राज्यात मोसमी पावसाच्या आत्तापर्यंतच्या ७२ दिवसांपैकी केवळ १८ दिवस सरासरी पावसाची नोंद झाली असून ५४ दिवस सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. सातत्याने मागील २२ दिवस सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्याने पावसाचे प्रमाण १८ टक्क्यांनी कमी झाले आहे.
राज्यात आत्तापर्यंत ७६.११ इंच पावसाची नोंद झाली आहे. अंदाजानुसार आत्तापर्यंत सरासरी पाऊस ९२.९४ इंच एवढा पडायला हवा होता. दक्षिण गोव्यात पावसाचे प्रमाण २० टक्के आणि उत्तर गोव्यात पावसाचे प्रमाण १६ टक्के कमी आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आकाशात पावसाचे ढग तयार झालेले दिसतात. परंतु, जोरदार वार्यामुळे पाऊस न पडताच ढग पुढे सरकतात. यामुळे काही ठिकाणी किरकोळ प्रमाणात पाऊस पडतो.
राज्यात दक्षिण – पश्चिम मोसमी पाऊस कमजोर झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मागील चोवीस तासात केवळ ०.५१ इंच पावसाची नोंद झाली आहे. सांगे येथे सर्वाधिक १.२ इंच, फोंडा येथे १.१ इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडणे, पणजी, साखळी, दाबोळी, मुरगाव येथे काही प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. ओल्ड गोवा, वाळपई, केपे, मडगाव येथील पावसाची आकडेवारी उपलब्ध झाली नाही. राज्यात यावर्षी सुरुवातीपासून मोसमी पावसाने जोर धरला होता. जून महिन्यात चांगला पाऊस पडला. त्यानंतर २१ जुलैपर्यंत चांगल्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. मात्र, २२ जुलैपासून पावसाच्या प्रमाणात घट होण्यास प्रारंभ झाला. मागील २२ दिवस पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी आहे.