>> घरे आणि फ्लॅट्सचीही हानी; नद्यांना पूर; भूस्खलन व झाडांच्या पडझडीमुळे वाहनांचे नुकसान; आजही हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी
राज्यात पावसाचा कहर सुरुच असून, अविश्रांत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. वादळी वाऱ्यांसह कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे होणाऱ्या वित्तहानीचा आकडा वाढत चालला आहे. काल दिवसभरात विविध ठिकाणी नद्यांना पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. रगाडा नदीला आलेल्या पुरामुळे मुरमुणे मेळावली रस्ता पाण्याखाली गेला. तसेच गुळेलीतील काही भागांतही नदीचे पाणी शिरले. अनमोड घाटात दरड कोसळल्याने गोवा-बेळगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तसेच दूधसागर नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने निरंकाल व दावकोण येथे रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे गावात होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. कुठ्ठाळी जंक्शन शेजारी डोंगरावरील दरड कोसळून तीन दुचाकी गाडल्या गेल्या. पणजीत एका चालत्या कारवर झाड कोसळले. त्याशिवाय मार्लेम, बोर्डा-फातोर्डा येथील रायेश चेंबर इमारतीतील आणखी 3 फ्लॅटवर दरड कोसळून त्यांचे नुकसान झाले. यापूर्वी मंगळवारी याच इमारतीतील 4 फ्लॅटवर दरड कोसळली होती. दरम्यान, हवामान विभागाने शुक्रवार दि. 19 जुलैसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
राज्यात 7 जुलैनंतर पावसाने रौद्ररुप धारण केले असून, गेले 10-12 दिवस जोरदार सरी कोसळत आहेत. यामुळे राज्यातील नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे लगतच्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. सातत्याने पाऊस कोसळत असल्याने अनेक भागांत साचलेले पाणी अद्यापही ओसरलेले नाही. त्यामुळे त्या ठिकाणच्या लोकांचे मोठे हाल झाले आहेत.
गेल्या चोवीस तासांत राज्यात एकूण 4.62 इंच पावसाची नोंद झाली असून, राज्यात आत्तापर्यंत एकूण 92.44 इंच पावसाची नोंद झाली आहे. सध्याच्या घडीला पावसाचे प्रमाण 52.9 टक्के जास्त आहे.
मागील चोवीस तासांत वाळपई, साखळी फोंडा, मडगाव, मुरगाव, सांगे आदी भागात जोरदार पावसाची नोंद झाली. चोवीस तासांत वाळपई येथे सर्वाधिक 8 इंच पावसाची नोंद झाली. म्हापसा येथे 4.01 इंच, पेडणे येथे 3.87 इंच, फोंडा येथे 4.95 इंच, पणजी येथे 3.83 इंच, साखळी येथे 6.11 इंच, काणकोण येथे 4.33 इंच, दाबोळी येथे 3.01 इंच, मुरगाव येथे 3.88 इंच, मडगाव येथे 4.48 इंच, केपे येथे 3.74 आणि सांगे येथे 5.63 इंच पावसाची नोंद झाली.
गेल्या 5 दिवसांत 25 इंच पाऊस
राज्यात मागील पाच दिवसांत विक्रमी 24.68 इंच एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत उत्तर गोव्यात 55.2 टक्के आणि दक्षिण गोव्यात 50.8 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.
अनमोड घाटातील दरड हटवली
अनमोड घाटात दूधसागर मंदिराजवळ काल मुसळधार पावसामुळे दोन ठिकाणी दरड कोसळून गोवा-बेळगाव मार्गवरील वाहतूक ठप्प झाली. दुपारपर्यंत रस्त्यावर कोसळलेली दरड बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. दूधसागर नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने निरंकाल व दावकोण येथे रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे गावात होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
दरड कोसळून तीन दुचाकींची हानी
काल सायंकाळी 5 च्या सुमारास कुठ्ठाळी जंक्शनजवळ मोठे भूस्खलन होऊन तीन दुचाक्या गाडल्या गेल्या. अग्निशमन दलाने युद्धपातळीवर काम करून त्या तीन दुचाकी बाहेर काढल्या.
डिचोली, सत्तरीत घरांची पडझड
काल सकाळी भुईपाल कॉलनी येथील निर्मला सखाराम शिंदे या महिलेच्या घराचा काही भाग पावसामुळे कोसळल्याने मोठी हानी झाली. तसेच डिचोली तालुक्यात नानोडा, मये, आमोणा या ठिकाणी घरांची पडझड झाली.
वाळपई, सांगे, साखळीत पावसाची ‘शतकी’ खेळी
राज्यातील वाळपई, सांगे आणि साखळी या तीन भागांत पावसाने इंचाचे शतक पूर्ण केले आहे. वाळपई येथे आत्तापर्यंत 106.65 इंच, सांगे येथे 104.09 इंच, साखळी येथे 100.76 इंच पावसाची नोंद झाली आहे. फोंडा येथेे 99.79 इंच पावसाची नोंद झाली आहे.
मार्लेम-बोर्डा येथे दरड कोसळून आणखी तीन सदनिकांची हानी
मार्लेम-बोर्डा, फातोर्डा येथील रायेश चेंबर या इमारतीवर काल पुन्हा एकदा दरड कोसळून आणखी 3 फ्लॅटचे नुकसान झाले. यापूर्वी 16 जुलै रोजी रायेश चेंबर्स या बहुमजली इमारतीची संरक्षक भिंत व दरड कोसळून 4 फ्लॅटचे नुकसान झाले होते.
काल सकाळी या इमारतीच्या दुसऱ्या बाजूची भलीमोठी संरक्षक भिंत व दरड कोसळून आणखी 3 फ्लॅटची हानी झाली. तसेच त्यामुळे इमारतीलाही धोका निर्माण झाला आहे. आणखी दरड कोसळण्याची भीती असून, एक भले मोठे झाड दरड कोसळल्याने इमारतीवर वाकले आहे, असे अग्शािमक दलाच्या अधिकाऱ्यानी सांगितले. त्या झाडापासून इमारतीला धोका आहे.
काल उपजिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केली; मात्र तेथील रहिवाशांना अन्यत्र हलविण्याची कोणतीच तयारी केली नसल्याने इमारतीतील नागरिकांनी संताप व्यक्त केला. वर्षभरापूर्वी या धोकादायक स्थितीची कल्पना जिल्हाधिकारी आणि पालिकेला देऊनही त्यांनी कोणतीच पावले न उचलल्याने लोकांवर आपत्ती कोसळली आहे, असा आरोप येथील रहिवासी कृष्णा नाईक यांनी केला.