पावसाची उसंत; मात्र पडझड कायम

0
10

मागील पंधरा दिवस राज्याला झोडपून काढल्यानंतर आता पावसाने थोडीशी उसंत घेतली आहे. काल दिवसभरात राज्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. चोवीस तासांत केवळ 0.80 इंच पावसाची नोंद झाली. पाऊस थांबला असला तरी झाडांच्या पडझडीच्या घटना कमी झालेल्या नाहीत. मागील 24 तासांत राज्यात पडझडीच्या आणखी 35 घटनांची नोंद झाली.

राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी, झाडाच्या पडझडीच्या घटनांची नोंद होत आहे. कुडचडे येथे सर्वाधिक 7 घटना, फोंडा येथे 5 घटना, वाळपई आणि पेडणे येथे प्रत्येकी 4 घटना, म्हापसा आणि डिचोली येथे प्रत्येकी 3 घटना, जुने गोवे आणि मडगाव येथे प्रत्येकी 2 घटनांची नोंद झाली. दुतळे-मडकई येथील संदीप नाईक यांच्या घरावर झाड कोसळून मोठे नुकसान झाले.

राज्यात आत्तापर्यंत एकूण 55.03 इंच पावसाची नोंद झाली आहे. चोवीस तासांत सांगे येथे सर्वाधिक 1.51 इंच पावसाची नोंद झाली. पेडणे 0.76 इंच, फोंडा 0.70 इंच, पणजी 0.61 इंच, जुने गोवे 0.63 इंच, साखळी 1.03 इंच, वाळपई 1.01 इंच, काणकोण 0.95 इंच, मडगाव 1.21 इंच आणि केपे 1.37 इंच पावसाची नोंद झाली.