पावसाने केला आफ्रिकेचा खेळ खल्लास!

0
165

>> भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार फायनल

विद्यमान विश्‍वविजेत्या ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पाच धावांनी पराभव करत सलग सहाव्या वेळेस महिलांच्या टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १३४ धावा केल्यानंतर डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १३ षटकांत ९८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. परंतु, पाहुणा संघ ५ बाद ९२ धावांपर्यंतच पोहोचू शकला.
पावसाची शक्यता लक्षात घेत द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. बेथ मूनी व अलिसा हिली यांनी आक्रमकतेची कास धरताना वेगाने सुरुवात केली. डावातील चौथ्या षटकात एम्लाबाच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार ठोकल्यानंतर हिली हिला यष्टिरक्षक चेट्टीने जीवदान दिले. परंतु, याचा लाभ हिलीला उठवता आला नाही. १३ चेंडूंत १८ धावा करत तिने तंबूची वाट धरली. तिची सहकारी मूनी शानदार फॉर्ममध्ये होती. मोठ्या खेळीच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना डी क्लर्कने तिचा त्रिफळा उडवला. यावेळी फलकावर ८.३ षटकांत ६८ धावा लागल्या होत्या. १ बाद ६८ अशा स्थितीतून ऑस्ट्रेलियाच्या डावाला उतरती कळा लागली. जोनासन ३ चेंडू खेळून केवळ १ धाव करून बाद झाली तर गार्डनरला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे कांगारूंची ४ बाद ७१ अशी स्थिती झाली. त्यामुळे कर्णधार मेग लेनिंगला डाव उभारणीसाठी खेळपट्टीवर रहावे लागले. आक्रमकतेला मुरड घालताना तिने चेंडूगणिक धावा करत ४ चौकार व १ षटकारासह नाबाद ४९ धावा जमवल्या. एकवेळ ऑस्ट्रेलियाचा संघ १५०च्या आसपास मजल मारेल, अशी शक्यता होती. परंतु, डेथ ओव्हर्समध्ये द. आफ्रिकेने भेदक मारा करत पुनरागमन केले.

यानंतर पावसाचा व्यत्ययामुळे द. आफ्रिकेसमोर सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. त्यांची सलामीवीर लिझेल लीने दोन खणखणीत चौकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. पण, मोलिनेक्सने टाकलेल्या डावातील तिसर्‍या षटकात डीप मिडविकेटवरून स्लॉग स्वीप मारण्याच्या प्रयत्नात ती सीमारेषेवर झेल देत बाद झाली. पुढच्याच षटकात मेगन शूटने कर्णधार निएकर्क (१२) हिचा त्रिफळा उडविला. पाचव्या षटकात डूप्रीझ (०) भोपळाही न फोडता परतली. या धक्क्यांनंतर द. आफ्रिकेला कठीण गेले. लॉरा वुल्वार्डने २७ चेंडूत नाबाद ४१ धावा करत विजयासाठी केलेले प्रयत्न अपुरे पडले.

-ः धावफलक ः-
ऑस्ट्रेलिया ः अलिसा हिली झे. वॅन निएकर्क गो. खाका १८, बेथ मूनी त्रि. गो. डी क्लर्क २८, मेग लेनिंग नाबाद ४९, जेस जोनासन झे. इस्माईल गो. एम्लाबा १, ऍश्‍ले गार्डनर झे. चेट्टी गो. डी क्लर्क ०, रेचल हेन्स त्रि. गो. डी क्लर्क १७, निकोला केरी नाबाद ७, अवांतर १४, एकूण २० षटकांत ५ बाद १३४. गोलंदाजी ः शबनम इस्माईल ४-०-२०-०, अयाबोंगा खाका ४-०-२९-१, नोनकुलेलको एम्लाबा ३-०-१८-१, डॅन वॅन निएकर्क २-०-२०-०, नादिन डीक्लर्क ४-०-१९-३, क्लो ट्रायोन ३-०-२०-०
दक्षिण आफ्रिका (लक्ष्य १३ षटकांत ९८) ः लिझेल ली झे. गार्डनर गो. मोलिनेक्स १०, डॅन वॅन निएकर्क त्रि. गो. शूट १२, सुने लूस झे. मूनी गो. शूट २१, मिग्नॉन डू प्रीझ झे. लेनिंग गो. किमिन्स ०, लॉरा वुल्वार्ड नाबाद ४१ (२७ चेंडू, ३ चौकार, २ षटकार), क्लो ट्रायोन झे. लेनिंग गो. जोनासन १, नादिन डी क्लर्क नाबाद ६, अवांतर १, एकूण १३ षटकांत ५ बाद ९२. गोलंदाजी ः मेगन शूट ३-०-१७-०, जेस जोनासन ३-०-२८-१, सोफी मोलिनेक्स २-०-१६-१, डेलिसा किमिन्स ३-०-१६-१, निकोला केरी २-०-१५-०

टीम इंडिया
प्रथमच अंतिम फेरीत

>> इंग्लंडविरुद्धचा उपांत्य सामना पावसामुळे रद्द

आयसीसी महिला टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेतील भारत व इंग्लंड यांच्यातील पहिला उपांत्य सामना पावसामुळे रद्द करावा लागला. सामन्यासाठी राखीव दिवसाची तरतूद नसल्याने भारताने ‘अ’ गटात अव्वल राहिल्याचा फायदा उठवत अंतिम फेरी गाठली.

सिडनी मैदानावर काल सकाळपासून पावसाची हजेरी होती. सामना सुरू होण्यासाठी अखेरची वेळ ११.०६ मिनिटे ही होती. पण पावसामुळे नाणेफेक देखील होऊ शकली नाही. यामुळे भारतीय संघाने गट फेरीतील ८ गुणांच्या आधारे अंतिम फेरीत प्रवेश केला. ‘ब’ गटामध्ये इंग्लंडचा संघ ६ गुणांसह दुसर्‍या स्थानावर राहिला होता. याचा फटका त्यांना बसला.

भारतीय महिला संघाची आयसीसी टी-ट्वेंटी विश्‍वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी भारत २००९, २०१० आणि २०१८ मध्ये उपांत्य फेरीत दाखल झाला होता. गेल्या २०१८च्या विश्‍वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा ८ गडी राखून दारुण पराभव केला होता.