पाववाले, नर्सरी, बेकरीवाल्यांच्या बेकायदेशीरपणावर कारवाईचे आदेश

0
97

>> ग्राहक दिनापूर्वी कारवाई करा : जिल्हाधिकारी

 

‘पाव’ तयार करणारे व्यावसायिक पाव तयार करताना आवश्यक ती स्वच्छता बाळगतात की नाही तसेच ज्या टोपल्यांमधून हे पाव वाहून नेले जातात त्या टोपल्या स्वच्छ असतात की नाही यावर लक्ष ठेवले जावे. तसेच पावाचे वजन व्यवस्थित असते की नाही हेही तपासून पाहण्याची सूचना काल उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिली.
जिल्हाधिकार्‍यांनी काल आपल्या चेंबरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी, नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी, पालिका प्रशासन व वजन आणि माप खात्याचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन त्यांना वरील सूचना केली. पाव ज्या ठिकाणी तयार केले जातात ती जागा व सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवला जातो की नाही. तसेच पाव ज्या टोपल्यांमधून नेले जातात त्या टोपल्या स्वच्छ असतात की नाही याची पाहणी येत्या २१ रोजी ग्राहक दिनापूर्वी करण्यात यावी, असा आदेश फर्नांडिस यांनी दिला आहे.
बेकायदा बेकर्‍यांवर कारवाई
दरम्यान, सरकार दरबारी नोंदणी न करता बेकायदेशीररीत्या जर कुणी राज्यात बेकर्‍या सुरू केलेल्या असतील तर या बेकर्‍यांवर कारवाई करण्याचाही आदेश फर्नांडिस यांनी दिला आहे.
बेकायदा नर्सरींवरही कारवाई
दरम्यान, राज्यातील बेकायदेशीर नर्सरींवरही कारवाई करण्याचा आदेश फर्नांडिस यांनी दिला आहे. राज्यात काी ठिकाणी रस्त्यांच्या बाजूला काही लोकांनी बेकायदेशीररीत्या नर्सरी सुरू केलेल्या असून तेथे चांगली कलमे असल्याचे भासवून निकृष्ट दर्जाची कलमे विकून लोकांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी आहेत.