पालेकर यांच्या अर्जावर सोमवारी पुढील सुनावणी

0
4

बाणस्तारी अपघात प्रकरणी संशयित असलेले ॲड. अमित पालेकर यांचा जामीन रद्द करण्यासाठीच्या अर्जावरील सुनावणी आता पुढील सोमवारी होणार आहे. न्यायालयाची परवानगी न घेता पालेकर यांनी विदेशात चारवेळा प्रवास केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. काल शुक्रवारी दुपारी झालेल्या सुनावणीत ॲड. पालेकर यांच्या वकिलांनी राजकीय हेतूने हा अर्ज दाखल केल्याचा दावा केला.

न्यायालयाची परवानगी न घेता पालेकर यांनी विदेशात चारवेळा प्रवास केल्याने जामीन रद्द करण्यासंबंधीचा अर्ज गुन्हे विभागाने न्यायालयात दाखल केला होता. काल झालेल्या सुनावणीत न्यायमूर्तीनी दोन्ही वकिलांची बाजू ऐकून घेतली. पालेकर यांच्या वतीने ॲड. नितीन सरदेसाई यांनी बाजू मांडली. त्यावेळी त्यांनी पालेकर हे आम आदमी पक्षाचे राज्य प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना अडकवण्यासाठी हा अर्ज दाखल केल्याचा दावा त्यांनी काल न्यायालायसमोर केला. या संबंधीची पुढील सुनावणी सोमवारी दुपारी 4 वाजता होणार आहे.

दि. 25 जानेवारी ते 29 जानेवारी 2024 या काळात थायलंड (बँकॉक), 7 मार्च ते 11 मार्च 2024 या काळात दुबई, 18 एप्रिल ते 22 मार्च 2024 या काळात थायलंड (बँकॉक) व 18 मे ते 29 मे 2024 या काळात हाँगकाँग या देशात पालेकर यांनी प्रवास केला होता.
बाणस्तारी अपघातापूर्वी पालेकर यांनी कुटुंबियांसह फ्रांसमध्ये जाण्यासाठी तिकीट बुक केले होते. त्यामुळे पालेकर यांनी फ्रांसला जाण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेतली हाती. पण त्यानंतर इतर देशांत जाण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला आहे.