहणीत सुमारे 500 ते 600 हेक्टर एवढ्या भातशेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज असल्याचे फळदेसाई यांनी स्पष्ट केले.

फोंडा, सांगे तालुक्यात भाजी, काकडीची हानी

भातशेतीचे सर्वांत जास्त नुकसान बार्देश, तिसवाडी, फोंडा व सासष्टी येथे झाले असल्याची माहिती यावेळी बोलताना श्री. फळदेसाई यांनी दिली. फोंडा व सांगे तालुक्यात भाजी शेतीचेही मोठे नुकसान झाल्याचे फळदेसाई म्हणाले. विशेष करून फोंडा व सांगे तालुक्यात काकडी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. काकडीची वाल ही अत्यंत नाजुक असते. सलग महिनाभर कोसळलेल्या जोरदार पावसामुळे काकडी कुजून जाण्याच्या घटना घडल्या. फर्मागुढी, कुंकळ्ळीमध्ये भाजीचे मोसमी पीक घेतले जाते. या पिकांचेे नुकसान झाल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.

बागायतीचे नुकसान

पावसाबरोबर आलेल्या वादळी वाऱ्यामुळे डिचोली व वाळपई आदी ठिकाणी पोकळीची झाडे मोठ्या प्रमाणात उन्मळून पडण्याच्या घटना घडलेल्या असून त्यामुळे सुपारीच्या पिकाचेही नुकसान झाले असल्याचे त्यांनी फळदेसाई यांनी स्पष्ट केले.

अर्जांची सूचना

अजून तरी पावसाने उसंत घेतलेली नसून एकदा पाऊस थांबला व पुराचे पाणी ओसरले की गावाभरातील शेतीची पाहणी करून शेतीच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करण्यात येणार असल्याची माहिती फळदेसाई यांनी दिली. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सूचना करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.